Tuesday 30 May 2017

शिवसेनेच्या रणरागिणींना हवी सन्मानाची वागणूक

शिवसेना म्हणजे हिटलरशाही, शिवसेना म्हणजे जातीयवाद, शिवसेना म्हणजे धर्मवाद, शिवसेना म्हणजे प्रांतवाद. अशा आरोळ्या शिवसेनेचे मराठवाड्यात आगमन झाले तेव्हा ऐकायला येत होत्या. ठाकरेंना शेतीतील काही कळत नाही आणि शहरातील बहुसंख्याक त्यांच्याकडे फिरकणार नाहीत. त्यामुळेही मराठवाड्यात शिवसेना टिकणारच नाही, असा तत्कालीन काही राजकारणी आणि अभ्यासक, पत्रकारांचा दावा होता. तो वस्तुस्थितीपासून किती दूर होता, हे नंतर स्पष्ट झाले. हे असे घडले त्यास तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थिती कारणीभूत तर होतीच. पण त्यासोबतच महत्त्वाची ठरली संघटनेची बांधणी. शिवसेना म्हणजे एक कुटुंबच, असे चित्र होते. बाळासाहेब ठाकरे वडील, मीनाताई ठाकरे आई आणि आपण सारी त्यांची मुले, मुली अशी भावना प्रबळ होती. स्वतः ठाकरे, मीनाताई तसे वागत. संघटनेच्या बांधणीत महिलांची शक्ती महत्त्वाची असल्याचे शिवसेनाप्रमुखांना पुरेपूर माहिती होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी महिला आघाडीला स्वतंत्र महत्त्व, सन्मानाचे स्थान देण्यात आले. लता दलाल, अनुसया शिंदे, पद्मा शिंदे, चंद्रकला चव्हाण, राधाबाई तळेकर, सुनंदा कोल्हे अशा अनेक महिला रणरागिणी म्हणून ओळखल्या जात. सामान्य नागरिकांचे प्रश्न हातात घेतल्याचे सांगत शिवसेनेचे मोर्चे अधिकाऱ्यांच्या दालनावर धडकत तेव्हा महिलाच आघाडीवर असत. कारण त्यांच्यात सन्मानाची आणि एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची भावना होती. गटबाजीला थारा नव्हताच. महिलांचीही शक्ती उभी राहिल्याने केवळ औरंगाबादच नव्हे, तर मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात शिवसेना तुफानी वेगात पोहोचली. तिच्यातील गुण-दोषांसकट कमी- अधिक प्रमाणात लोकांनी या संघटनेचा राजकीय पक्ष म्हणून स्वीकार केला. काँग्रेसवरील राग व्यक्त करण्यासाठी म्हणून का होईना छोट्या-मोठ्या निवडणुकीत सेना उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. त्यातील काही जण खरेच समाजसेवक निघाले, तर काहींनी पक्षाचा यथायोग्य वापर करून घेतला. कालपर्यंत सायकलवर फिरणारे एक कोटीच्या कारमध्ये फिरू लागले. दोनच शर्ट, पँटवर वर्षभर गुजराण करणारे दोन-तीन मजली इमारतीचे मालक झाले. एवढी वेगवान प्रगती शिवसेनेला सढळ हाताने पाठिंबा देणाऱ्यांनाही मान्य नव्हती. यामुळे सेनेभोवतीचे लोकप्रियतेचे वलय बरेचसे कमी झाले असले तरी ते प्रचंड घसरले नाही. बाळासाहेब ठाकरेंसारखे बलाढ्य नेत्याचे छत्र आता शिवसेनेवर नसले तरी त्यांच्या नावावर अस्तित्व कायम आहे. एकेकाळी शिवसेनेला जातीयवादी, धर्मवादी म्हणून शिव्या घालणारे आता भाजपला विरोध म्हणून सेनेच्या सुरात सूर लावत आहेत. हे सगळे पाहता आणि मराठवाड्यातील धार्मिक, सामाजिक रचना अन् वस्तुस्थिती लक्षात घेता सेनेचे राजकीय स्थान आणखी काही वर्षे खूप घसरणार नाही, असे स्पष्टपणे लक्षात येते. कारण राजकारणासोबत सामाजिक उपक्रम हा सेनेचा पाया आहे. कोणाच्याही मदतीला धावून जाणे, हा स्थायीभाव अजून बऱ्यापैकी टिकून आहे. मात्र, केवळ स्थान घसरणार नाही, भाजपविरोधातील शक्ती साथ देतील, त्या बळावर टिकून राहू असे समजत शिवसेनेतील काही स्थानिक नेते, पदाधिकारी वागत असतील तर ते साफ चुकीचे ठरेल. कारण संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतीही संस्था जेवढी बाहेरच्या हल्ल्यांनी क्षीण होत नाही तेवढी ती अंतर्गत लाथाळ्यांनी पोखरली जात असते आणि एक दिवस तिचा डोलारा कोसळतो. अशा लाथाळ्या, धुसफुशी राजकीय पक्षांत असतातच. नेत्यांचे गट-तट असतात. त्यांच्यात कार्यकर्ते भरडले जातात. पण औरंगाबादमध्ये (इतर ठिकाणीही अशीच स्थिती असावी.) महिला आघाडीची अवस्था त्यापेक्षा बिकट झाली की काय, अशी शंका येत आहे. एकेकाळी लोकहिताच्या प्रश्नांवर प्रशासनात दरारा निर्माण करणारी आघाडी आज नेत्यांमधील संघर्षात अडकली आहे. सामाजिक प्रश्नांमधील त्यांचा सहभाग आक्रमक राहिलेला नाही किंवा महत्त्वाच्या प्रश्नांची हाताळणी करताना महिला आघाडीचे अस्तित्व फक्त घोषणा देण्यापुरतेच ठेवले जात आहे. दहा दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले असताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला. तो पुरुष मंडळीनी हाणून पाडला. हा प्रकार तर शिवसेनेच्या संस्कृतीला पूर्णपणे धक्का देणारा आहे. प्रारंभीच्या काळात शिवसेनाप्रमुखांना कोणीही, कधीही भेटू शकायचे. व्यथा मांडण्याची मुभा प्रत्येकाला होती. ती जर आता मिळणार नसेल आणि त्यातही पक्ष बांधणीत, उभारणीत ज्या महिलांचे मोठे स्थान आहे त्यांनाच सर्व स्तरांतून डावलले जात असेल तर पक्षाच्या स्थान घसरणीला हातभारच लागणार आहे. अर्थात अजून स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. शिवसेना म्हणजे कुटुंब अशी भावना असलेल्या नेत्यांची मोठी संख्या शिवसेनेत आहे. नेमकं काय चुकतंय, हेही त्यांना पक्के ठाऊक आहे. आंदोलनात आम्ही पुढे आणि सत्तेच्या वाट्यात मागे का, असा महिलांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर शोधून काही जणींना संधी देण्याचा प्रयत्न केला तर ही शक्ती पक्षासोबत कायम राहील. दुसरीकडे सत्तेच्या वाट्यात आपल्याला का डावलले जाते, याचाही विचार महिला आघाडीला करावा लागणार आहे. राजकारणाचा अभ्यास, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठी लागणारे बळ महिलांना वाढवावे लागणार आहे. आपण घोषणा देण्यासोबत घोषणा तयार करणाऱ्या आहोत. मतदार आमच्याही पाठीशी आहेत, हे त्यांना नेत्यांना दाखवून द्यावे लागणारच आहे. तशी तयारी त्यांनी आतापासून केली तर सत्तेची पदे काही जणींकडे नक्कीच चालून येतील, याविषयी शंका नाही. मात्र, अशा कर्तृत्ववान महिलांना गटबाजीत चिरडून टाकण्याची मनोवृत्ती पुरुष नेतेमंडळी बाजूला ठेवतील, अशीही महिला आघाडीची अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment