Sunday 21 February 2021

शशी‘कथा’

मोदी, हिंदुत्वावर सतत टीका आणि रुपेरी पडद्यावर चतुरस्त्र भूमिका अशा दुहेरी संगमामुळे तापसी पन्नू प्रसिद्धीच्या झोतात असते. सध्या ती ‘शाब्बाश मिठू’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये गर्क आहे. काही दिवसांपूर्वी तिनेच शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मिडिआवर टाकून ही माहिती दिली. ‘शाब्बाश’ची कहाणी प्रख्यात महिला क्रिकेटपटू, भारताची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते. राहुल ढोलकिया त्याचे दिग्दर्शन करत आहे. कोरोनामुळे ‘शाब्बाश’चे वेळापत्रक लांबले. मिताली राज म्हणजे भारताची सर्वात यशस्वी खेळाडू. संघर्षातून यशाचे शिखर गाठताना तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. कोणताही सिनेमा चालायचा असेल तर त्यासाठी एक चमकदार गोष्ट लागते. यशस्वी, विक्रम प्रस्थापित करणाऱ्या खेळाडूची जीवनकहाणी विकली जाऊ शकते, याचा काही निर्मात्यांचा अंदाज असतो. त्यामुळेच अलिकडील काळात त्यांनी त्याकडे थोडे जास्त लक्ष वळवले आहे. फरहान अख्तरचा मिल्खासिंग, सुशांतसिंगचा धोनी त्याची काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी प्रियंका चोपडाचा ‘मेरी कोम’ बराच गाजला. भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा यांच्यावर सिनेमा येणार, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. पण ही कहाणी प्रत्यक्षात येण्यात अडचणी येत आहेत. ही सगळी झाली हिंदी जगताची सफर. मराठीमध्ये कायॽ याचे उत्तर काही नाही, असेच म्हणावे लागेल. मराठी खेळाडू राहू द्या. ज्या राजकारणाने अख्खा मराठी मुलुख कायम व्यापलेला असतो. त्यातील एखाद्या मराठी महिलेची गोष्ट पडद्यावर येत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री, पॉवरफूल मंत्री झाली नाही. मराठी निर्माते, दिग्दर्शक गाजलेल्या राजकारण्यांना पडद्यावर आणण्यापासून दूरच राहिले आहेत. अरुण साधू, जब्बार पटेलांचा सिंहासन हा मराठीतील अत्यंत गाजलेला राजकीय सिनेमा. त्यात रिमा लागू वगळता दुसऱ्या महिलेची व्यक्तिरेखा ठसा उमटवत नाही. ती देखील लोचट राजकारण्यांना गळाला लावणारी, नवरा बुळचट असल्याने सामर्थ्यवान सासऱ्यावर भाळलेली दाखवली आहे. भारताच्या राजकारणावर अलिकडे जया जेटली, ममता बॅनर्जी, जयललितांनी प्रभाव टाकला. अर्थात ममता, जयललितांच्या तुलनेत जेटलींचा प्रभाव काळ फारच किरकोळ, मर्यादित राहिला. ममतांवर अद्याप सिनेमा, वेबसिरीज आली नसली तरी नजिकच्या काळात नक्कीच येईल. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेत राजकारणातील महिलांच्या अनेक कहाण्या छोट्या-मोठ्या पडद्यावर येत असल्याचे दिसते. जयललितांवर आधारित एक वेबसिरीज लॉकडाऊनच्या काळात प्रचंड गाजली. दुसरी येऊ घातली आहे. आता आणखी एक वादग्रस्त व्यक्तिरेखा तमिळनाडूत पुन्हा उदयास येऊ पाहत आहे. तिचे राजकारणात काय व्हायचे ते होईल. पण तिचे जीवन एका सिनेमाच्या कहाणीला लाजवेल असे आहे. ती व्यक्ती म्हणजे व्ही. के. शशिकला. एकेकाळी जयललितांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार वर्षे तुरुंगवास भोगून राजकारणात परतल्या आहेत. अद्रमुक पक्षावर ताबा घेण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. एकेकाळचे सहकारी विरोधात गेले. तुरुंगात चार वर्षे घालवल्यावर एखादी महिला मुकाट्याने शांत बसली असती. पण शशिकला येत्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे जुळवून मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहेत. जेमतेम शिक्षण असलेल्या शशिकला एवढ्या प्रभावी कशा झाल्या. याच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. त्यांचे पती एम. नटराजन यांची एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सलगी होता. हा अधिकारी जयललितांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने शशिकलांनी जयललितांशी संधान बांधले. ते एवढे कसून होते की, पुढील काळात शशिकलांशिवाय श्वास घेणेही जयललितांना कठीण जाऊ लागले. सत्तेची धुंदी, माज बहुतांशवेळा सत्ताप्रमुखाआधी त्याच्याभोवतीच्या कोंडाळ्यावर चढतो. जयललितांभोवती फक्त शशिकलांचे कोंडाळे होते. त्यांनी भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले. मग निवडणुकीत पराभूत झालेल्या जयललितांनी निग्रहाने त्यांची घरातून हकालपट्टी केली. पण शशिकलांनी पुन्हा बाजी पलटवली. काही वर्षांतच पक्षाचा जवळपास पूर्ण ताबा मिळवला. त्यांची ताकद इतकी वाढत गेली, की त्यांचाच शब्द म्हणजे प्रमाण मानला जाऊ लागला. नियतीनेही अशी काही खेळी केली की, एकेकाळी व्हिडीओ पार्लर चालवणारी ही महिला दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्रीही झाली. आणि काही महिन्यातच तुरुंगातही पोहोचली. आता तेथून बाहेर पडल्यावर डरकाळ्या फोडू लागली आहे. अनेक नाट्यमय वळणे असलेली शशिकलांची कहाणी दक्षिणेतील मंडळी मोठ्या, छोट्या पडद्यावर आणतील आणि गाजवतील. आपल्या मराठी प्रांतात नजिकच्या काळात असे व्यक्तिमत्व, ताकदीची महिला राज पटलावर येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी शशिकलांची कहाणी मराठी बाजात बांधून मांडली तर रसिकांना नक्कीच पसंत पडेल. किमान नव्या, धाडसी प्रयोगाची नोंद होईलच. शेवटी सिनेमा, छोटा पडद्याला एका चमकदार कहाणीची गरज असतेच नाॽ

No comments:

Post a Comment