Tuesday 6 December 2016

बालरंगभूमी समृद्ध करणारे दोन तरुण लेखक

मराठी, रंगभूमीलाआशयघन, सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या आणि समाजमन घडवणाऱ्या नाट्य चळवळीची मोठी परंपरा आहे. त्यातून मराठी रसिक समृद्ध झाले आहेत. अातापर्यंत अनेक पिढ्या नाटकप्रेमी झाल्या आहेत. नाट्य कलेचा उदय होण्यापूर्वी भारूडकार, कीर्तनकारांनी एक प्रकारे गावागावांमध्ये जाऊन प्रबोधन केले. मनोरंजनही केले. पौराणिक कथानके, मिथके त्यांनी शेकडो वर्षे पेरून ठेवली. तो ठेवा अजूनही कायम आहे. त्यातून शेकडो नाटककारांना नवनवे विषय मिळाले आहेत. मात्र, अलीकडील काळात हरहुन्नरी कलावंत प्रा. डॉ. राजू सोनवणे वगळता रसिक घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याची नोंद नाही. त्याचप्रमाणे बाल रसिकांना रंगभूमीशी कायमस्वरूपी जोडण्यासाठी ठोस प्रयत्न सातत्याने झाल्याचे दिसत नाही. म्हणजे त्या दिशेने वाटचाल झालीच नाही, असे म्हणता येणार नाही. पण एकूणात साऱ्या प्रयत्नात एकसंघता नव्हती. सई परांजपे, सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी आदींनी मुंबई, पुण्यामध्ये बाल रसिकांसाठी मोठे काम केले. तेदेखील त्यांच्या उमेदीच्या काळात आणि काही नावीन्यपूर्ण करण्याच्या ओढीने. त्यातून नवे कलावंत तयार झाले. अनेक दर्जेदार संहिता मिळाल्या. पण बालनाट्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्यांची फौज निर्माण झाली नाही. खरे तर बालकांचे मनोरंजन करणे म्हणजे एक धमाल असते. बऱ्यापैकी सादरीकरणालाही तुफान प्रतिसाद मिळतो. शिवाय तिकीट विक्रीतून कलावंतांना आर्थिक मदतही होते. तरीही का कुणास ठाऊक, लहानांसाठी नाटक करणे म्हणजे कमीपणाचे, असा समज तयार झाला. तो खोडून काढण्याचा काही जणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, त्यातही दोन मोठ्या नाटकांमधून वेळ मिळाला तर छोट्यांसाठी असा प्रकार झाला. औरंगाबादेत प्रा. कुमार देशमुख, प्रा. आलोक चौधरी, सूर्यकांत सराफ आदींच्या नेतृत्वात ऐंशीच्या दशकात तुफानी बालनाट्ये झाली. सोनेरी डोक्याचा मासा या बालनाट्याचा चित्रपट तयार झाला. तोही गाजला. सराफ यांनी तर त्या काळात बालनाट्याची चळवळ एकहाती तोलून धरली होती. त्यांनी त्यांची पूर्ण कारकीर्दच बाल रसिकांसाठी खर्च केली. नंतरच्या पिढीत रणजित देशमुख, सुनील अष्टेकर, नंदू काळे, राजू सोनवणे, संदीप राजहंस, आसिफ अन्सारी आदींनी बालनाट्याचे प्रयोग केले. आता यातील आसिफ अन्सारी रंगभूमीवर पाय रोवून आहेत. एकीकडे अशी बडी मंडळी बालनाट्यांकडे रिकाम्या वेळेपुरते पाहत असताना स्थिती असताना स्नेहांकित संस्थेने भरीव योगदान दिले आहे. रंगभूमीचे आपण काही देणे लागतो. आणि त्यासाठी तळमळीने काही केले पाहिजे, या जाणिवेतून एकत्र आलेल्या रमाकांत मुळे, धनंजय सरदेशपांडे, शरद कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे यांनी ९० च्या दशकात स्नेहांकितची स्थापना केली. उद्दिष्ट एक आणि मार्ग वेगवेगळे असल्याने स्नेहांकितच्या या चार स्तंभांना कधी अहंकाराचा वारा लागला नाही. पाय जमिनीवर असल्यानेच त्यांनी विशिष्ट गतीने कायम पुढे पाऊल टाकले. धनंजय सरदेशपांडेंनी लेखन करायचे आणि मुळेंनी िदग्दर्शन. शरद कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे इतरांनी अभिनय करायचा, असा स्नेहपूर्ण पॅटर्न तयार झाला. पुढे गंगाधर भागेंसारखा हरहुन्नरी तंत्रज्ञ, मोहन वाखारकरांसारखा धडपड्या साथीदार त्यांना मिळाला. या सर्वांनी मिळून उत्तमोत्तम नाट्य प्रयोग केलेच, शिवाय बालनाट्याची परंपरा कायम ठेवली. त्यात सिंहाचा वाटा होता धनंजय सरदेशपांडेंचा. परभणी जिल्ह्यातील सेलूसारख्या छोट्या गावातून आलेल्या सरदेशपांडेंचा पिंड प्रायोगिक, प्रबोधनात्मक नाटकांचा. त्यांनी लिहिलेल्या रोपण खड्डा ओपन या एकांकिकेने लोकप्रियतेचे विक्रम मोडले. आता मराठी चित्रपट क्षेत्रात नाव कमावणाऱ्या अनेकांनी त्यात त्या काळी काम केले होते. एकीकडे मोठ्यांसाठी नाट्यलेखन करत असताना लहान मुलांसाठीही काही केले पाहिजे, असे सरदेशपांडेंना सातत्याने वाटत होते. मुळे सरांसोबतच्या चर्चेत त्याला मूर्त रूप देण्याचे ठरले आणि मग सरदेशपांडेंनी एकापाठोपाठ एक अशा सरस बालनाट्यांची मालिकाच सुरू केली. पडसाद, सत्यम वचनम, जय गणेश साम्राज्य, क्लोन, गणपती बाप्पा हाजिर हो, सिद्राम सुडोकू, जाईच्या कळ्या, मदर्स डे, चमचम चमको, आदिंबाच्या बेटावर ही सर्वच गाजली. स्पर्धांमध्ये विजयी ठरली. शिवाय रसिक, बालकलावंतांना आनंद मिळवून देणारी ठरली. पाच वर्षांपूर्वी राज्य बालनाट्य स्पर्धेत सरदेशपांडेंची तब्बल सोळा बालनाट्ये वेगवेगळ्या संघांकडून सादर झाली. यावरून त्यांच्या लिखाणाचा आवाका लक्षात येतो.
सरदेशपांडेंप्रमाणेच आसिफ अन्सारी यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांनी बालरंगभूमीशी काही वर्षांपूर्वी जोडलेले नाते कायम ठेवले आहे. त्यांची ‘ओसामा, आम्ही नाटक करत आहोत, कस्तुरी, जय हो फँटसी, भेट’ आदी बालनाट्ये आशय आणि मांडणीत वेगळेपण जपणारी आहेत. या दोघांनीही ज्या तळमळीने, सातत्याने लेखन केले त्याला तोडच नाही. साधे, सोपे कथानक. प्रसंगांची सुरेख मांडणी. लहान मुलांना सहज बोलता येतील आणि बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे भावही उमटतील, असे संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकात मनोरंजनासोबत एक खोलवर मांडलेला संदेश. हे त्यांच्या लेखनशैलीचा वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. त्यांच्या बळावर औरंगाबादेतील बालरंगभूमी तरली आहे. हे दोघेही छोट्या नाट्यरसिकांचे जीवन घडवणारे मोठे प्रतिभावंत लेखक आहेत, अशीच नाट्य इतिहासात नोंद होईल.

No comments:

Post a Comment