Thursday 6 July 2017

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी


--
देश बुडवण्यास निघालेल्यांचे
बुरखे ओढले जातात तेव्हा...



---


भारतीय माणसाच्या कणाकणात जात व्यवस्था भिनली आहे. जातीचा वापर करून प्रत्येकजण दुसऱ्यावर कुरघोडी करू लागला आहे. सोशल बेवसाईटस् जातीवाचक शिवीगाळींनी भरून जात आहेत. टिपेला पोहोचण्यासाठी निघालेला हा जातीवाद एक दिवस संपूर्ण देशाला घेऊन बुडेल आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी मिळवलेले स्वातंत्ऱ्य हातातून निघून जाईल, हे ठामपणे, टोकदार शब्दांत सांगण्याची हिंमत तरुण पिढीतील प्रतिभावान, संवेदनशील नाटककार अरविंद जगताप यांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकात दाखवली आहे. महापुरुषांचा वापर करत जातीद्वेषाचा वणवा पेटवून देश बुडवण्यासाठी निघालेल्यांचे बुरखे खाली खेचण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. संयमित तरीही मनाला अस्वस्थ करेल अशा उपहासगर्भ मांडणीमुळे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ मराठी नाटकाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. प्रयोगानंतर रंगमंदिराबाहेर पडताना आपणही जातीवाद्यांच्या, देश बुडवणाऱ्यांच्या कळपातील नाहीत ना, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावू लागतो. हीच या नाटकाची खरी ताकद आहे.
कश्मिरपासून कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेशापासून मुंबईपर्यंत पसरलेला महाकाय देश अशी भुगोलाच्या पुस्तकात भारताची ओळख आहे. मात्र, हजारो जाती-पातींमध्ये विखुरलेला आणि कायम एकमेकांबद्दल द्वेष बाळगणाऱ्यांचा भूखंड अशीच नवी प्रतिमा झपाट्याने तयार होत आहे. हिंदू धर्मावरील काळा डाग असलेल्या वर्णव्यवस्थेचा  अभिमान बाळगणारे, दलितांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देणारे, आदिवासींचे अस्तित्व नाकारणारे कोट्यवधी लोक भारतात राहतात, हे तर जगाला माहिती होतेच. त्यात आता जाती-जातीमधील संघर्षाची भर पडत आहे. हजारो वर्षांपूर्वी समाजाची चार वर्णात विभागणी करत स्वत:ला जन्मत:च सर्वोच्च मानणारे ब्राह्मण सर्वाधिक दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शाब्दिक आसूड गेल्या काही वर्षांपासून ओढले जात आहेतच. पण त्यासोबत इतर जातींमधील परस्पर सौहार्द, आपुलकीचे नाते संपत चालले आहे. ब्राह्मणांनी पेरलेले जातीचे विष नष्ट करण्यासाठी सर्वांनी लढा उभारण्याची इच्छा क्षीण होत चालली आहे. कोण, कोणत्या जातीचा आहे, हे कळाल्यावरच त्याच्याविषयी प्रेम किंवा दु:ख व्यक्त केले जात आहे. स्वत:च्या जातीच्या माणसाने काहीही बोलले तरी ते योग्यच आणि दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने देशहिताचे काही सांगितले तरी ते चुकीचेच मानून त्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. आपल्या जातीचा अभिमान बाळगण्यापर्यंत तर समजू शकते पण भारतीय समाज त्यापलिकडे चालला आहे. स्व जातीचा अभिमान बाळगत असताना दुसऱ्या जातीला यथेच्छ शिव्या देणे सुरू झाले आहे. ही तेढ वाढतच चालली असून सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी महापुरुषांचा वापर केला जात आहे. इंग्रजांशी सर्वांनी मिळून, लढून मिळवलेल्या स्वातंत्ऱ्याचा अर्थ मी कसाही वागेन. काहीही बोलेन, असा काढला जात आहे. महानगरांपासून ते खेडेगावापर्यंत जातीच्या जाणिवा तिखट, उग्र होत चालल्या आहेत. हे सारे कथा, कादंबऱ्यांमधून काही प्रमाणात उमटतानाही दिसते. पण समाज प्रबोधनाचा वारसा सांगणारी नाट्यकला त्यापासून काहीशी दूरच होती. कारण जाती व्यवस्थेविषयी बोलताना त्यावर थेट,  परखड भाष्य करण्यासाठी नाटककार अस्वस्थ मनाचा असणे गरजेचे आहे. हा समाज बदलला पाहिजे, अशी त्याला मनापासून तळमळ हवी. तरुण पिढीतील मराठवाड्याचे प्रतिभावंत नाटककार राजकुमार तांगडे यांच्यात अशी अस्वस्थता, तळमळ होती. त्यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या विलक्षण ताकदीने लिहिलेल्या नाटकात ती परिणामकारक दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते, असे तांगडे यांनी मांडले आहे. जगताप यांनी त्यापुढचे पाऊल टाकले आहे. सर्वच जाती-धर्माचे लोक स्वत:भोवती जातीच्या भिंती उभ्या करून इतरांचे जगणे कसे मुश्किल करत आहेत, अशी मांडणी त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये केली आहे. केवळ जाती प्रथांवर प्रहार करण्यापर्यंत ते थांबत नाहीत. महापुरुषांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनाच महापुरुषांनी वेळोवेळी दिलेले संदेश माहिती नाहीत. त्यांनी नेमकी काय शिकवण दिली, हे समजावून घेण्याची त्यांची तयारीच नाही, असेही ते कठोरपणे सांगतात आणि त्यामुळे हे नाट्य अधिक उंचीवर पोहोचते.
महाविद्यालयीन काळात खळबळजनक विषयाची निवड करून त्याची बहुचर्चित मांडणी करणारे जगताप आता अधिक संवेदनशील, जागरुक झाले असल्याचेही जाणवते. क्षोभक संवाद हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. काही संवाद बाँबगोळ्यासारखे आपल्यावर कोसळतात. काही आसूड ओढतात. कानशिलाखाली लगावतात. तर काही संवाद ऐकताना आपण किती हतबल आहोत, याची जाणिव होत राहते.
जातींवर पोसलेल्यांवर हल्ला चढवणाऱ्या, स्फोटक विषयाची मांडणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये करण्यासाठी जगतापांनी फँटसीचा आधार घेतला आहे. स्वर्गात पोहोचलेल्या तुकाराम (डॉ. दिलीप घारे) नामक माणसाची गाठ देवलोकातील गाइडशी (रमाकांत भालेराव) पडते. देव, जात, धर्म याबद्दल तुकाराम काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देव घोषित करायचे की नाही, याबाबत निर्णय घ्यावा, असे देवसभेत ठरते. त्याची तपासणी करण्यासाठी तुकाराम आणि गाइड भारतात येतात. तर इथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची घटना घडल्याची चर्चा सुरू असते. असे खरोखरच घडले असेल का. असल्यास त्यामागे काय कारण असावे, याचा राजकारणी, अधिकारी आपापल्या सोयीनुसार अर्थ काढू लागतात. अखेर अश्रू आल्याची घटना म्हणजे अफवा असल्याचे समोर येते. पण यावरून उसळलेल्या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू होतो. त्याचेही जातकरण सुरू होते. मेलेला माणूस होता यापेक्षा तो कोणत्या जातीचा होता, हे शोधण्यातच साऱ्यांना स्वारस्य असते. हे सारे पाहून तुकाराम अस्वस्थ होतो. जातीचा अभिमान बाळगत, दुसऱ्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा सल्ला देतो. माणूस झाला नाहीत. जातीवाद असाच वाढवत नेला तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतो आणि अनेकांनी पांघरलेला, ओढलेला बुरखा ओढून काढत प्रयोग संपतो.
आता थोडेसे दिग्दर्शक जगतापांविषयी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे लिखाण करत असतानाच त्यातील प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांचे आरोह-अवरोह, पंचेस, काँपोझिशन्सचा अभ्यास त्यांनी केला असावा असे दिसते. तुकाराम सर्वांना माणूस म्हणण्याचा सल्ला देतो, या प्रसंगाला थोडेशी गती आवश्यक वाटते. शिवाय डावीकडून उजवीकडे रांगेत उभारलेल्यांकडे तुकारामने जाण्याऐवजी त्यातील शाब्दिक पंचनुसार निवड केली तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. जगतापांनी व्यावसायिक नाटकाला आवश्यक असणारे तांत्रिक गिमिक्सही वापरले आहेत. फक्त काही प्रयोगानंतर त्याचे टायमिंग किंचित कमी करता आले तर अधिक प्रभावी होईल. डॉ. दिलीप घारे म्हणजे नाट्यशास्त्राचे स्वतंत्र विद्यापीठ. ते या नाटकात मध्यवर्ती भूमिका करत असल्याने त्यांच्या अभिनयशैलीची छाप सर्वच कलाकारांवर पडलेली दिसते. त्यात वैविध्य आल्यास व्यक्तिरेखा अधिक उठावदार होतील, असे वाटते.
संभाजी भगत यांचे पहाडी, दणकट आवाजासह संगीत आणि दोन प्रसंगांना जोडणारे, त्यातील आशय अधिक खोलवर करणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर नाटकाची उंची आणखी उंचीवर नेतात. डॉ. घारेंनी उभा केलेला तुकाराम आवर्जून अभ्यासावा असा आहे. देवावर असीम श्रद्धा असलेला आणि देव, महापुरुषांचा वापर करून स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांवर डाफरणारा, त्यांना उघडे पाडणारा माणूस त्यांनी खूपच मनापासासून साकारला आहे. त्यांचे टायमिंग, चेहऱ्यावरील भाव आणि शब्दांमधील आशय बाहेर काढत तो फुलवून सांगणे अफलातून. रमाकांत भालेराव यांनी गाइडच्या भूमिकेत जीव ओतला आहे. घारेंसारख्या दिग्गजासोबत काम करणे म्हणजे परीक्षाच. त्यात ते सहज उत्तीर्ण होतात. शैलेश कोरडे, महेंद्र खिल्लारे या जोडगोळीने धमाल उडवून दिली आहे. त्यांचे ट्युनिंग, टायमिंग कमालीचे आणि छाप सोडणारे. दोघेही जण रंगमंचावर सहज वावरतात. ते भूमिकांशी कमालीचे समरस झाल्याचे प्रत्येक क्षणाला अनुभवास येते. डॉ. जयंत शेवतेकर यांनी सुधारकाच्या आड लपलेला जातीवादी संशोधक कमालीच्या संयमाने, बारकाव्यांसह मांडला आहे. टीव्ही वृत्त वाहिनीवरील पत्रकाराशी संवादाचा प्रसंग त्यांच्यातील अभिनय क्षमतेची साक्ष देतो. करारी बाण्याची, डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मनस्वी प्रेम करणारी आणि त्यांचे विचार आत्मसात करणारी पोलिस अधिकारी नम्रता सुमीराजने विलक्षण ताकदीने उभी केली आहे. प्रेम लोंढेंने दलित राजकारणी उभा करताना आवाज आणि चेहऱ्यावरील रेषांचा केलेला सूक्ष्म वापर दीर्घकाळ लक्षात राहिल, असा  आहे. मुक्तेश्वर खोलेचा राजकारणी लक्षवेधी. त्यांना श्रुती कुलकर्णी, नितीन धोंगडे, राहूल काकडे, कपिल जोगदंड, अनिल मोरे, राहूल बोर्डे, उमेश चाबूकस्वार यांची चांगली साथ मिळाली आहे. शीतल तळपदे, प्रसाद वाघमारेंची प्रकाश योजना, विनोद आघाव यांचे संगीत संयोजन, राहूल काकडेंचे नृत्य दिग्दर्शन संहितेला पूरक. मूळ मराठवाड्यातील लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत असलेल्या हे राहूल भंडारे यांनी अद्वैत थिएटर्सतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

No comments:

Post a Comment