Tuesday 27 February 2018

कोळशाच्या खाणीत

मराठवाडा म्हणजे मागास, आळशी लोकांचा आणि 
गरिबीच्या कुंपणावर वाढणारा प्रदेश. जातीवादाने 
मुळापासून पोखरलेला. विकासाच्या कामापेक्षा स्वतःची
तुंबडी भरण्यात गर्क असलेल्या पुढाऱ्यांचा प्रांत. 
कला-साहित्याच्या क्षेत्रातही जेमतेम प्रगती असलेला भाग.
अशी मुंबई-पुण्याकडे प्रतिमा. राजकारण, समाजकारणात 
ती खरी असेलही. पण कला प्रांतात एकदम वेगळे चित्र आहे. 
इथल्या कोळशाच्या खाणीत हिरेच हिरे आहेत. दिवसेंदिवस
ते अधिक संख्येने सापडू लागले आहेत. मुंबई-पुणेकर 
जवाहिऱ्यांनी हात लावताच ते चकाकू लागले आहेत. त्याचे ताजे
उदाहरण म्हणजे झी गौरव या राज्यस्तरीय सोहळ्यासाठी
जाहीर झालेली नामांकने. गेल्या अनेक वर्षांपासून झी गौरव
पुरस्कार मिळणे म्हणजे रंगकर्मींसाठी पंढरपूरचा विठोबा
भेटल्यासारखे वाटते. अगदी नामांकन झाले तरी विठ्ठल रखुमाईचे
दर्शन मिळाल्याची भावना असते, असे म्हटले तरी 
वावगे ठरणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. त्यात यंदा नाट्य
लेखन विभागात औरंगाबादचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि 
ज्यांच्याकडे सर्वच क्षेत्रातील लोक आदराने बघतात असे
प्रा. अजित दळवी यांना `समाज स्वास्थ्य` या नाटकासाठी
मानांकन मिळाले आहे. प्रा. दळवी अनेक वर्षांपासून नाट्य-चित्रपट
वर्तुळात आहेत. साधी राहणी आणि नाविन्यपूर्ण विचारांची मांडणी
यामुळे त्यांचा दबदबा आहे. ते केवळ मराठवाड्यातीलच नव्हे 
तर एकूणच मराठी नाट्य लेखकांच्या ज्येष्ठ पिढीचे प्रतिनिधी आहेत. 
त्यामुळे त्यांचे नामांकन होणे, ही औरंगाबादकर आणि तमाम
मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आधीच 
म्हटल्याप्रमाणे प्रा. दळवी यांनी नाट्य लेखन करताना कायम
समाजापुढे एक स्वतंत्र दृष्टीकोन ठेवला आहे. आपल्या बापाचं 
काय जातं, डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकात आणि संत तुकाराम,
काय द्याचं बोला, मीराबाई नॉट आऊट या चित्रपटांमध्ये ते 
स्पष्ट होतं. `समाज स्वास्थ्य` नाटकात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारणांसाठी लढणाऱ्या डॉ. र. धों. कर्वे यांचे कार्य
रंगमंचावर आणले आहे. म्हणून त्याचे वेगळे महत्व आहे.
लेखनाच्याच विभागात एक नामांकन अरविंद जगताप या 
तरुण पिढीतील अत्यंत संवेदनशील कलावंताला `स्टॅच्यू ऑफ लिबर्टी`
नाटकासाठी मिळाले आहे. अरविंददेखील प्रा. दळवी यांच्याप्रमाणेच
सामाजिक, राजकीय भान असलेला मधल्या पिढीचा लेखक. 
साधारण 20-22 वर्षापूर्वी त्याचा पाया औरंगाबादेतील सरस्वती भुवन
कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात तयार झाला. प्रा. डॉ. दिलीप
घारे, प्रा. यशवंत देशमुख आणि इतर मातब्बर प्राध्यापकांच्या सहवासात
त्याच्या धारणा पक्क्या होत गेल्या. सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक 
विसंगतीवर तुफानी हल्ला चढवत भारतीय, मराठी माणसाचा दांभिकपणा उघड 
करण्यात आणि चांगुलपणाही ओलावलेल्या शब्दांत सांगण्यात त्याचा हात
सध्यातरी कोणी धरू शकणार नाही, अशी स्थिती आहे. स्टॅच्यू ऑफ 
लिबर्टीमध्ये त्याने महापुरुषांच्या आडून जाती व्यवस्था जोपासणाऱ्या
आणि स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांवर आसूड  ओढला आहे. व्यावसायिक
रंगमंचावर हे नाटक सध्या जोरदार यश मिळवत आहे.
नामांकनातील तिसरे नाव आहे चैतन्य सरदेशपांडे. मराठवाड्यातील
लेखकांच्या तिसऱ्या म्हणजे अगदी तरुण पिढीचा प्रतिनिधी असलेल्या
चैतन्यने लिहिलेले आणि अभिजित झुंझारराव दिग्दर्शित `माकड` हे स्वामी
समर्थ आर्टस्‌ निर्मित नाटक सध्या रसिकांना कमालीचे आवडले आहे. 
लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या भारतात सामान्य माणूसच लोकशाहीने 
टाकलेल्या खऱ्या जबाबदारीपासून दुरावत चालला आहे. त्याचे हे 
दुरावलेपण समाजाचा पाया कसे खचवत आहे, याची अतिशय चपखल, 
वेगवान मांडणी चैतन्यने केली आहे. आता तो पुणेकर असला तरी 
त्याची जडणघडण औरंगाबादचीच आहे. त्याचे वडिल धनंजय 
सरदेशपांडे म्हणजे औरंगाबादचे रंगकर्मी  आणि उत्तम लेखक. 
त्यांच्या रोपण खड्डा ओपन या एकांकिकेने १९८० च्या दशकात
धूम उडवून दिली  होती. त्यांनी लिहिलेली बालनाट्ये गेल्या काही
वर्षांपासून राज्य स्पर्धेत सादर होत असतात. म्हणजे काही वेळा तर
दिवसभरातील सहापैकी पाच बाल नाट्ये धनंजय सरदेशपांडे लिखित
असतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चैतन्यवर बालपणापासून
सामाजिक भानाचा संस्कार झाला. शिवाय नाट्य लेखनासाठी आवश्यक
असणारी कौशल्ये उपजतच प्राप्त झाली. त्यावर त्याने स्वानुभावाची, 
निरीक्षणांची, मतांची भर टाकत `माकड`चे लेखन केले आहे. तो एकदम
उत्तम अभिनेता म्हणूनही नावारुपाला येत आहे. एकूणात औरंगाबाद, 
मराठवाड्याशी नाळ असलेल्या तिन पिढ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रा. दळवी, 
अरविंद जगताप, चैतन्य सरदेशपांडे यांच्याकडे पाहावे लागेल. असा त्रिवेणी
संगम घडवून आणणाऱ्या या तिघांमधील आणखी एक समान धागा 
म्हणजे नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते चांगल्या अर्थाने
समाजमन घडवण्याचे, नवीन दिशा देण्याचे माध्यम आहे. याबद्दल 
त्यांच्या धारणा पक्क्या आहेत. आणि ते त्याच दिशेने ठामपणे वाटचाल
करत आहेत. ही वाटचालच या हिऱ्यांना आणखी झळाळी देईल, 
याविषयी शंकाच नाही.

No comments:

Post a Comment