Thursday 7 June 2018

नका ओलांडू रस्ता डोळे बंद ठेवून


तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद महापालिकेला डॉ. निपुण विनायक यांच्या रुपाने आयुक्त मिळाले आहेत. दिल्लीतून ते थेट औरंगाबादेत दाखल झाले आहेत. दिल्लीश्वर असले तरी त्यांचा मराठवाड्याशी चांगला परिचय आहे. नांदेड महापालिकेत त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. स्वच्छता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. नांदेडमध्ये असताना आवडीचा विषय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्यामुळेच तेथील गोदावरीचे घाट, गुरुद्वारा परिसर बऱ्यापैकी स्वच्छ झाला होता. प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन कामे करणे अनेक बड्या अधिकाऱ्यांना मनापासून आवडते. बरीच अवघड आव्हाने हे अधिकारी माध्यम प्रतिनिधींच्या मदतीने परतवून लावत असतात. काहीजणांच्यासमोर आव्हाने उभी करण्यासाठी माध्यमांची मदत घेत असतात. डॉ. निपुण मात्र अशा अधिकाऱ्यांपैकी नाहीत. आपण आपले काम करत राहायचे. माध्यमांनी दखल घेतली तर ठीक. नाही घेतली तर फार काही बिघडत नाही, असा त्यांचा स्वभाव आहे. दैनंदिन कामांची माहिती, प्रशासनातील अनुभव माध्यमांपेक्षा ब्लॉगवर शेअर करण्यात त्यांना रुची आहे. असे घडण्यामागे नांदेडमधील एक घटना कारणीभूत आहे. तेथे डॉ. निपूण स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम करत असताना तेथील एका पत्रकाराने त्यांच्याविषयी उलटसुलट लिखाण केले. वैयक्तीक अडचणी बाजूला ठेवून डॉ. निपूण वसाहतींमध्ये फिरत असल्याचे दिसत असूनही ते गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तेव्हापासून माध्यमांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. औरंगाबाद स्वतः अतिशय संथगतीने बदलणारे शहर असले तरी येथे येणारे बडे अधिकारी वेगाने बदलत जातात. त्यांच्या धारणा विरून जातात. त्यांचे सारे निश्चय ढासळतात. कार्यपद्धतीही बदलून जाते. जुन्या रस्त्यांनी चालणे टाळताच त्यांना काही नवेच मार्ग सापडू लागतात, असा अनुभव आहे. त्यामुळे येथे  डॉ. निपुण यांनी माध्यमांबद्दलचा दृष्टीकोन बदलावा, अशी अपेक्षा आहे. कारण या शहराच्या विकासाची गती गेल्या काही महिन्यांपासून एकाच जागी थबकली आहे. ती पुढे नेण्यासाठी राजकारणी, प्रशासनासोबत माध्यमांचीही सकारात्मक मदत झाली तर डॉ. निपुण यांचे काम थोडे सोपे होईल. अर्थात हे करताना त्यांना एक पथ्य पाळावे लागेल. ते म्हणजे डोळे बंद ठेवून रस्ता ओलांडण्याची चूक करता येणार नाही. मूळ चंदीगडचे रहिवासी असलेल्या डॉ. निपुण यांना तेथील चौकोनी रस्त्यांची, शिस्तीच्या वाहतुकीची सवय असेल. इथे नेमके उलटे आहे. एकही चौक चौकोनात नाही. शिस्त ना वाहतुकीला आहे ना कामकाजाला. अगदी हिरवा दिवा लागला म्हणून तुम्ही निघालात तरी विरुद्ध बाजूचा माणूस त्याच्याकडील लाल दिवा असतानाही सुसाटत येऊन तुमच्यावर धडकत निसटू शकतो. आणि महापालिकेच्या कारभारात तर असे अनेकजण खास आयुक्तांवर धडकण्यासाठीच नियुक्त केले आहेत. नव्या आयुक्तांना जेरीस आणण्याच्या एकापेक्षा एक सरस युक्त्या केल्या जातात. लोकांनी मोठ्या विश्वासाने विकास कामांसाठी तिजोरीत जमा केलेला पैसा आपल्याच मालकीचा आहे, याची त्यांना पुरती खात्री पटलेली आहे. त्याच्या आड येणाऱ्यास ते सोडत नाहीत. म्हणून बांधकाम परवानगी, ठेकेदारांच्या बिलांच्या फायलीवर सह्या केल्या नाही की काही जुनाट, किचकट नागरी समस्या आयुक्तांपुढे उभ्या केल्या जातात. काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांना हव्या त्या ठेकेदाराला काम मिळाले नाही की समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष असे म्हणून मोर्चे काढले जातात. आंदोलने होतात. बिले मिळवण्यासाठी नगरसेवक अधिकाऱ्याला मारहाण करतात. काही अधिकारी नगरसेवकांच्या आडून थेट आयुक्तांवर हल्ला करण्याची हिंमत करतात.बऱ्याच वेळा आयुक्तसाहेब तुम्ही या रस्त्यावरून बिनधास्त डोळे झाकून जा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले जाते. आयुक्तांनी दोन पावले टाकून मागे वळून पाहिले तर सांगणारे गायब झालेले असतात. रस्त्याच्या टोकावर उभे राहून तेच पुन्हा ‘पहा ते आयुक्त. डोळे झाकून चालले आहेत. त्यांच्या डोळेझाकीमुळे विकास कामे थांबली आहेत,’ अशी ओरड करू लागतात. या साऱ्याला कंटाळून आयुक्त पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे वागू लागतात. (काही आयुक्त तर एवढे चलाख निघतात की तेच आल्या आल्या पदाधिकाऱ्यांना गाठून वाटाघाटी करतात. त्यांचा कार्यकाळ सुखाचा जातो.) मग हळूहळू प्रशासनावर मिळवलेली किरकोळ का होईना पकड ढिली होऊन जाते. कोट्यवधींच्या उलाढालीची, लाखो लोकांसाठी महत्वाची असलेली कामे रखडतात किंवा सुमार दर्जाची होऊ लागतात. तसे काही होऊ नये, असे डॉ. निपुण यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्यांनी सुनसान दिसणारा रस्ता डोळे बंद करून ओलांडण्याची चूक करू नये. हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांनी १५० कोटींच्या रस्ता कामाच्या निविदा पुन्हा काढण्याचे ठरवले आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी केलेल्या आग्रहामुळे फेरनिविदेत काही रस्ते वाढणार आहेत. एखादा माजी पदाधिकारी शहराच्या हिताचा एवढा विचार करतो, हे पाहून आनंद वाटला. आता तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी इतरांनी स्वीकारली पाहिजे. वर्षभरापूर्वी मिळालेल्या निधीचा अजूनही वापर झालेला नाही. कारण पहिल्यांदा निविदा काढताना फक्त एका ठेकेदाराचे हित पाहण्यात आले. म्हणून बाकीचे ठेकेदार कोर्टात गेले. त्यात विकासाचे काम थांबले. समांतर जलवाहिनी योजनेच्या १४४ कोटींचेही तसेच झाले आहे. आता पुन्हा रस्त्याची निविदा काढताना डॉ. निपुण यांनी सर्व प्रकारच्या वाटाघाटीचे प्रयत्न मोडून काढले पाहिजेत. ठेकेदारांच्या आडून घाव घालणाऱ्यांवर कठोर घाव घातलेच पाहिजेत. अगदी कोणी एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असो किंवा नेता, उपनेता असो त्याची गय करू नये. रस्त्यांची कामे नियमानुसार, कायद्यावर बोट ठेवूनच दिली जातील. तुमच्या लाडक्या ठेकेदाराला तुम्हीच समजावून सांगा, असे त्यांना बजवावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक इंच रस्ता दर्जेदारच होईल, याची काळजी डॉ. निपुण यांना स्वतः घ्यावी लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर त्यांनी तपासणी ठेवली तर कामाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा आतापर्यंतचा अनुभव सांगतो. इथे अनेकांचे समाधान केवळ स्वतःच्या तुंबड्या भरून होत नाहीत. त्यांना गोदामे ठासून भरून घ्यायची आहेत. त्यांचा डाव डॉ. विनायक कसा ‘निपुण’तेने हाणून पाडतात. याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. कारण फक्त लक्ष ठेवायचे. फार आवाज उठवायचा नाही. जात-धर्म, पंथावरच मतदान करायचे असा औरंगाबादकरांचाही स्वभाव झाला आहे. 

No comments:

Post a Comment