Thursday 6 July 2017

रंगमंदिराच्या खासगीकरणाचा प्रयोग

एकेकाळी औरंगाबादचेच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था रंगकर्मींनी पुन्हा एकदा मनपाच्या रंगमंचावर आणली आहे. नावासाठी नव्हे, तर गावासाठी असे रंगमंदिराविषयी तळमळीने सांगणारे आणि तमाम औरंगाबादकरांना पाठिंब्यासाठी आवाहन करणारे शीर्षकही त्यांनी सोशल नेटवर्किंगवर चालवले आहे. त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (दोन जुलै) रोजी या रंगकर्मींची बैठक झाली. 
सुमारे तीस वर्षांपूर्वी महापालिकेने सांस्कृतिक केंद्र म्हणून उभे केलेले रंगमंदिर आता अनास्थेचे केंद्र झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशी अवस्था झाल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यावरही महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी काहीही करत नाहीत. केवळ आश्वासनांवर बोळवण करतात, याबद्दल सौम्य शब्दांत संतापही व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी पुणे, मुंबईतून व्यावसायिक नाट्य प्रयोगासाठी आलेल्या कलावंतांनी संत एकनाथचे असे हाल का झाले, त्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही का? रंगमंदिराची अशी बिकट परिस्थिती असेल तर येथे सांस्कृतिक कार्यक्रम कसे होणार, असे सवाल उपस्थित केले होते. त्याची अर्थातच महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून नाट्यप्रेमी, रंगकर्मींना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनीच तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांना रंगमंदिराच्या दर्शनासाठी निमंत्रण दिले. तुपेंनीही रंगमंदिराचे एवढे हाल झालेत का? असा प्रश्न करत निधी देऊन तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांनी साफसफाईचा जिम्मा उचलला होता. तुपेंच्या शब्दावर विश्वास ठेवून रंगकर्मी शांत झाले. तर रंगकर्मी यापलीकडे फार काही करणार नाहीत, असे ठाऊक असल्याने तुपेंनीही पाठपुरावा केला नाही. दोन आठवड्यांपूर्वी रंगमंदिरात ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचा प्रयोग झाल्यावर त्यातील कलावंत प्राजक्त देशमुख यांनी फेसबुकवर रंगमंदिराचे वाभाडे काढले आणि रंगकर्मींना पुन्हा आंदोलन हाती घ्यावे लागले. विशाखा रुपल, शीतल रुद्रवार या दोन महिला रंगकर्मींनी त्यासाठी पुढाकार घेतला हे विशेष. आता त्यांना दत्ता जाधव, भगवान कुलकर्णी, सारंग टाकळकर, हेमंत अष्टपुत्रे, रवी कुलकर्णी, संदीप सोनार, मदन मिमरोट, राजू परदेशी, पवन गायकवाड आदींची साथ मिळाली आहे. २५ वर्षांपूर्वी याच रंगमंचावरून नाट्यप्रवास सुरू करणारे आणि सध्या केंद्र सरकारच्या संगीत नाट्य विभागात संचालक असलेले 
जितेंद्र पानपाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. रंगमंदिराची डागडुजी होईपर्यंत विषय लावून धरण्याचा निर्धार रंगकर्मींनी केला आहे. त्यासाठी मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, विभागीय आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांना साकडे घातले जाणार आहे. मनपाचा आतापर्यंतचा अनुभव आणि रंगकर्मींचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पाच-दहा लाखांची तरतूद करून कामाच्या निविदा निघतील. दिवाळीच्या तोंडावर काही कामे होतील. वर्षभर सर्वकाही ठीक आहे, असे वाटेल आणि वर्षभरानंतर पुन्हा जैसे थे अवस्था होईल. कारण एकच जे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना वेठीस धरत आहे, ते म्हणजे भ्रष्टाचाराचे भूत. मनपाचे काम म्हणजे पैसे खिशात घालण्याची नामी संधी, असा अर्थ काढला जातो. काम देणारे आणि ठेका घेणारे थातूरमातूर काम करून कोट्यवधी रुपये खिशात घालत आहेत. संत एकनाथ रंगमंदिराच्या डागडुजीसाठी गेल्या २० वर्षांत जेवढा पैसा खर्च झाला त्याचे ऑडिट केले तर हेच स्पष्ट होईल. त्यामुळे आता रंगमंदिर कायमस्वरूपी तंदुरुस्त ठेवायचे असेल तर खासगीकरणाचा एक पर्याय समोर आहे. या विषयी वेळोवेळी मनपाच्या सभेसमोर प्रस्ताव येऊन गेले. पण प्रस्ताव येताच रंगमंदिर भांडवलदारांच्या घशात घालायचे आहे का, अशी ओरड सुरू होते. कारण आतापर्यंत मनपाने केलेले खासगीकरणाचे सर्वच प्रकल्प ठेकेदारांना मुबलक कमाई करून देणारे ठरले आहेत. त्यामुळे अशी ओरड करण्यात चुकीचे काही नाही. पण आता नुसती ओरड करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे स्थानिक, हौशी कलावंतांना सवलतीच्या दरात रंगमंदिर मिळेल, यासह अन्य काही अटी टाकून सांस्कृतिक चळवळीविषयी आस्था असणाऱ्या संस्थेला रंगमंदिराची देखभाल करण्याचे काम किमान दोन वर्षांसाठी दिले पाहिजे. त्यातून मनपाला थोडेसे उत्पन्न होऊ शकते. डागडुजीवर खर्च करण्याची गरज पडणार नाही. आणि मुख्य म्हणजे दर दोन-तीन वर्षांआड दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदार, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा औरंगाबादकरांच्या घामाचा पैसा वाचेल. खासगीकरण हा सर्वोत्तम मार्ग नाही. पण तो एकदा आजमावून पाहिल्याशिवाय मनपाने पर्यायही ठेवलेला नाही. 

No comments:

Post a Comment