Tuesday 29 November 2016

राज्य नाट्य : काही प्रयोगातील आशय, मांडणीने वाढल्या अपेक्षा

चित्र, मूर्ती,शिल्प आदी कला महान असल्या आणि त्यातून मानवी जीवन समृद्ध होत असले तरी या परिपूर्ण मानल्या जात नाहीत. कारण त्यात इतर कलांचा अाविष्कार तेवढ्या ताकदीने होत नसतो. नाटक ही कला मात्र सर्व कलांचे एकत्रीकरण समजले जाते. त्यात सर्वच कला कमी अधिक प्रमाणात अाविष्कृत होत असतात. त्यामुळे नाटक लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि त्यातील अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, प्रकाश योजनेची मांडणी करताना इतर सर्व कलांचा विचार करावा लागतोच. तरच ते नाटक रंगतदार ठरते. म्हणूनच नाटक सादरीकरणात खरा कस लागतो. त्यातल्या त्यात जर ते अलीकडच्या स्पर्धांमधील दोन अंकी नाटक असेल तर त्यात लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञांना सर्वस्व ओतावे लागते. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या अंतिम टप्प्याकडे निघालेला राज्य नाट्यस्पर्धांचा मोसम. हौशी, निमव्यावसायिक रंगभूमीवर काम करत असलेल्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असते. त्याला नाटकाची आवड निर्माण झाल्यावर पहिली काही वर्षे तरी त्याचे लक्ष्य सांस्कृतिक संचालनालयाच्या राज्य नाट्य आणि कामगार नाट्यस्पर्धा असतेच. एकांकिका स्पर्धांमध्ये कितीही सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली असली तरी एकदा राज्य नाट्यमध्ये नाव कमावायला पाहिजेच, असा विचार हौशी रंगकर्मीच्या मनात असतोच. कारण पूर्ण पल्ल्याच्या नाटकांमध्ये आपली पूर्ण परीक्षा होते, हे कलावंताला पुरेपूर माहिती असते. म्हणूनच की काय अनेक चढउतार पाहूनही ही स्पर्धा टिकून आहे. दहा वर्षांपूर्वी लागलेली घरघर सांस्कृतिक संचालनालय आणि नव्या पिढीच्या कलावंतामधील जिद्दीमुळे बऱ्यापैकी थांबली आहे. एकेकाळी सलग ३० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला टीव्ही सिरियल्समुळे ओहोटी लागली होती. थोडेफार नाव मिळाले की कलावंत मुंबईकडे धावू लागले होते. नव्या संहिताच येणे बंद पडले होते. काही केंद्रावर नाट्य प्रयोग रद्द करण्याचे प्रकार वारंवार घडू लागले होते. सुदैवाने हे सारे किमान औरंगाबाद केंद्रावर तरी थांबल्याचे दिसते. ते २३ नोव्हेंबर कालावधीत औरंगाबादमध्ये प्राथमिक फेरी झाली. त्यात सादर झालेल्या नाटकांच्या आशय, विषय आणि सादरीकरणावर नजर टाकली तर तरुणाई पुन्हा स्पर्धेकडे वळाली आहे. आणि नाटक म्हणजे खूप मेहनतीने उभी राहणारी कला आहे, हे त्यातील अनेकांना कळाल्याचे लक्षात येते. पहिल्या फेरीत `एक परी` हे किरण पोत्रेकर यांनी लिहिलेले आणि उमेश राजहंस यांनी दिग्दर्शित केलेले नाटक पहिले आले. पोत्रेकर मूळ वसमतचे. १९९० च्या दशकात ते औरंगाबादेतील हौशी रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या एकांकिकांनी त्या वेळी स्पर्धा गाजवल्या होत्या. नंतर मुंबईत व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी ठसा उमटवला. त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेसाठी नेमके काय लागते, याचा त्यांना अचूक अंदाज होता. तो त्यांनी पूर्ण प्रतिभा पणाला लावत एक परीमध्ये अाविष्कृत केला आहे. निराश्रितासारख्या एका मुलीला एक हमाल रात्रभर आपल्या खोलीवर आणतो आणि मग त्यांच्यात नेमके काय घडते याची मांडणी पोत्रेकरांनी केली आहे. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बुरगुंडामध्ये प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी लोककलावंतांच्या व्यथा मांडल्या आहेत. प्रा. सोनवणेही लोककलांचे मास्टर म्हणूनच गणले जातात. त्यांची केवळ लोककलांशी नाळ जुळलेली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सोनवणे त्यापलीकडे जाऊन लोककलावंतांच्या दुःख, वेदनांशी समरस झाले आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत असतात. बुरगुंडामध्येही त्यांनी भारुडकार, गोंधळ्यांचे जगणे मांडले आहे. सतीश लिंगाडे यांनी लिहून दिग्दर्शित केलेले `सपान` नाटकही लक्षवेधी ठरले. तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सपानमध्ये खेडेगाव बदलण्याची कहाणी सांगितली आहे. राणी माशी (लेखक शैलेश कोरडे, दिग्दर्शक विनोद आघाव), भाकवान (लेखक तुषार भद्रे, दिग्दर्शक शिवाजी मेस्त्री) ड्रम डान्सर (लेखक रमेश पवार, दिग्दर्शक वैजनाथ राठोड), जेंटल मेंटल (लेखक राहुल ढोले, दिग्दर्शक अविनाश भोसले) या नाटकांचे विषय आणि मांडणी दाद मिळवून गेली. काही अपवाद वगळता सर्वच नाटकांमध्ये सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा विचार देण्याचा प्रयत्न लेखकांनी केल्याचे दिसते. ही रंगभूमीसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण जोपर्यंत नव्या दमाचे आणि विचारांचे लेखक येत नाहीत. तोपर्यंत नाट्यकलेला लोकाश्रय, राजाश्रय मिळणार नाही. हौशी रंगभूमीची चळवळ पुढे जाणार नाही. त्याचा थेट परिणाम पुढे व्यावसायिक रंगभूमी आणि कमी अधिक प्रमाणात सिरियल्स, चित्रपटांवरही होत असतो. म्हणून नवे लेखक येणे आणि त्यांनी नव्या पद्धतीने विचारांची मांडणी करणे या दोन गोष्टी राज्य नाट्यच्या निमित्ताने घडत आहेत. संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या ते कमी असले तरी पुढील काळात त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी मराठवाड्यात व्यावसायिक रंगभूमी उभी राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रख्यात अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी नाटक म्हणजे पॅशन असल्याचे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यामुळे या स्पर्धेत यश मिळवणाऱ्यांनी लगेच मुंबईकडे धाव घेतली नाही तर मराठवाड्यात व्यावसायिक रंगभूमी उभी करण्याचे बऱ्हाणपूरकरांचे स्वप्न साकार होईल. आणि कलावंतांसाठी नाटक म्हणजे पॅशन असल्याचेही सिद्ध होईल.

1 comment:

  1. It's deep & untouched subject but you have handled very nicely.

    ReplyDelete