Wednesday 19 July 2017

कलेतून धर्मापेक्षा ...


कोणत्याही दोन देशांत, समाजांत काही उपद्रवी मंडळी तणावाचे वातावरण निर्माण करत असतात, तर बहुतांश कलावंत मंडळी तो कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण त्यांची बांधिलकी कलेसोबत असते. जगभरातील कलावंत म्हणजे एक देशच अशी त्यांची भूमिका असते. अर्थात दोन देशांत युद्ध झालेच तर भूमिकेत फरक पडू शकतो. पण युद्ध होऊच नये. उलट दोन्ही देशांतील समाजांमध्ये सामंजस्य निर्माण झाले पाहिजे, असा त्यांचा हेतू असतो. औरंगाबादेतील एमजीएमच्या महागामी नृत्य अकादमीत चीनच्या बीजिंग विद्यापीठातील नृत्यशास्त्र विभागातील तज्ज्ञांचे पथक गेल्या आठवड्यात आले होते. त्यांच्याशी दुभाष्याच्या मदतीने बोलताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. भारत आणि चीन दोन्ही राष्ट्रे महान परंपरा सांगणारी. चीन अलीकडील काळात महासत्ता म्हणून गणला जात आहे, तर भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे. त्यामुळे सिक्कीमच्या सीमेवर तणाव असला तरी दोन्ही देशांतील कलावंतांना परस्परांच्या कला प्रांताविषयी आकर्षण, कुतूहल आहेच. त्यातल्या त्यात चिनी कलावंतांना भारतीय नृत्य कलांविषयी खूपच अप्रूप आहे. विशेषत: शास्त्रीय नृत्य हा तेथील अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. त्यामुळे त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी बीजिंग नृत्यशास्त्र विभागाचे संचालक पंग डॅन, प्रा. शी मिन, सहायक प्रा. झेंग लू, एक्सिया वेइजिया आणि परराष्ट्र व्यवहार विभागातील व्यवस्थापिका लिन लिन आल्या होत्या. महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांनी यापूर्वी चीनचे दौरे करून तेथे सादरीकरण केले असल्याने त्यांनी महागामीची निवड केली होती. येथे या पथकाने कथ्थक आणि ओडिसी नृत्याची निर्मिती नेमकी कशी झाली. त्यातील पदन्यास, मुद्राभिनयामागचे शास्त्र नेमके काय आहे. त्यांचा भारतीय परंपरा, धार्मिकतेशी काय अनुबंध आहे, हे जाणून घेतले. अर्थात यात ब्रजेशकुमार या दुभाष्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी शास्त्रीय नृत्यातील सारेच मुद्दे इतक्या प्रभावी अन् अचूकपणे चिनी भाषेत समजावून सांगितले की, ते ऐकून ओडिसी, कथ्थकचा उलगडा पथकाला झाला. अभ्यास वर्ग झाल्यावर पंग डॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद अतिशय महत्त्वाचा होता. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे, तर भारतात लोकशाही आहे. त्यामुळे तेथे कलावंतांना फारसे स्वातंत्र्य नाही, असे ऐकिवात होते. ते सत्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतामध्ये सरकारचा कोणताही निर्णय पटला नाही तर कलावंत मंडळी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतात. लेख लिहून प्रक्षोभ व्यक्त करतात. सरकारने अल्पसंख्याक समाजाविरुद्ध पवित्रा घेतल्याचे वाटत असल्यास किंवा आपल्या मतप्रवाहांशी सहमत नसल्याचे सरकार सत्तेवर असल्याचे वाटत असल्यास कलावंत, लेखक सरकारी पुरस्कार परत करतात. प्रा. शी मिन, पंग डॅन म्हणाले की, आमच्याकडे असे कोणतेही स्वातंत्र्य कलावंतांना नाही. सरकारचे धोरण पटले नाही किंवा सरकार एखाद्या समाजाविरुद्ध असल्याचे दिसत असले तरी त्याविरुद्ध आंदोलनच काय, भावना व्यक्त करणेही केवळ अशक्य आहे. या दोघांनी त्या पुढे जाऊन जे सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे. ते म्हणाले की, आमच्याकडे प्रत्येक कलावंत केवळ कला साधना करणे एवढ्याच एका उद्देशाने कला प्रांतात आलेला असतो. मी उत्तम चित्रकार, उत्तम नर्तक, उत्तम नट-नटी होणार, एवढेच त्याचे ध्येय असते. एकूणातच चिनी माणूस अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठा अन् श्रद्धेने आपापल्या कामात स्वत:ला झोकून देतो. आणि चिनी सरकारही कलावंतांचा सन्मान कायम राहील, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था होईल, असे बघते. आपल्याकडे जसा प्रत्येक कलाकृतीला, कलावंतांना धार्मिक, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, कलावंतांवर जात, धर्माचा शिक्का मारला जातो, त्याला चीनमध्ये स्थानच नाही. कोणत्याही कलेच्या माध्यमातून धर्म नव्हे, तर संस्कृतीचीच जपणूक होते. संस्कृतीचे जतन चिनी माणसाच्या रक्तातच भिनले आहे. त्यामुळे एकसंघतेची भावना आपोआप निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. एकूणात एखादा पाहुणा आपल्याकडे काही शिकण्यासाठी आला असताना आपणही त्याच्याकडून खूप काही शिकू शकतो, असेच जणू काही ही चिनी मंडळी सांगत होती. त्यामुळे त्यांच्याकडून आपण सारेच भारतीय संस्कृती जपणुकीसोबत कलेविषयीची निष्ठा, श्रद्धा शिकलो तरी बरेच काही साध्य होऊ शकते. नाही का? 

No comments:

Post a Comment