Tuesday 5 July 2016

डास आवडती सर्वांना



माणसापेक्षा यंत्रणा अचूक अगदी एखाद्या यंत्रासारखी असली पाहिजे. म्हणजे यंत्रणेतील माणसे बदलली तरी फरक पडणार नाही. यंत्रणेतून सर्वाधिक फायदा झालाच पाहिजे, असे आजकाल वारंवार म्हटले जाते. महापालिकेच्या कारभाराचा तर मूलमंत्रच आहे. कायद्यानुसार काम कसे करायचे ते ठरलेले आहेच. त्याची फक्त अंमलबजावणी करायची असते. पण यंत्रणा माणसेच तयार करतात आणि जगातील सर्व माणसे सारखी नसतात. प्रत्येकाची विचार करण्याची, काम करण्याची पद्धत आणि क्षमताही वेगवेगळी असते. काम करण्याचे उद्दिष्ट तर मुळीच सारखे नसते. म्हणून तर माणसाचे महत्व अबाधित आहे. माणूस बदलला की यंत्रणा, संस्थेची दृष्टी, वाटचाल हमखास बदलतेच. गेल्या आठवड्यात डास निर्मूलनाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ज्या कुशलतेने परत आणण्याचा घाट महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घालण्यात आला. तो पाहता तर बदलाचे वारे कुठल्या दिशेने निघाले आहे, हे लक्षात येतेच. हे वारे नेमके कुठून सुरू झाले, याची माहिती घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

आठ-दहा महिन्यांपूर्वी महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी प्रभारी कार्यभार स्वीकारला. चांगल्या कामांना प्रसिद्धी मिळावी. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नको, असा केंद्रेकरांचा दृष्टीकोन असल्याने ते स्वतःचे वर्तमानपत्रात फोटो येणार नाहीत, याची काळजी नेहमीच घेतात. तशी त्यांनी मनपात आल्यावर घेतली. त्यामुळे केंद्रेकर नावाचे नवे साहेब आल्याचे मनपाच्या सर्वच कर्मचारी, ठेकेदार आणि ठेकेदारांकडील कामगारांना कळाले असले तरी ते कसे दिसतात, याची माहिती नव्हती. याचा फायदा केंद्रेकरांना झाला. एक दिवस सकाळी ते सिडकोत मॉर्निंग वॉकला जात असताना ठेकेदाराचे कर्मचारी डास निर्मूलन औषधीची फवारणी करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार चौकशी केली. तेव्हा ही औषधाची थातूरमातूर फवारणी असल्याची कबूली त्या कर्मचाऱ्यानेच दिली. मग केंद्रेकरांनी आणखी सखोल विचारणा केली. तेव्हा सिडको-हडकोतील सगळे ठेकेदार असेच करतात. औषधी कमी आणि पाणी जास्त वापरतात. त्यापोटी दरमहा लाखो रुपयांचे बिल उचलतात. अधिकारी, नगरसेवक सगळ्यांच्या संगनमतातून हे घडत असल्याने स्थायी समितीत टीका, सभापतींकडून चौकशीचे आदेश यापलिकडे काहीच घडत नसल्याची माहिती केंद्रेकरांना मिळाली. म्हणून केंद्रेकरांनी झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुळावरच घाव घालायचे ठरवून सिडको-हडकोतील औषधी फवारणीचे ठेकेच रद्द करून टाकले. त्यावर ठेकेदार आणि त्यांच्या समर्थक नगरसेवक, अधिकाऱ्यांनी बरीच कुरकुर करून पाहिली. पण केंद्रेकरांनी जुमानले नाही. त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फवारणीसाठी तैनात करून त्यावर निगराणीची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित केली. अधूनमधून ते स्वतः काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, याकडे लक्ष ठेवत होते. तर केंद्रेकरांची बदली केव्हा होते आणि आपण पुन्हा फवारणीतून पैसे उगवण्याचे झाड केव्हा लावतो, यावर ठेकेदारांची नजर होती. ती त्यांनी गेल्या आठवड्यात मोठ्या शिताफीने साधली. स्थायी समितीच्या आदल्या दिवशी आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप, डॉ. मनिषा भोंडवे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची गेल्या सहा महिन्यातील आकडेवारी जाहीर केली. सोबतच शहरातील 135 भाग धोकादायक आहेत, असे आमचे सर्वेक्षण असल्याचे म्हटले. या भागांमध्ये बन्सीलालनगर, पद्‌मपुरा, वेदांत कॉलनी आदी उच्चभ्रू वसाहतींचा समावेश असल्याची माहिती दिली. तीन वर्षापूर्वी एन-11 येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. तेथे अजूनही संशयित रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली. प्रसारमाध्यमांसाठी हा अहवाल महत्वाची बाब असल्याने त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली. आणि शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य विभागावर हल्लाबोल केला. डास शहरात थैमान घालत असताना औषधी फवारणीचे काय असा त्यांचा सवाल होता. त्याचे उत्तर शोधताना सभापती मोहन मेघावाले यांनी केंद्रेकरांनी ठेकेदारांना बंद केलेली दारे पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. महापालिकेत वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आणि पदाधिकारी बदलताच धोरण बदलते. आणि या बदलत्या धोरणामुळे लोकांची कामे रखडतात. शिवाय पैशाची उधळपट्टीही होते. ती रोखण्याचे काम आयुक्तांच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने करणे अपेक्षित आहे. ओमप्रकाश बकोरिया ते सहजपणे करू शकतात. डासांचे निर्मूलन हा पुढील शेकडो वर्षे चालणारा विषय आहे. प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी `दुष्काळ आवडे सर्वांना` असा एक सिद्धांत मांडला होता. दुष्काळाचे निमित्त करून सर्वच जण कशी कमाई करून घेतात, हे त्यांनी दाखवून दिले होते. तशीच `डास आवडती सर्वांना` अशी अवस्था आहे. या आवडीमुळेच डास कायम राहिले पाहिजेत, असे महापालिकेला मनापासून वाटते. उर्जा निर्माण करता येत नाही. नष्ट करता येत नाही. ती फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलता येते` या न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणेच तमाम डास फक्त एका स्थळावरून दुसऱ्या ठिकाणावर हाकलता येतील. पण ते नष्ट होणार नाहीत. सार्वजनिक स्वच्छता हा फक्त महापालिकेनेच काम करण्याचा विषय आहे. आपले काम फक्त रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे, शौचास बसणे, लघुशंका करणे, नळाचे पाणी रस्त्यावर सोडणे, गरज नसताना भांड्यांमध्ये साठवणे, गटारीत प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे असे आहे, असा बऱ्याच औरंगाबादकरांचा ठाम विश्वास असल्यामुळे डास कायम राहणार आहेतच. त्यांचे निर्मूलन नव्हे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्याच्या नावाखाली पैसा खर्च होणारच. तो केला नाही तर डेंग्यूमुळे नागरिक विशेषतः लहान मुलांचे जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणून सभापती मेघावाले यांनी ठेकेदारांना महापालिकेची दारे उघडी करून दिली असली तरी किमान त्यांच्याकडून नियमानुसार काम करून घेतले पाहिजे. लोकांच्या जीवनमरणाशी खेळ करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. औषधींऐवजी पाणी मारताना पकडले जात तर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा सज्जड दम द्यावा लागेल. सभापतींच्या आदेशाची अंमलबजावणी करणे भाग असले तरी डासांच्या नावाखाली झोळी भरून घेणाऱ्या ठेकेदारांवर करडी नजर ठेवण्याची यंत्रणा ते निश्चित राबवू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास काय हरकत आहे? 

No comments:

Post a Comment