Saturday 5 August 2017

मोर्चा त्यांचा, उजळणी यांची

शनिवारी औरंगाबादेतएमआयएमने काढलेला मोर्चा म्हणजे या पक्षाने स्वत:साठी घेतलेली एक छोटेखानी परीक्षाच होती. त्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आपले नेमके काही चुकत आहे का, हे जाणून घेण्याची आणि मागे वळून पाहण्याची उजळणीही होती. गोरक्षकांनी देशभरात मांडलेल्या उच्छादामुळे अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्वीदेखील संघर्ष, हल्ल्याच्या घटना कमी- अधिक प्रमाणात घडत होत्याच. पण त्याला सरकारचे संरक्षण नव्हते. हल्लेखोरांवर कारवाई होईल, असा विश्वास होता. आता तो राहिला नाही. कारण सरकारी पातळीवर हल्ल्यांचा साधा निषेधही होत नाही, असे म्हणत विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयएम या मुस्लिम हित जोपासणाऱ्या (अलीकडे त्यात दलितांचाही समावेश झाला आहे.) पक्षाने औरंगाबादेत शनिवारी खामोश मोर्चा काढला. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीच मोर्चाचे नेतृत्व केले. निमित्त गोरक्षकांचा उच्छाद आणि केंद्र राज्य सरकारच्या अल्पसंख्याकविरोधी धोरणाचे असले तरी त्यातून औरंगाबादेत तीन वर्षांपूर्वी निर्माण केलेले अस्तित्व कितपत कायम आहे, याचीही चाचपणी झाली. तेव्हा मनपा निवडणुकीत जे लोक सोबत होते त्यातील किमान ७० टक्के अजूनही एमआयएमसोबत असल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: तरुण वर्गामध्ये एमआयएमविषयी असलेले आकर्षण कायम अाहे, असा निष्कर्ष नेत्यांनी काढला असल्यास तो चुकीचा ठरणार नाही. २०१५ पर्यंत औरंगाबादेतील मुस्लिम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठीशी होते. एमआयएमने २०१४च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात विजय मिळवला. इम्तियाज जलील तेथून आमदार झाले. औरंगाबाद पूर्वमध्ये विजयाच्या दारात उभे राहून डॉ. गफ्फार कादरी यांना परत फिरावे लागलेे. त्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही. विधानसभेचे गणित वेगळे आणि मनपाचे वेगळे, असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात घडले उलटे. इम्तियाज, डॉ. कादरी यांच्या नेतृत्वात एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पतन केले. कारण निवडणूक लढण्यासाठी जी काही पूर्वतयारी करावी लागते, लोकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करावे लागते आणि ते टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रश्न सोडवावे लागतात, याचाच विसर या नेत्यांना पडला होता. खरे तर कोणत्याच राजकीय पक्षासाठी पूर्वीचे म्हणजे धर्म, जातीच्या नावाखाली मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस राहिलेले नाहीत. शिवसेना-भाजपची भीती दाखवून काही काळ मतदार जवळ येतीलही. पण त्यांना शेवटी पाणी, वीज, रस्ते, सफाई अधिक महत्त्वाची आहे. नेमक्या याचा मुद्द्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले. त्याचा अचूक फायदा आमदार इम्तियाज यांनी घेतला. अनेक वर्षे पत्रकार म्हणून काम केल्यामुळे आणि मुळातच औरंगाबाद शहराच्या विकासाविषयी संवेदनशील असल्याने इम्तियाज यांच्याविषयी लोकांमध्ये ते एमआयएमचे असूनही एक वेगळ्या प्रकारची सहानुभूती आहे. त्याचाही परिणाम झालाच. एमआयएमने मनपात घवघवीत यश मिळवल्यानंतर शहराचे सामाजिक संतुलन बिघडवले जाईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, इम्तियाज यांनी अतिशय जागरूकतेने त्याकडे लक्ष ठेवले. कोणत्याही प्रसंगात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होणार नाही, प्रक्षोभक वक्तव्ये केली जाणार नाहीत, याची काळजी त्यांनी गेल्या तीन वर्षांत घेतली आहे. एवढेच नव्हे, तर विकासाच्या कामात शिवसेना-भाजपची मदत घेण्यात किंवा त्यांना मदत करण्यात काहीही गैर नाही, अशी जाहीर भूमिकाही घेतली. त्यावरून त्यांच्यावर झालेल्या टीकेचे वारही सहन केले. पण यामुळे एमआयएमचा मुस्लिम समाजातील पाया डळमळीत होत असल्याची चर्चा होती. त्यात फारसे तथ्य नसल्याचे शनिवारचा मोर्चा सांगतो. मात्र, राष्ट्रवादीसह काँग्रेसची नेते मंडळी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मुस्लिम मतदारांची एमआयएमने निराशा केली असून ते लवकरच स्वगृही परत येतील, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, केवळ राजकीय वक्तव्ये करून किंवा मोर्चातील गर्दीचे आकडे फसवे आहेत, असे सांगून काहीही पदरात पडणार नाही. त्याऐवजी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी लढावे लागणार आहे. ही लढाई लुटुपुटूची ठरता कामा नये. वॉर्डातील छोट्या-मोठ्या समस्यांसाठी वारंवार महापालिकेवर धडका माराव्या लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादीकडेही सामाजिक, नागरी समस्यांची जाण असणारे काही कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामागे बळ उभे करावे लागणार आहे, तर आणि तरच एमआयएमला धक्का देऊन औरंगाबाद शहराचे भले करता येईल. 

No comments:

Post a Comment