Tuesday 6 July 2021

गौरींचा गौरव

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी, अभिनेते दादासाहेब फाळकेंनी १९१२ मध्ये भारतीय सिनेमाचा पाया रचला. तेव्हा रुपेरी पडद्यावर महिलांचे येणे अत्यंत दुर्मिळ होते. त्यामुळे त्यांच्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या सिनेमात पुरुषांनीच महिलांच्या भूमिका केल्या होत्या. आज २०२१ म्हणजे १०९ वर्षे होत आहेत. या काळात शेकडो, हजारो तारका पडद्यावर आल्या. काही प्रखरतेने चमकल्या. काहींनी मंद का होईना प्रकाश दिला. रसिकांचे मनोरंजन केले. अभिनयाने सिनेमाची दुनिया चमकदार केली. त्यात मराठी तारकांचे मोठे योगदान आहे. मधला काही काळ वगळला तर आज मराठीचा हिंदी सिनेमातही मोठा दबदबा आहे. पण महिला जगतापुरते पाहिले तर १०९ वर्षांच्या इतिहासात मराठीपणाची तटबंदी ओलांडून हिंदीमध्ये ठसा उमटवणाऱ्या मराठी दिग्दर्शिका अत्यंत मोजक्याच आहेत. त्या मोजक्यांमध्ये गौरी शिंदे आहेत. म्हणजे आपण अगदी गेल्या काही दशकांची पाने चाळून पाहिली तर असे लक्षात येते की सई परांजपेंनंतर थेट गौरी शिंदेंचे नाव येते. एक विलक्षण प्रतिभावान, नवीन काही करू पाहणारी, प्रेक्षकांना बांधून ठेवणारी दिग्दर्शिका अशी गौरी यांची ओळख केवळ दोन सिनेमांत झाली आहे. तेही सिनेमा इंडस्ट्रीचा वारसा पाठिशी नसताना. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ६ जुलै १९७४ रोजी जन्मलेल्या गौरी यांनी सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिम्बॉयसिस विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात पदवी मिळवली. त्याच काळात त्यांच्या सिनेमाविषयी आकर्षण निर्माण झाले. पण तिथला दरवाजा कसा उघडेल, असा प्रश्न होता. म्हणून त्या जाहिरात संस्थेत क्रिएटीव्ह कॉपीरायटर म्हणून काम करू लागल्या. तेथे त्यांचा पुढे प्रख्यात सिने दिग्दर्शक झालेले आणि कॉपीरायटर म्हणून काम करणारे आर. बाल्की यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याशी क्रिएटीव्ह चर्चा करताना गौरी यांना ‘ओह मॅन’ या शॉर्ट फिल्मची कल्पना सुचली. बाल्कींच्या पाठिंब्याने त्यांनी ती दिग्दर्शित केली. ही शॉर्ट फिल्म २००१मध्ये बर्लिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवडली गेली. त्यामुळे समांतर सिनेजगतात त्यांच्या नावाला छोटेसे का होईना वलय प्राप्त झाले. पण त्या पुढे फारसे काही घडले नाही. अगदी जवळपास दहा वर्षे सामसूम होती. आणि २०१२ मध्ये गौरी शिंदे हे नाव भारतातील प्रत्येक रसिकाच्या तोंडावर आले. कारण होते श्रीदेवींचे पुनरागमन. होय. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी प्रदीर्घ कालखंडानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार, अशा बातम्या मिडिआमधून येऊ लागल्या. पहिल्यांदा अशी चर्चा होती की, कोणीतरी बडा दिग्दर्शक आहे. कोण असावा तो या विषयीचे कयास बांधले जाऊ लागले. आणि एक दिवस अचानकपणे लेखिका, दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदे यांचे नाव आले. ते पाहून जवळपास सर्वांनाच धक्का बसला. श्रीदेवींनी नवख्या, मराठी मुलीच्या दिग्दर्शनात काम करण्याचे का ठरवले असावे, याबद्दल उलट सुलट बोलले गेले. अगदी सिनेमा पडावा, म्हणून ग्लॅमरस व्यक्तिमत्वाच्या गौरींच्या हातात सूत्रे दिली, इथपर्यंत म्हटले गेले. पण इंग्लिश विंग्लिश २०१२ मध्ये पडद्यावर आला आणि अक्षरश: रातोरात गौरी स्टार झाल्या. त्यांच्यातील दिग्दर्शन कौशल्याच्या तारिफीने रकानेच्या रकाने भरू लागले. टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ला परदेशी रसिकांनीही डोक्यावर घेतले. श्रीदेवींच्या अभिनयाइतकेच किंबहुना काकणभर जास्त गौरींच्या दिग्दर्शनाचे कौतुक झाले. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शिकेचा पुरस्कार मिळाला. पण त्या इंग्लिश विंग्लिशवर थांबल्या नाहीत. त्यांनी शाहरूख खान, अलिया भट यांना घेऊन ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातून तरुण आणि मध्यमवर्गीय पिढीला साद घातली. त्यांचे म्हणणे आहे की, खरेतर कोणतीही गोष्ट तुम्ही महिलेच्या नजरेतून पाहिली तर त्यात एक वेगळेच स्वारस्य निर्माण होत असते. बहुतांश वेळा सिनेमाची कहाणी महिलांच्या दृष्टीकोनातून पडद्यावर मांडलीच जात नाही. आणि मला मानवी भावभावनांविषयी काहीतरी विलक्षण, वेगळं सांगायला खूप आवडतं. मला जे आवडतं तेच मी करते. मी त्यासाठीच सिनेमात आले आहे. आता कोरोनामुळे थिएटरच्या सिनेमाचे जग आक्रसले असले तरी सिनेमा जगभर पोहोचवणारे जग खूप विस्तारले आहे. त्यामुळे गौरींच्या पाऊलवाटेवर मराठी मुली चालू लागल्या तर हिंदीच काय इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनातही मराठी महिलांची प्रतिभा सिद्ध होईल.

No comments:

Post a Comment