Thursday 9 August 2018

केवळ स्वतःच्या आनंदासाठी

१९७० नंतर मराठी रंगभूमी एका वेगळ्या वळणावर आणि उंचीवर पोहोचली. दिवाणखान्यात, कौटुंबिक पेचात किंवा हास्यविनोदात अडकलेले मराठी नाटक जागतिकस्तरावर वेगात निघाले. त्याचे श्रेय अर्थातच विलक्षण ताकदीचा विचार मांडणारे विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, दिलीप जगताप, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी आणि इतर मंडळींना आहे. त्यांनी नाटक म्हणजे केवळ मनोरंजन किंवा हृदय पिळवटून काढणे नव्हे. तर ते समाजमन घडवण्याचे एक प्रखर, सशक्त माध्यम असल्याचे सांगितले. दिवाणखान्याची चौकट मोडून टाकली. हलकाफुलका विनोद विनोदापुरताच जीवनात आहे. फार तर तो तुमच्या जगण्यातील ताण काही काळासाठी कमी करू शकतो. संपवू  शकत नाही. आजूबाजूला राजकीय, सामाजिक वावटळी उठल्या असताना तुम्हाला झुडूपाच्या आड लपून चालणार नाही. त्या वावटळीला अंगावर घ्यावे लागेल. समाजातील नवे बदल समजून घेत स्वतःच्या, येणाऱ्या पिढीची जडणघडण करणे गरजेचे आहे, असा त्या काळातील नाटकांचा सांगावा होता. काळाचे भान त्या काळातील नाटककारांनी रंगभूमीच्या माध्यमातून समाजाला दिले.  अर्थात ही सारे नाटके त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवरून प्रवेशकर्ती झाली नाही. कारण एवढे मोठे वळण घेण्याएवढे धाडस तत्कालिन सर्वच संस्थांमध्ये नव्हती. अशा अवजड, वेगळ्या वाटेवरच्या नाटकांना प्रेक्षक मिळणार नाहीत, असे त्यांचे व्यावसायिक गणित  होते. आणि प्रारंभी या लेखकांनी लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग जेव्हा सादर झाले. तेव्हा तर ते गणित योग्यच असल्याचे वाटत होते. पण म्हणतात ना की जे चांगले किंवा समाजासाठी अत्यावश्यक आहे. जी काळाची गरज आहे. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे येतेच. तसेच झाले. नवीन काही सांगू पाहणारी नाटके सादर होण्यासाठी समांतर, प्रायोगिक रंगभूमी अस्तित्वात यावी लागली. त्यासोबत राज्य नाट्य स्पर्धेनेही या नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे दार उघडे करून दिले. मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा कधी मूळापासून आणि विविध अंगांनी लिहिला  जाईल. तेव्हा राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धेचे पान सुवर्णाक्षरांनी लिहावे लागणार आहे. सांस्कृतिक संचलनालयाच्या सरकारी खाक्यात असूनही ही स्पर्धा ५८ वर्षे सातत्याने रसिक, रंगकर्मींना चिंतनशील प्रयोग देत आहे. किमान १०० उच्च दर्जाचे लेखक, तेवढेच दिग्दर्शक आणि दुपटीने तंत्रज्ञ, चौपटीने कलावंत केवळ या स्पर्धांनी चित्रपट, नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यातून विचारी, संयमी, चिंतनशील समाज किती घडला याची मोजदाद सध्या करता येणार नाही. पण या स्पर्धेने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला एवढा नक्की. आणि मधला काहीसा उदासवाणा काळ मागे पडून पुन्हा ही स्पर्धा नाविन्याच्या शोधात निघाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर याच मोठ्या शहरांपुरती असलेली मर्यादा या स्पर्धेने मोडीत काढली आहे. अगदी ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील कलावंतही रंगमंचावर स्वतःची चमक दाखवू शकतील, अशी यंत्रणा राबवली जात आहे. बाल नाट्यातून छोटे कलावंत आणि छोट्यांसाठी खास लिहिणारे, दिग्दर्शन करणारे तयार होऊ लागले आहेत. शेकडो नव्या संहिता येत आहेत.
हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे परवाच्या दिवशी तापडिया नाट्यमंदिरात झालेला या स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा. प्रख्यात अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे, दिग्दर्शक प्रा. दिलीप महालिंगे, प्रा. डॉ. राजू सोनवणे, रमाकांत मुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रख्यात कवी प्रा. दासू वैद्य, सभु नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. किशोर शिरसाट, पद्मनाभ पाठक, गायिका आरती पाटणकर, शीतल रुद्रवार – देशपांडे आदी रंगभूमीशी दीर्घकाळापासून नाते जोडलेल्या मंडळींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्टैच्यू ऑफ लिबर्टी या प्रचंड गाजत असलेल्या नाटकातील प्रतिभावान अभिनेते रमाकांत भालेराव यांनी या साऱ्यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला होता. आणि त्याचवेळी यंदा होणाऱ्या स्पर्धेसाठी कोणकोणत्या संहिता तयार होत आहेत. दुसरी फेरी गाठण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान पाळावे लागेल. संहितेतील त्रुटी दूर करण्यासाठी दिग्दर्शकाने काय मेहनत घेतली पाहिजे, यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे चार दशकांपूर्वी विद्यार्थी असलेले आणि अंबाजोगाईतील रंगभूमीचे विद्यापीठ अशी ओळख असलेले प्रा. केशव देशपांडे यांनी जे सांगितले ते नव्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचे. ते म्हणाले की, प्रतिभेत कमीजास्त असा विषय नसला तरी नाट्यसंघातील काही कलावंत अत्यंत चमकदार कामगिरी करतात. प्रेक्षकांना भावतात. पुढे निघून जातात. लोकप्रिय होतात. पण काहीजण मागे पडतात. यश मिळाले तरी ते टिकत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर आणि तरच तुमच्यात नवीनतेची उर्जा सातत्याने निर्माण होत राहते. ती रसिकांना आवडत जाते. म्हणून आपण माणूस म्हणून किती चांगले आहोत, हे कलावंताने सातत्याने तपासत राहिले पाहिजे. थोडी कमतरता पडली असे वाटले तर ती शोधून दूर केली पाहिजे. आता माणूस म्हणून चांगले असणे म्हणजे काय याचेही उत्तर देशपांडे यांनी दिले. ते म्हणाले, सर्वप्रथम अहंकारशून्यता हवीच. समोरचा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही. अपमानित होणार नाही. याची काळजी घेणे. झालेल्या चुकांची मनमोकळी कबूली देणे, चुकांबद्दल माफी मागणे आणि दुसऱ्यांना माफ करण्यात अगदी पुढे असणे म्हणजे चांगला माणूस होय. हे सगळे आदर्श असले तरी ते कलावंतात अपेक्षित आहे. कारण कलावंत समूहाचे नेतृत्व करताना स्वतःचे जीवनही घडत असतो. जेवढे नितळ, पारदर्शी मन तेवढे ते अधिक क्रियाशील, निर्मितीक्षम असते. त्यातून तुमचे व्यक्तिमत्वही अधिक उंचीवर पोहोचत असते. त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी नितळ, पारदर्शी व्हा. स्पर्धेत उतरणाऱ्यांनाही त्यांनी एक सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, दुसऱ्यांना आनंद मिळवून देण्यासाठी, विचारांत गुंतवण्यासाठी किंवा समाज घडवायचा आहे, असा विचार करून नाटक करूच नका. मला नाटक करण्यात आनंद मिळतो म्हणून मी नाटक करतोय, एवढेच ध्येय ठेवा. स्पर्धेत यश मिळेल अथवा न मिळेल. तुमच्या रंगभूमीवरील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. प्रा. देशपांडे यांनी दीर्घ अनुभवातून दिलेला हा सल्ला नाट्य स्पर्धेच्या केवळ रंगकर्मी नव्हे तर सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. कोणी ते अंमलात आणावे आणि कोणी सोडून द्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment