Wednesday 3 February 2021

शेळीच वात्तड होती

केबिनमध्ये बळजबरी केल्याच्या आरोपातून मिथुन चक्रवर्ती निर्दोष सुटतो. मल्लिका साराभाई न्यायालयाच्या आवारातच त्याला थांबवते. आणि अतिशय तळतळून जी सहा वाक्ये बोलते. ती कानावर अक्षरशः बॉम्बगोळ्यासारखी कोसळतात. असं वाटतं की, पुरुषी मानसिकतेचा क्रूर, ढोंगी, दांभिक बुरखा तिनं पेटवून दिला आहे. बधिर व्यवस्थेच्या कानात ज्वालामुखीचा लाव्हा ओतत आहे. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू चटर्जींच्या ‘शीशा’ सिनेमातला तो प्रसंग आजही अनुभवाला येतो. भारत स्वतंत्र झाल्यावर दोन दशकांनी मध्यमवर्गीयांची संख्या वाढू लागली. त्यांच्या आशा-आकांक्षा, मानसिकतेचे नवे, लपलेले पैलू बासुदांनी त्यांच्या अनेक सिनेमात खोलवर मांडले. ‘शीशा’मध्ये मध्यमवर्गीयांच्या निमित्ताने एकूणच पुरुषी रचनेचा एक चेहरा त्यांनी दाखवला. त्या काळात मिथुन चक्रवर्ती, मुनमुन सेन, मल्लिका साराभाईंच्या मध्यवर्ती भूमिका हे या सिनेमाचे एक बलस्थान. बासुदांनी टोकदार दिग्दर्शन तर केलेच शिवाय शंकर यांच्या मूळ कथेवर अतिशय कसदार पटकथाही बांधली. त्याचे कथानक असे होते की, दिनेश प्रकाश म्हणजे मिथुन एका बड्या कंपनीचा सीईओ आहे. त्याचा मनिषा म्हणजे मुनमुन सेनशी प्रेमविवाह झालाय. विवाहाचा पहिला वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असते. आणि त्याचवेळी टेलिफोन ऑपरेटर म्हणजे मल्लिका साराभाईवर बळजबरी केल्याच्या आरोपाखाली मिथुनला अटक झाल्याची बातमी येते. मुनमुनचे भावविश्व उद्ध्वस्त होते. आपला नवरा असं काही करू शकतो, यावर तिचा विश्वासच बसत नाही. दुसरीकडं ‘मी बळजबरी केलेलीच नाही. मल्लिकाच माझ्या गळ्यात पडली. मी तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिल्यावर तिनंच मला अडकवण्याचा प्रयत्न केला.’ असं मिथुन सांगत राहतो. खटला सुरू होतो. हळूहळू मिथुनच्या कार्यालयात कंड्या पिकू लागतात. मल्लिकाच कशी बदचलन आहे. यापूर्वीही तिने बड्या अधिकाऱ्यांना कसे जाळ्यात पकडून ब्लॅकमेल केले, याच्या कहाण्या सांगणे सुरू होते. तेव्हा मुनमुन नेमकं काय घडलंय, याचा शोध घेऊ लागते. मल्लिकाच्या वस्तीतील एक ज्योतिषी मल्लिकाच्या वाईट चारित्र्याचे पुरावे पोलिस ठाण्यातून मुनमुनला मिळवून देतो. ते घेऊन ती न्यायालयात जाते, मल्लिकाच वाईट चालीची बाई आहे, असे सर्वांसमोर येते. आणि त्या आधारावर मिथुनची निर्दोष मुक्तता होते. मल्लिका पुन्हा एकदा पराभूत होते. माघार घेते. पण वस्तुस्थिती तशी असते का? त्या दिवशी केबिनमध्ये खरंच तिनं मिथुनला ऑफर दिलेली असते की वेगळंच काही घडलेलं असतं? स्वत:ची नोकरी पक्की करून घेण्यासाठी तिनं त्याला मोहात पाडलेलं असतं का? त्याने निग्रहाने नकार दिल्यावर ती आरडाओरड करते का? या प्रश्नांची उत्तरे सिनेमाच्या अखरेच्या तीन मिनिटांत आणि मल्लिकाच्या सहा वाक्यात मिळतात. एकूणच पुरुषी नियंत्रणातील समाजात महिलाच महिलेकडे कशाप्रकारे बघते, हेही कळते. १९८६चा हा सिनेमा. आज २०२१. पण समाजमनात फारसा फरक पडलेला नाही. फक्त शेळीचा फडशा पाडून झाल्यावर तीच वात्तड होती, असे सांगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पुरुषाच्या काहीतरी भानगडी असतात. विशेषत: सार्वजनिक जीवनात मोठ्या पदांवर काम करणाऱ्याच्या तर त्या असतातच. पण त्या उघड करायच्या नसतात. उलट सर्वांनी मिळून त्या झाकण्याचाच प्रयत्न करायचा असतो, असा भयंकर पवित्रा बहुतांश प्रकरणात घेतला जातो. त्याला राजकारण, समाज, जात, धर्म, पंथ, मतांची गणितेही जोडली जातात. काही वेळा ‘मी टू’ सारखी चळवळ चालवणाऱ्या महिला, संघटना, प्रसारमाध्यमेही विशिष्ट प्रकरणात संधीसाधू मौन बाळगतात. त्या पुरुषाची कधी थेट कधी आडपडद्याने पाठराखणही करतात. स्त्री कशीही असली तरी तिच्या मनाविरुद्ध काहीही करण्याचा अधिकार पुरुषाला नाही, असा कायदा आहे. पण ती स्त्री वाईट चालीचीच आहे, असे सिद्ध केले. तसा गवगवा केला की, तिला लुटल्यावरही निर्दोष मुक्त होण्याचा मार्ग सापडतो, हे अनेकांना माहिती आहे. ते त्याचाच वापर करतात. चारही बाजूंनी तिच्याच चारित्र्यावर क्रूर, हिणकस, खालच्या पातळीवर जात हल्ले करतात. या हल्ल्यांनी ती हमखास मोडकळीस येते. मीच वाईट चालीची, बदनाम स्त्री आहे. मीच त्या पुरुषाला ब्लॅकमेल करत होते, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्यवस्थेकडे न्याय मागण्यात काय अर्थ आहे? मी माघार घेऊन टाकते, असा पवित्रा घेण्याशिवाय तिला पर्याय राहत नाही. तिला लुटणाऱ्या पुरुषाभोवतीची टोळकी त्या पुरुषाचा जयजयकार करू लागतात. बासुदांनी ३४ वर्षांपूर्वी ‘शीशा’मध्ये जे दाखवले तेच अजूनही सुरू आहे. होय ना?

No comments:

Post a Comment