Wednesday 9 November 2016

परिवर्तन : नाटकाच्या जगातील नव्या पैलूची ओळख





अनेकांनी प्रयत्न केले. काहीजण त्यात बऱ्यापैकी यशस्वीही झाले. तरीही मराठवाड्यातील नाट्यचळवळ प्रामुख्याने हौशी रंगभूमीपुरतीच राहिली. अर्थात या हौशी रंगभूमीवरूनच अनेक दिग्गज अभिनेते, लेखक, दिग्दर्शक तयार झाले. मुंबईत जाऊन स्थिरावले. त्यातील काहीजणांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. ठसाही उमटवला. त्यामुळे राज्य नाट्य, कामगार नाट्य आणि एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून कलावंतांना सादरीकरणासाठी जागा निर्माण करून देणाऱ्या हौशी रंगभूमीला महत्व आहेच. या रंगभूमीला कलावंत देण्याचे प्रमुख काम औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाने केले. अलिकडील काळात बीडच्या केसके, औरंगाबादच्या एमजीएम, देवगिरी महाविद्यालयांतील नाट्यशास्त्र विभागांनीही उत्तम कलावंत दिले आहेत. याशिवाय अनेक नाट्य संस्थांनीही हौशी रंगभूमी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यात प्रामुख्याने जिगिषा, परिवर्तन, नाट्यरंग, स्नेहांकितचा समावेश करावा लागेल. या संस्थांनी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रयोगांचे सादरीकरण केले. त्यातील परिवर्तन संस्थेचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कारण या संस्थेने केवळ नाटकच नव्हे तर साहित्यविषयक उपक्रमांचेही आयोजन करण्याची परंपरा जपली आहे. १९९० च्या दशकात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांच्या जिगिषा संस्थेने औरंगाबादेत अनेकविध नाट्यप्रयोग केले. त्यांची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचल्यावर जिगिषातील कलावंत मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर जिगिषाची जागा भरून काढण्याइतपत संस्थेची आवश्यकता भासू लागली. रंगकर्मींमध्ये तशा अर्थाने चर्चाही सुरू झाली होती. प्रख्यात नाट्य-चित्रपट लेखक आणि पटकथाकार असलेले प्रा. अजित दळवी, ज्येष्ठ अभिनेत्री प्रा. अनुया दळवी यांनाही ही बाब जाणवत होती. ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे त्यावेळी औरंगाबादेत कार्यरत होते. नाट्य-साहित्य वर्तुळाशी त्यांचाही निकटचा संबंध होता. त्यामुळे या मंडळींनी एकत्र येत परिवर्तनची स्थापना केली. या संस्थेतील सर्वचजण दिग्गज आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमीदिनानिमित्त परिवर्तनतर्फे झालेला क्लायमैक्स कार्यक्रम अशा नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रमांच्या मालिकेतीलच होता. कोणत्याही नाटकातील क्लायमॅक्स म्हणजे शेवट म्हणजे सादरीकरणातील परमोच्च बिंदू असतो. त्यात लेखकाने नेमके काय म्हटले आहे आणि तो किती प्रभावीपणे रंगमंचावर अविष्कृत झाला यावर नाटकाचे यश-अपयश अवलंबून असते. प्रा. दळवी यांनी हाच मुद्दा पकडत विविध नाटकांतील क्लायमॅक्सचे सादरीकरण करण्याचे ठरवले. हौशी, व्यावसायिक, निमव्यावसायिक रंगभूमीचा प्रदीर्घ अनुुभव असलेल्या कलावंतांना सोबत घेतले. त्यामुळे हा अफलातून प्रयोग रसिकांना कमालीचा भावला. संगीत सौभद्र नाटकातील कृष्ण-बलरामाचा प्रसंग विश्वनाथ दाशरथे, सुधीर मोघे यांनी सादर केला. त्यांनी गायलेली पदे दाद मिळवून गेली. प्रा. अनुया दळवी यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राटमधील कावेरीची भूमिका संवाद आणि अभिनयाच्या बळावर जिवंत केली होती. प्रशांत दळवींचे चारचौघी हे तुफान गाजलेले नाटक. त्यातील विनीच्या समोर उभा राहिलेला पेचप्रसंग अदिती मुखाडकर, नीलेश चव्हाण, आकाश काळे यांनी पूर्ण ताकदीने सादर केला. अशोक पाटोळे यांच्या आई रिटायर होतेय या नाटकात आई स्वत:चे आयुष्य जगण्यासाठी घराबाहेर पडते, हा प्रसंग अंगावर काटा उभा करतो. तो सुजाता कांगो, मोहन फुले यांनी विलक्षणरित्या फुलवला होता. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे आमदार सौभाग्यवती हे महत्वाचे राजकीय नाटक. त्यातील दोन प्रसंग प्रा. दळवी, सुधीर मोघे यांनी सादर केले. प्रशांत दळवी यांच्याच ध्यानीमनी नाटकातील मनोचिकित्सक, महिलेतील प्रसंग सुजाता कांगो, अभिषेक देशपांडे यांनी उभा केला. किमयागार या शिरवाडकरांच्या नाटकातील प्रसंग निना निकाळजे, मुग्धा निकाळजे, सीमा मोघे, सुधीर मोघे, सूरज शिंदे यांनी जिवंत केला. महेश एलकुंचवारांच्या आत्मकथा नाटकातील प्रसंग सुजाता कांगो, प्रा. दळवी यांनी सादर केला. घाशीराम कोतवाल हे मराठी नाटकाच्या इतिहासातील सर्वात महत्वाचे नाटक. त्यात घाशीरामाच्या अखेरच्या क्षणाचा प्रसंग अभिषेक देशपांडे, मल्हार देशमुख, आकाश काळे यांनी त्यातील आशयासह मांडला. एकूणात या उपक्रमातून परिवर्तन नाटकातील एका वेगळ्या पैलूची ओळख रसिकांना करून दिली. अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही आयोजित झाल्यास मराठवाड्यातील हौशी रंगभूमी अधिक दमदार नक्कीच होईल.

No comments:

Post a Comment