Thursday 19 August 2021

लपून – छपून … जपून

गुंड, दरोडेखोर, उतल्या-मातल्यांवर कारवाईसाठी एकेकाळी राजा, महाराजांचे सैनिक असत. इंग्रजांनी राजा-महाराजांची संस्थाने खालसा केल्यावर सैनिकांच्या जागेवर पोलिस नावाची यंत्रणा उभी केली. भारतीय माणसाला दंडुका हाणत, शिवीगाळ करत नियंत्रणामध्ये ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली. पुढे इंग्रज गेले. पण त्यांनी केलेला पोलिसी कायदा आणि पोलिस दोघेही राहिले. आधीपेक्षाही जास्त दिमाखात झळकू लागले. थोडा फरक असा पडला की, हे पोलिस सरसकट दंडुका हाणत, दरडावत नाहीत. फक्त गोरगरिब, लाचार, सामान्य, मध्यममार्गी असला तरच त्याचा मनसोक्त छळ करतात. मारहाण तर करतातच. शिवाय तक्रार करणारा आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा दोघांकडूनही पैसे काढतात. सामान्य माणसाचा तसा रोज फक्त रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या किंवा वाहतूक पोलिस हवालदाराशी संबंध येतो. यातील बहुतांशजण कमालीचे उद्धटपणे, एकेरी बोलतात. छळ करतात. पण उपद्रवी, गुंड मंडळी, राजकारण्यांपुढे ते निमूटपणे शरणागती पत्करतात. त्यामुळे एकूणच पोलिसांविषयी सामान्य भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. समूह किंवा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिस आवश्यक असले तरी संकटकाळी ते खरेच, निस्वार्थीपणे आपल्या मदतीला येतील, याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही. तरीही … तरीही पोलिसांविषयी आपुलकी, अभिमान असणारा एक वर्ग आहेच. कारण सगळीच पोलिस मंडळी भ्रष्टाचाराच्या तलावात बुडालेली नाहीत. बोटावर मोजण्याइतके अपवाद आहेत. त्यांच्यामुळे एवढ्या बिकट स्थितीतही पोलिसांविषयी किंचित सन्मानाची भावना आहे. अशा सन्माननीय अधिकाऱ्यांत मीरां चढ्ढा – बोरवणकर आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख, पुणे पोलिस आयुक्त आणि सीबीआयच्या विविध विभागांत काम केलेल्या बोरवणकर महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या घटना-घडामोडींच्या साक्षीदार आहेत. शेकडो गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. पुरुषी मानसिकता ठासून भरलेल्या पोलिस दलात त्यांनी एक शिस्तशीर, कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. क्लिष्ट, तणावपूर्ण प्रसंग धीरोदात्तपणे हाताळण्याचा एक मानदंड त्यांनी तयार केला. त्यांच्याभोवती एक आदर, दराऱ्याचे वलय निर्माण झाले आहे. त्यांच्याप्रमाणे पोलिस सेवेत दाखल होण्याचे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. हिंदी, दक्षिणी मसाला सिनेमात दिसणाऱ्या सिंघम, सिंबाच्या थ्रील, मस्तीचे आकर्षण तरुणाईला असते. अशा सर्वांसाठी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेले ‘इन्सपेक्टर चौगुले’ हे पुस्तक वास्तववादी गाईडलाईन ठरते. कारण यात त्यांनी पोलिसांचे जीवन प्रत्यक्षात कसे असते. काही गुन्ह्यांची उकल कशी होते. त्यात कागदोपत्री पुरावे, मांडणी किती महत्वाची असते. एखादा गुन्ह्याची वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याची कशी दखल घेतात. काय विचार करत परिस्थिती हाताळतात. राजकारण्यांचा त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप कसा होतो, याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. थोडासा यासाठी म्हणावे लागते कारण पुस्तकातील पंचवीसपैकी बहुतांश प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी आरोपी, गुन्हेगारांची नावे सांगणे टाळले आहे. जे काही सांगायचे आहे ते लपून-छपून आणि जपून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कदाचित कायदेशीर कारवाईची कटकट किंवा वादविवाद नको म्हणून त्यांनी असे केले असावे. हे वगळता सर्व प्रकरणे बऱ्यापैकी रोचक माहिती देतात. बोरवणकर यांनी एकाही घटनेला मसाला किंवा रंजकतेचा लेप लावलेला नाही. आपल्या आयुष्यातील अनुभव सहजपणे सांगत आहे. त्यातून वाचकाने त्याला जे हवे ते टिपून घ्यावे, असा त्यांचा सरळसरळ दृष्टीकोन दिसतो. त्यासाठी त्यांनी दक्षता या एकेकाळी गाजलेल्या मासिकाला शोभेल अशी पोलिस निरीक्षक चौगुले नावाची व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. खरेतर पोलिस दलात दीर्घकाळ काम केलेल्या बोरवणकर यांच्यासारख्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुस्तकातून काहीतरी खळबळजनक, वादग्रस्त सांगावे. कोणाचा तरी थेट बुरखा फाडावा, अशी अनेकांची अपेक्षा असेल. एक पुसटसा अपवाद वगळता ती यात पूर्ण होत नाही. त्या अपवादात्मक प्रकरणात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्र्यावर त्याच्या भावाने गोळ्या झाडल्या. कारण त्याला आदराची वागणूक मिळत नव्हती. ‘अगदी त्यांची आईसुद्धा लहानपणापासून त्यांच्यामध्ये भेदभाव करायची.’ एवढे वाक्य वगळता अन्य कुठेही स्फोटक किंवा भुवया उंचाव्यात अशा माहितीला थारा नाही. म्हणून सायली पेंडसे यांनी मराठीत छानपणे अनुवादित केलेले विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे हे पुस्तक पोलिसी सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तसेच पोलिस आपल्यापासून दूरच बरे असे वाटणाऱ्यांसाठीही वाचनीय आहे.

No comments:

Post a Comment