Friday 15 June 2018

कहाणी नायकाची पण...

समाज कायम नायकाच्या शोधात असतो. पण याच समाजातील मोठा वर्ग खलनायकाच्याही प्रेमात पडतो. त्याच्याभोवतीच गुंतून राहतो. ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ हे अफलातून पुस्तक वाचतानाही अशीच गुंतवणूक होते. आपल्याकडे एक प्रवाह उघड किंवा छुपेपणाने खलनायकाबद्दल आपुलकी, आकर्षण ठेवून असतो. वाईट असल्याशिवाय चांगल्याचं महत्व कळत नाही. कौरव होते म्हणून पांडवांची इतिहासात नोंद झाली. रावण नसता तर रामाचे काय झाले असते, असेही प्रश्न या प्रवाहातून, वर्गाकडून उपस्थित केले जातात. रावणाची मानसिकता समजावून घ्यावी. त्याने उगाच सीतेला पळवून नेले नाही. तो देखील दशग्रंथी ब्राह्मण होता. विलक्षण बुद्धीमान होता. त्याने रामाशी वैर का पत्करले, याचाच अभ्यास केला पाहिजे. सगळेच रावणाचे चुकले असे म्हणता येणार नाही. उलट रामच आक्रमक, पत्नीवर ‌अन्याय करणारा होता, असेही सांगितले जाते. रावणालाच नायक घोषित केले जाते. दक्षिण भारतातील तीन राज्यांचे सरकार तब्बल २० वर्षे हलवून टाकणाऱ्या कुसे मुनिस्वामी वीरप्पनबद्दलही हेच झाले आहे. सुमारे ६५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या घनदाट जंगलात त्याचा वावर होता. चंदन अन्‌ हस्तिदंताच्या चोरीत तो कुख्यात होता. त्याने थोड्याथोडक्या नव्हे १२४ जणांची पाशवी हत्या केली. कन्नड चित्रपटांचे सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केल्यावर तो जागतिक पातळीवर पोहोचला होता. पण तत्पूर्वीच त्याला प्रसारमाध्यमांनी हिरो करून टाकले होते. त्याच्याविषयीच्या बातम्या मीठ मसाला लावून त्या पेरल्या, उगवल्या गेल्या. एकेकाळी तमाम पोलिस दलाला झुकांड्या देणारा वीरप्पन एका दैनिकाच्या संपादकाला मुलाखती देत होता, यावरून त्याचे माध्यमांवरील प्रेम आणि पकड लक्षात येते. शिवाय माध्यमांनाही खलनायकालाच नायक करण्याची किती मनापासून आवड असते, हेही स्पष्ट होते. असे होण्यामागे एक कारण असते की, आपला समाजच मुळात ढोंगी आहे. तो त्याची मते स्पष्टपणे, निधड्या छातीने फारच क्वचितपणे व्यक्त करत असतो. त्याचे वागणे, बोलणे आणि खरीखरी मते यात बऱ्याचवेळा अंतर असते. खलनायकातील लढाऊ वृत्तीचे, सरकारी यंत्रणेविरुद्ध रक्तपात करण्याच्या धाडसाचे समाजाला कमालीचे आकर्षण असते. म्हणून चित्रपटातील गब्बरसिंग, लॉयन, मोगँबो असे खलनायकही व्यक्तिरेखा, अभिनयाच्या पलिकडे जाऊन लोकप्रिय होऊ लागतात. हे तर समाजाचे, प्रसारमाध्यमांचे झाले. पण ज्या अधिकाऱ्याने वीरप्पनच्या जीवनाची अखेर केली. त्यानेच लिहिलेल्या पुस्तकातूनही वीरप्पनविषयी आकर्षणाचा, प्रेमाचा गंध पसरत असेल तर त्याला काय म्हणावे? पण तसे घडले आहे. वीरप्पनला यमसदनाला पाठवणारे तमिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख के. विजयकुमार यांनी लिहिलेल्या ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ या राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकात ते जाणवत राहते. पण यात विजयकुमार यांचा मुळीच दोष नाही. कारण प्रसारमाध्यमांनी वीरप्पनची निर्माण केलेली प्रतिमा मोडून काढण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्नही केला. तशी शब्दरचना, मांडणी केली आहे. वीरप्पनविरोधात लढलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या शौर्यकथा तपशीलासह सांगितल्या आहेत. पण तरीही...तरीही वाचकाचे मन खलनायकाच्या भोवतीच एका सुप्त आपुलकीने फिरत राहते. कारण पोलिस दल, सरकार म्हणजे कमालीच्या भ्रष्ट, किडलेल्या यंत्रणा आहेत. त्या सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठी निर्माण केल्या असल्या तरी प्रत्यक्षात गोरगरिब, सामान्यांना पिळून काढणाऱ्या, छळणाऱ्याच आहेत, याची पूर्ण खात्री लोकांना झाली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वीरप्पनविषयीच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक खऱ्या, खोट्या कहाण्या या ना त्या मार्गाने आधीच पोहोचल्या आहेत. एक डाकू २० वर्षे तीन राज्यांच्या सरकारांना सळो की पळो करून सोडतो. पण त्याचवेळी तो गोरगरिबांना मदत करत राहतो. आणि शेवटी जिवंत पकडला जात नाहीच. त्यामुळे तर त्याच्या धाडसाविषयी अप्रूप, कौतुक, आकर्षणाचा धागा बांधला जाणे अपरिहार्य आहे. तोच धागा ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ पुस्तकात मजबूतीने बांधला गेल्याचे जाणवत राहते. म्हणूनच हे पुस्तक कमालीचे वाचनीय आणि विलक्षण रंजक झाले आहे. प्रास्ताविकात के. विजयकुमार यांनी लिहिलेली ‘लपणारी टीम आणि शोधणारी टीम यांच्यातील खेळात नव्वद टक्के वेळा जिंकते ती लपणारी टीम’ ही पहिलीच ओळ मेंदूत एखादी गोळी घुसून बसावी तशी घुसते. ती पुस्तकातील शेवटची ओळ संपल्यावर आणखीनच खोलवर जाऊन ठसठसू लागते. काही पाने पुन्हा वाचण्यास भाग पाडते. एखादा चित्रपट पाहिल्याचा अनुभव देते. एवढी सगळी मांडणी प्रभावी, नाट्यमय झाली आहे. के. विजयकुमार यांनी अतिशय तमाम सरकारी फायली तपासून त्यातील नोंदीनुसार प्रामाणिकपणे लेखन केल्याने ते शक्य झाले आहे. वीरप्पनला कोंडीत पकडण्यासाठी त्याकाळी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी जीव जोखमीत टाकला. त्यांचीही माहिती त्यांनी दिली. एवढ्या कुख्यात डाकूला मारल्यानंतर त्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेण्याचे त्यांनी विनम्रपणे टाळले आहे. एवढेच नव्हे तर स्वतःकडून ज्या चुका झाल्या. त्याचीही मनमोकळी कबूली त्यांनी दिल्याने पानानिशी पुस्तकातील गुंतवणूक वाढत जाते. याचे श्रेय डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेल्या अनुवादालाही आहे. त्यांनी मूळ इंग्रजी मांडणीचा अतिरेकी प्रभाव मराठी वाचकांवर पडणार नाही. आणि लेखकाला जे गोळीबंद पद्धतीने जे सांगायचे आहे त्याला कोठेही धक्का न लावता सारे प्रसंग खूपच प्रभावीपणे आणले आहेत. पहिल्या १८९ पैकी १७५ पानांवर जागोजागी वीरप्पनची दहशत पसरवलेली आहे. ती मेंदूतील नस न् नस तटतटवते. पटकथा म्हणजे काय. ती कशी लिहावी. त्यात कसे बारकावे असावेत. पटकथेमधून व्यक्तिरेखा कशी विकसित होत जाते. त्याच्या भोवतीचे वातावरण पटकथाकाराला कसे उभे करायचे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे २८७ पानांचे पुस्तक आहे. नाटक, चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या तसेच अभ्यासकांनीही जरूर ते वाचावे, इतके त्याचे मूल्य नक्कीच आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी वाहव्वा, अशी दाद देण्यासारखी आहे. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर किमान दोन-तीन वेळा रेखाटने, फोटो बारकाईने नजरेखालून घालावेसे वाटतात, यातच भावसार यांची ताकद स्पष्ट होते. मुग्धा दांडेकरांची अक्षर जुळणी, डॉ. सुलभा बोरसे यांचे मुद्रीतशोधन पुस्तकाची उंची वाढवत नेते आणि एकूणात सारेच टीम वर्क जमून आल्याने वाचकाची टीम विजयी ठरते. 

No comments:

Post a Comment