Thursday 3 May 2018

अदूरांचे सूर : ‘महागामी’चे बळ


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सिनेमा दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्याशी संवाद कार्यक्रमासाठी रविवारी म्हणजे २९एप्रिलला सकाळी थोडासा वेळेपूर्वी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात पोहोचलो. तेव्हा तिथे अक्षरशः शुकशुकाट होता. तीन तंत्रज्ञ वगळता चिटपाखरूही नव्हते. जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यावर आधारित चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या, महागामी गुरुकूलच्या संचालिका पार्वती दत्ता थोड्यावेळाने आल्या. त्यांनाही सभागृहातील सामसूम जाणवली. मग एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, चित्रपट – नाट्य विभागाची धुरा सांभाळणारे शिव कदम, प्रख्यात प्रकाशक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर आले. त्यांनीही अल्प प्रतिसादाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. पण म्हणतात ना की काही ठिकाणी लोक कमी असले तरच कार्यक्रम अधिक रंगतदार होतो. तसेच इथेही झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय उच्च दर्जाची कामगिरी बजावूनही पाय जमिनीवर असलेल्या गोपालकृष्णन यांनी त्यांची विविध विषयांवरील मते अतिशय सौम्य शब्दांत पण ठामपणे मांडली. त्यातील एक मत म्हणजे कला क्षेत्रातील सर्वांसाठी मार्गदर्शक तत्वच होते. ते म्हणजे कठोर साधनेशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे बऱ्याचवेळा विशेषतः नाट्यक्षेत्रात असे होते की, एक-दोन एकांकिकांमध्ये चमकदार कामगिरी होते. बक्षिसेही मिळतात. की लगेच तो कलावंत किंचित फुगून जातो. त्याच अवस्थेत मुंबईला दाखल होतो. तिथे अमाप संधी असल्याने दोन-चार कामे मिळतात आणि त्याच लयीत तो वाटचाल करू लागतो. त्याची प्रगती विशिष्ट उंचीवर जाऊन थांबते. मग काही वर्षानंतर आपले मूळ काय होते, याची शोधाशोध सुरू केल्यावर ते सापडता सापडत नाही. सापडलं तरी हाताला लागत नाही. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कठोर, सखोल साधना हाच पुढील दीर्घ यशाचा मार्ग आहे. स्वतः अदूर गोपालकृष्णन यांनी ते केले आहे. त्यांच्या अनुभवातून आलेले हे बोल कलावंत मंडळींनी आत्मसात करावे असेच आहेत. त्यांचा दुसरा मुद्दा चर्चेचा, वादाचा ठरणारा आहे. ते म्हणाले की, बॉलिवूडवाल्यांना मुर्ख प्रेक्षक हवे आहेत. आणि बॉलिवूडवाल्यांनी आयटम साँगमधून नृत्यात अश्लिलता आणली आहे. पण बॉलिवूडमध्ये अलिकडील पिढी तर खूप नाविन्यपूर्ण आणि प्रेक्षकांना पुढे नेणारे विषय मांडत आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरी वर्षागणिक ते वाढत आहे. बरं, गोपालकृष्णन बॉलिवूडवाल्यांवर हल्ला चढवून थांबले असते तर तेही आपण समजून घेतले असते. पण त्यांनी मराठी सिनेमे मात्र खूपच दर्जेदार आणि सकस निघत असल्याचे म्हटले. मराठी इंडस्ट्रीत दरवर्षी निघणाऱ्या सिनेमांची सखोल माहिती घेतली तर ते वरवरचे किंवा मराठी मनाला खुश करण्यासाठी काहीतरी बोलले, असे दिसते. अर्थात लोकांना आवडते ते द्यायचे की लोकांना आवडेलच अशी निर्मिती करायची, अशा दुहेरी फेऱ्यात बहुतांश कलावंत अडकलेले असतातच. हेही त्यांना पुरते ठावूक होते. म्हणून त्यांनी अचूक निर्णय घेण्याचा मार्गही सुचवला. ते म्हणाले की, तुम्हाला स्वतःला जे मनापासून आवडते. त्याच्यातच जीव झोकून द्या. तेच अविष्कृत करत राहा. काही काळानंतर ते लोकांना निश्चितच पसंत पडेल. त्याचा ट्रेंडही प्रस्थापित होईल. आता गोपालकृष्णन यांच्याशी चर्चेतील तिसरा मुद्दा म्हणजे बॉलिवूडमधील आयटम साँगचा. तुम्ही यु ट्युबवर जाऊन ‘इंडियन डान्स इन फॉरेन’ असे सर्च केले. तर इंग्लंड, अमेरिका, फिनलंड, रशिया, स्पेन अशा असंख्य देशातील टॅलेंट स्पर्धेत बॉलिवूडमधील नृत्ये, गीतेच सादर झाली असल्याचे दिसते. केवळ ती सादरच झालेली नाहीत तर त्यांना तेथील रसिक, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बॉलिवूडचा महिमा नाकारण्यात काहीच अर्थ नाही. समांतर चळवळीतील चित्रपटांनी कायम भारतीय समाजाचे एक रुप जगापुढे ठेवले. तर अलिकडील बॉलिवूड सिनेमांनी संपन्न संस्कृती, झगमगता समाज दाखवला. समांतर काय किंवा मसाला काय दोन्ही संपूर्णपणे खरे नाही आणि दोन्ही खोटे नाही. ज्याला जे पाहावेसे वाटते. त्याने ते पहावे. तर मूळ मुद्दा असा की शास्त्रीय, लोकनृत्यांनी भारताची संस्कृती परदेशात नेली. तिची ओळख करून दिली. पण त्यातील वेग, ठेका, चमकदारपणा बॉलिवूडनेच जगाला दाखवून दिला आहे. आणि एकदा दाखवून द्यायचे अन्‌ जिंकायचे आहे, असे म्हटल्यावर त्यात विक्रीचा भाव आला. आणि विक्रीसाठी बाजारात उतरलात की वस्तू आपल्या हातात राहतच नाही. त्यातील मूल्य झपाट्याने घसरत जाते. दिसेनासे होते. त्यामुळेच गोपालकृष्णन यांचा आक्षेप आहे. कोरिओग्राफीच्या नावाखाली तुम्ही अंगप्रदर्शन कसे करू शकताॽ द्विअर्थी शब्दांवर शरीराला प्रचंड झटके का देताॽ तुमची नृत्ये प्रेक्षकांना उद्दीपित करणारीच का असतात, हा त्यांच्या मत मांडणीमागील मूळ गाभा होता. बॉलिवूडवाले काहीही करत असले तरी मूळ प्रवाहातील, भारतीय कलांची जोपासना करणाऱ्यांनी त्यात वाहून जाऊ नये. कारण जेव्हा पुढे कधी मूळ शोधणे सुरू होईल. तेव्हा सर्वांना शास्त्रीय नृत्य, लोकपरंपरांच्या मूळाकडेच यावे लागणार आहे, असे त्यांनी मांडले. आणि याचा खरेच गांभीर्याने विचार झाला पाहिजे. किमान सध्या जी मंडळी नृत्य क्षेत्रात काम करत आहेत. नृत्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांनी तर यासाठी निश्चित धोरण स्वतःच्या पातळीपुरते का होईना ठरवलेच पाहिजे. म्हणजे मी डोळ्यांना सुखावणारे, मनाला आनंद देणारेच नृत्य सादर किंवा दिग्दर्शित करेन असे कलावंतांनी ठरवले आणि मी शरीराला झटके देणारे, भावना प्रक्षुब्ध करणारे नृत्य पाहणारच नाही, असे रसिकांनी ठरवले तर हे चित्र हळूहळू का होईना निश्चित बदलेल. कायम नाविन्याचा विचार करत, सर्व प्रकारची टीका झेलत वाटचाल करणाऱ्या महागामीच्या संचालक पार्वती दत्ताही त्यासाठी खूपच आग्रही आहेत. उच्च मूल्यांच्या आधारावरच भारतीय नृत्य कला टिकणार, वाढणार आहे. यावर त्या ठाम आहेत. त्यामुळेच संथगतीने का होईना महागामीचे वर्तुळ विस्तारत आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण निर्मितींना रसिकांची भरभरून दाद मिळत आहे. आता दत्ता यांनी नृत्य क्षेत्रातील सर्वांना हृदयापासून आपुलकी, आदराच्या भावनेने खरेच सोबत जोडले. इतरांसाठीही कायम मदतीची भावना ठेवून ती प्रत्यक्षात आणली तर गोपालकृष्णनांच्या बोलण्यातील सूर महागामीला आणखी बळ देतील. आणि महागामीसारखी उच्च मूल्याधारित, मोठे आर्थिक पाठबळ असलेली संस्था विस्तारत गेली तर त्याने औरंगाबादच्या वैभवातही भर पडेल, याविषयी शंकाच नाही.

No comments:

Post a Comment