Tuesday 30 May 2017

हे सोहळे असे की, इथे खुर्चीनामाचा गजर आहे


कोणत्याही राजकीय पक्षाचे बडे नेते पक्ष वाढला पाहिजे. जनाधार व्यापक झाला पाहिजे, असा अाग्रह धरतात. त्यासाठी कार्यकर्त्यांना लोकोपयोगी कार्यक्रम देतात. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्यास सांगतात. याच मार्गाने काही पक्ष त्याच बळावर सत्तेच्या पायऱ्या झपाट्याने चढले, तर काही पक्ष लोकांशी नाळ जोडण्यात कमी पडल्याने पायऱ्या उतरले. असा एक प्रकार आपण साऱ्यांनीच पाहिला. अनुभवला. पण अलीकडील काळात त्यात बराच बदल झाला आहे. जनाधार वाढवण्यासाठी इतर पक्षांतील छोट्या-मोठ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवणारा भाजप त्यात आघाडीवर आहे. पक्ष वाढवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची भाजप नेत्यांची तयारी दिसते. पण हे करत असताना स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर उमटणार नाही ना, पक्षात नव्याने येणारा आणि आधीपासून पक्षासाठी रक्त सांडणारा कार्यकर्ता, पदाधिकारी दुखावणार नाही ना, याची काळजी घेतली जात नाही. राजकारण म्हणजे धुसफूस, नाराजी, गटबाजी आलीच. पण ती किती असावी, याची मर्यादा भाजप किंवा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्षांमध्ये घेतली जात नाही. त्याचे उदाहरण औरंगाबाद महापालिकेत पाहण्यास मिळाले. भाजपच्या गटनेतेपदावरून महापौर भगवान घडमोडे आणि माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यात जोरदार शीतयुद्ध झाले. राठोड तीन वर्षांपू्र्वी काँग्रेसमधून भाजपत आले. आगमन करताच उपमहापौरही झाले. कारण प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. बाहेरून आलेल्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला थेट भाजपने उपमहापौर करावे, हे निष्ठावंतांना मान्य नव्हते. मात्र, दानवेंमुळे त्यांनी फार खळखळ केली नाही. उपमहापौरपदावरून पायउतार होताच राठोड यांना भाजप गटनेतेपदाचे वेध लागले. आतापर्यंत गटनेते असलेले घडमोडे महापौर झाल्याने हे पद रिकामे झाले आहे. त्यावर मला विराजमान करा, असा आग्रह राठोडांनी दानवेंकडे धरला. तो त्यांनी तत्काळ मान्यही करून टाकला. त्यामुळे घडमोडे नाराज झाले. माझा महापौरपदाचा कालावधी चार महिन्यांनंतर संपेल. मग माझ्याकडे कोणती खुर्ची राहील, असा त्यांचा सवाल होता. घडमोडे पूर्वीपासून (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक. मुंडे हयात असताना डॉ. भागवत कराड, घडमोडे आदी मंडळीच सत्ताकारणाचे सर्व निर्णय घेत होती. ते म्हणतील तसेच भाजपचे वारे फिरत होते. मात्र, मुंडे गेले. त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याभोवतीही वलय असले तरी ते गोपीनाथरावांइतके प्रभावी नाही. त्याचा परिणाम डॉ. कराड, घडमोडेंच्या वाटचालीवर होताना दिसत आहे. ते म्हणतील तसेच होईल, असे दिवस आता मागे पडले आहेत. म्हणूनच की काय राठोड यांना रोखण्याचे सारे प्रयत्न अपयशी ठरले. महापालिकेतील गटनेत्याच्या दालनाचे उद््घाटन घडमोडेंनी करावे, असे वरिष्ठांकडून फर्मान आले. वाहत्या वाऱ्याची दिशा आणि आपली शक्ती ओळखण्याची क्षमता घडमोडेंमध्ये असल्याने त्यांनी फर्मानाची तामिली केली.मुळात हा सारा सत्तेचा खेळ आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटते ठेवून स्वत:चे स्थान अबाधित राखण्याचा खेळ खेळण्यात बडे नेते मौज लुटत आहेत. आणि राजकारणात आलोच आहोत तर खुर्ची हवीच. त्यासाठी दालन पटकावायचे. त्याची रंगरंगोटी करून आपापल्या वर्तुळातील कार्यकर्त्यांना गप्पांसाठी चांगली जागा मिळवून द्यायची, एवढेच भाजपच्या अनेक छोटेखानी नेत्यांचे ध्येय झालेले दिसते. खरे तर राठोड यांना भाजपने उपमहापौरासारखे शहराच्या राजकारणातील महत्त्वाचे पद दिले. त्याचा त्यांनी पक्षाला किती फायदा करून दिला, कोणत्या भागात संघटन मजबूत केले? महापालिकेच्या माध्यमातून किती लोकांची कामे केली, असा प्रश्न निष्ठावंत विचारत आहेत. तर दुसरीकडे लोकांची कामे करण्याची क्षमता असलेल्यास केवळ तो दुसऱ्या पक्षातून आला म्हणून नाकारता येईल का, असाही सवाल राठोड समर्थक करत आहेत. त्यांचे समाधान वरिष्ठ नेत्यांना करता आले नाही तर काही दिवस भाजपच्या राजकीय वर्तुळात शांतता नांदेल आणि पुन्हा राठोड विरुद्ध घडमोडे शीतयुद्ध सुरू होईल. पार्टी विथ डिफरन्स असे सांगणाऱ्या या पक्षात वेगळ्या पद्धतीचे वॉर सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यात लोकहिताची कामे नेहमीप्रमाणे मागे पडतील. खरे तर घडमोडे आणि राठोड दोघांच्याही मागे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाहीत. तरीही ते एक-दोन वॉर्डात बऱ्यापैकी शक्ती कमावून आहेत. त्यांच्यातील युद्धाचा किंचित का होईना परिणाम पक्षावर होतोच. त्यामुळे त्यांच्यातील वाद मिटले नाहीत किंवा त्यांनीच खुर्चीचा मोह बाजूला ठेवून आपापसात मिटवून घेतले नाहीत तर इतके दिवस इनकमिंग असलेल्या भाजपला काही वर्षांत आऊटगोइंगही पाहावे लागू शकते. अन्यथा पाटोदा (बीड) येथील प्रख्यात कवी सूर्यकांत डोळसे यांनी म्हटल्यानुसार
हे सोहळे असे की, 
इथे खुर्चीनामाचा गजर आहे 
चालता सत्तेची पायवाट... 
आंधळी त्यांची नजर आहे. 
खुर्चीनामाच्या गजरात... जिंदाबादची जोड असते ! 
ज्याला त्याला आपापल्या...पंढरीचीच ओढ असते !! 
 अशी अवस्था होईल. जागोजागी पंढरी दिसू लागतील. पण त्यात विठूरायाची मूर्तीच नसेल. ना भाव दिसेल ना भक्ती असेल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आणि स्थानिकांनीही त्याचीच घाई झाल्याचे दिसतेय.

No comments:

Post a Comment