Tuesday 29 May 2018

सातत्य असेल तरच

औरंगाबादने मराठी, हिंदी कला जगताला अनेक उत्तम कलावंत, लेखक, दिग्दर्शक मिळवून दिले. आता या शहरातील नव्या कलावंतांना फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण मिळण्याची सुविधा एमजीएमने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. यातून निश्चितच कलेचा प्रांत उजळून निघेल. एरवी अनेकजण सभा, समारंभांमध्ये बोलताना कला क्षेत्रात नवनवे प्रयोग झाले पाहिजेत. मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हणतात. प्रत्यक्षात त्यासाठी फारसे काही करत नाहीत. पण एमजीएमने हे केले. त्याबद्दल एमजीएमचे सर्वेसर्वा अंकुशराव कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भार मानावे तितके कमी आहे. आपण केवळ कलावंतासाठी बोलत नाही तर करून दाखवतो, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी आणि तरुण पिढीतील अभ्यासू चित्रपट दिग्दर्शक अशी ओळख असलेले शिव कदम यांच्यावर कदम यांनी फिल्म मेकिंग विभागाची धुरा सोपवली आहे. हेही महत्वाचे आहे. कारण कदम यांना मराठवाड्याची संस्कृती, येथील तरुण कलावंतांच्या क्षमता, अपेक्षा बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे सातत्याने अगदी दरमहा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. तर फिल्म मेकिंग विभागाचे योगदान इतिहासात नोंदवले जाईल. कदम यांनी या दृष्टीनेच आखणी आणि पुढील वाटचाल करावी, अशी अपेक्षा आहे. सातत्याचा कॅमेरा हाच त्यांच्या वैयक्तीक यशाचाही मार्ग असेल. त्यांच्याकडे चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक अंगांविषयी बराच अनुभव आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी चांगला परिचय आहे. या सगळ्याचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिव कदम यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्यांच्यावरच या विभागाचे, अभ्यासक्रमाचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यांना या कामात प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर मदत करणार आहे. फिल्म मेकिंगसाठी प्रवेशाकरिता सुमारे 650 जणांनी विचारणा केली होती. त्यातील 50 जणांची कार्यशाळा कदम, कार्येकर यांनी घेतली. त्यापैकी 20 जणांची निवड केली जाणार आहे. एवढी मोठी चाळणी लागली असल्याने ज्यांना खरंच चित्रपट क्षेत्रात स्वारस्य आहे. तंत्र जाणून घ्यायचं आहे, अशीच मुले वीस जणांत असतील, असे वाटते. अर्थात फिल्म मेकिंग अभ्यासक्रम म्हणजे केवळ अभियन, लेखन, दिग्दर्शन एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर त्यात साऊंड रेकॉर्डिंग, स्र्क्रीन प्ले रायटिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा अनेक तांत्रिक अंगांचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. खरेतर हा अभ्यासक्रम विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात अपेक्षित होता. पण तो एमजीएममध्ये सुरू होत असेल तरी त्याचे स्वागत करावे लागेल. शेवटी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणे महत्वाचे आहेच. सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्म मेकिंग म्हणजे थेट चित्रपट किंवा टीव्ही मालिका अशी मर्यादा राहिलेली नाही. कंपन्यांची उत्पादने, सामाजिक समस्यांची मांडणी, दिग्गजांच्या ऑटोबायोग्राफी यातही कॅमेरा कमाल करू शकतो. त्यातून बराच पैसाही मिळू शकतो. काळाची गरज लक्षात घेता हा अभ्यासक्रम योग्यवेळी सुरू झाला असे वाटते.  
कदम कुटुंबियांनी 1980 च्या दशकात औरंगाबादच्या शैक्षणिक वर्तुळात प्रवेश केला. तेव्हा एक राजकारणी पैसा, प्रतिष्ठा कमावण्यासाठी आल्याची चर्चा सुरू झाली. कारण सिडकोतील कोट्यवधी रुपये किंमतीची जागा कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार यांच्यामुळे कदमांच्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टला नगण्य किंमतीत मिळाली होती. म्हणून एमजीएम ट्रस्ट शिक्षणाचा बाजार सुरू करणार, असा सूर त्यावेळी लागला होता. अर्थात कदम बडे राजकारणी. औरंगाबादेत इतर शिक्षण संस्थांचे संचालक समाजवादी, डावे किंवा काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर चालणारे. त्यामुळे सूर नेहमीच दबक्या आवाजातील होता. तरीही त्यात तथ्य नव्हते, असे म्हणता येणार नाही. कारण खासगी मेडिकल, इंजिनिअरिंग महाविद्यालयांची दारे एमजीएमनेच त्या काळात उघडी केली. शेकडो उत्तम अभियंते, डॉकटर खासगीकरणाच्या वाटेने तयार झाले. त्यातून एमजीएमच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. कोट्यवधींची उलाढाल करणारे नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले. कदम कुटुंबांचा रुतबा उंचावला. कारण त्यांनी शैक्षणिक जग कवेत घेताना बऱ्याच प्रमाणात जनसेवा कायम ठेवली. अत्यल्प मोबदल्याच्या अपेक्षेनेही काही केले पाहिजे, याकडे लक्ष दिले. जर्नालिझम, नाट्यशास्त्र. महागामी (शास्त्रीय नृत्य) असे फार उलाढाल नसलेले विषय त्यामुळेच सुरू झाले. नाट्यशास्त्र विभागात त्यावेळी प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी अनेक प्रयोग केले. हा विभाग नावारुपालाही आणला होता. विविध स्पर्धांमधून बक्षिसेही मिळवली. प्रख्यात कलावंत प्रा. डॉ. दिलीप घारे यांनीही बरेच योगदान दिले. पण हे दोघेही एमजीएममधून बाहेर पडल्यावर सगळेच थंडावले होते. आता फिल्म मेकिंगमुळे कॅमेऱ्यासाठी लेखन, दिग्दर्शन अभिनय करू इच्छिणाऱ्यांना नव्या जगात प्रवेश करता येईल. काही उत्तम तंत्रज्ञ तयार होतील. कॅमेरा हे प्रचंड ताकदीचे माध्यम आहे. अलिकडे मोबाईलमधील कॅमेराही चक्कपैकी छोटेखानी फिल्म चित्रित करू लागला आहे. त्याला फक्त कल्पक दिशा दिली की तो साऱ्या चौकटी मोडून टाकतो. नवे अद्‌भुत जग निर्माण करत नजरा खिळवून टाकतो. अशा चौकटी मोडत आणि नवे विश्व निर्माण करणारे कलावंत सर्वांना पाहायचे आहेत. शिव कदम आणि त्यांचे सहकारी ही संधी मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.


No comments:

Post a Comment