Thursday 5 July 2018

नोकरशाहीचे असेही दर्शन

नाटकाच्या अखेरच्या प्रसंगात रंगमंचाच्या मध्यभागी हातात कुत्र्याचे पिल्लू घेऊन बसलेली नायिका दिसते. ती कुत्र्याला जोराने भुंकण्यास सांगते. पण ते कुंथतच राहते. आपण सारे सुन्न होऊन जातो. खरे तर नायिका कुत्र्याच्या पिल्लाला नव्हे तर भारतीय समाजव्यवस्थेला भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवण्यास सांगत आहे. आणि आपल्यातील बोटावर मोजण्याइतक्या लोकांतच आवाज उठवण्याची ताकद आहे. बाकीचे सगळे निमूटपणे तिच्यासमोर शरणागती पत्करत आहेत. आपणही त्या शरणागतात आहोत. गलितगात्र झालो आहोत, अशा जबरदस्त थपडा पडू लागतात. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हिंदी विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे गेल्या महिन्यात झालेल्या ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सवात सादर झालेल्या ‘ताजमहल का टेंडर’ नाटकाने संवेदनशील मनांना या थपडा लगावल्या. अजय शुक्ला यांनी लिहिलेल्या आणि चित्तरंजन त्रिपाठी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात जागोजागी भारतीय समाजव्यवस्था शोषून, पिळून, पोखरलेल्या नोकरशाहीचे वाभाडे काढले आहेत. अब्जावधी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून कोसो मैल दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचे हसतखेळत अक्षरश: कपडे फाडले आहेत. हे नाटक केवळ नोकरशाहीचे हिंस्त्र, ओंगळवाणे, हिडीस रूप दाखवून थांबत नाही. तर ही व्यवस्था खरेच का निर्माण झाली. तिच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले लोक तिच्यासमोर का नतमस्तक होतात. राजकारणी मंडळी नोकरशहांना डोक्यावर का घेतात, अशी विचारणा करताना यातून भारतीय समाजाची कधी सुटका होणार की नाही, असा मूलभूत प्रश्नही उपस्थित करते. नाटककाराने यात स्वत:चे मत नोंदवताना ‘अशी कित्येक युगे येतील आणि जातील. शहाजहानसारखे बादशहा तख्तावर येतील. नामशेष होतील. पण खरे राज्य नोकरशहांचेच असेल’ असे म्हटले आहे. ते ऐकल्यावर मागे वळून पाहताना आणि भविष्यात डोकावतानाही ते सत्यच असल्याचे जाणवते. यामुळे तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते. एवढ्या प्रभावीपणे संहितेची मांडणी झाली आहे. भारतात तर नोकरशाहीने कहर केला आहे. पण काही अपवाद वगळता बहुतांश देशांमध्येही अशीच स्थिती आहे. रशियात कामगार क्रांतीनंतर गरीब, शोषित, पिडितांच्या प्रतिनिधीचे राज्य आले. काही वर्षे उलटून जाताच तेथे नोकरशाही गरीब, शोषितांची पिळवणूक करू लागली. चीनमध्येही नोकरशाहीच बलवान, भ्रष्ट आहे. यातील एक महत्वाची बाब म्हणजे नोकरशाहीतील वरच्या सिंहासनावर बसलेले लोक नोकरशाहीतल्याच खालच्या लोकांचीही पिळवणूक करत असतात. नोकरशाहीला नाव ठेवणारे, त्यातील भ्रष्टाचारावर हल्ला चढवणारे लोक स्वत: नोकरशहा होताच त्या भ्रष्ट सिस्टीमचा एक भाग होऊन जातात. त्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे प्रत्येक माणूस स्वत:चे हक्क, अधिकारांबद्दल जागरूक नाही. समाज व्यवस्थेत आपली नेमकी काय जबाबदारी आहे, याचे भान बहुसंख्य लोकांना नाही. ज्यांना हे भान आहे, ते पुरेसे ताकदीचे नाहीत. किंवा काही काळ लढल्यावर ते शरणागती पत्करतात. जात, धर्म, पंथाच्या नावाखाली परस्परांवर हल्ले चढवण्यात मशगुल होऊ जातात. नोकरशाही आणि त्यांच्याआडून व्यवहार करणाऱ्या राजकारण्यांना, राजकारण्यांच्या चेल्या-चपाट्यांना ते पुरते ठावूक झाले आहे. अशी विस्तीर्ण पटाची मांडणी ‘ताजमहल का टेंडर’मध्ये आहे. त्यासाठी लेखकाने निवडलेले कथानक अतिशय साधेसोपे पण हृदयात भाला खुपसणारे, रक्तबंबाळ करणारे आहे.
शहाजहान बादशहा जेव्हा ताजमहल उभा करायचा ठरवतो. तेव्हा नेमके काय झाले असेल, अशी कल्पना लेखकाने फुलवली आहे. शहाजहान त्याकाळचा सर्वात पॉवरफुल राजा होता. भारताची अर्थव्यवस्था त्यावेळी प्रचंड मजबूत होती. आजच्याच भाषेत सांगायचे झाले तर जीडीपी किमान १५ टक्के होता. तरीही ताजमहलचे बांधकाम कासवगतीनेच झाले. त्यामागे एकमेव कारण नोकरशाहीच असावे, अशी मांडणी शुक्लांनी केली आहे. सध्याची स्थिती आणि शहाजहानचा काळ यांची सांगड घातली आहे. त्या काळातही एक चीफ इंजिनिअर असेल. या कामातून मलिदा काढण्यासाठी त्यानेही उचापत्या केल्या असणार. त्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, म्हणून खटपटी केल्या असतील. शहाजहानच्या दरबाऱ्यांनी इंजिनिअरविरोधात मोर्चेबांधणी केलीच असेल. एकदा या बांधकामात पैसाच पैसा आहे, असे कळाल्यावर त्यावेळच्या काही उचापतखोर लोकांनी विरोध दर्शवून कमाई केलीच असणार, असा विस्तार अतिशय खुमासदारपणे मांडला आहे. दिग्दर्शक त्रिपाठी यांनी संहितेचे मूल्य, त्यातील खाचाखोचा आणि उपहास क्षणाक्षणाला उफाळत, ओसंडत राहिल, याची काळजी घेतली आहे. सादरीकरणाला प्रचंड वेग असला तरी प्रत्येक घाव वर्मी लागेल एवढी मेहनत घेतली आहे. दोन प्रसंगांमधील धागा गुंफणे, व्यक्तिरेखांना संहितेपलिकडे नेऊन सशक्त करणे, संवादशैलीतून अभिनेता, अभिनेत्री बलवान करणे आणि नि:शब्द शब्दांना बोलते करणे ही दिग्दर्शकाची खरी वैशिष्ट्ये किंवा ताकदीची स्थळे मानली जातात. ती त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनात पुरेपुर दिसतात. ‘ताजमहल का टेंडर’ यशस्वी करण्यात जेवढा वाटा लेखकाचा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिक दिग्दर्शक त्रिपाठींचा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्रिपाठींनी या नाटकाचे संगीतही दिले आहे. ते देखील चपखल, प्रवाही आणि संहितेला अर्थ देणारे आहे. लेखक, दिग्दर्शकाला हवे तेच अतिशय सू्क्ष्मतेने मांडणारे कलावंत अत्यंत दुर्मिळ. पण या नाटकात तेही जमून आले आहे. शहानवाज खान (शहाजहान) आणि चीफ इंजिनिअर गुप्ता (सुरेश शर्मा) यांचा अभिनय पाहताना त्याचा अनुभव येतो. दोघांनी भूमिकांत अक्षरश: जीव ओतला आहे. असे म्हणतात की, रंगमंचावर वाचिक अभिनय जास्त असतो. म्हणजे संवादफेकीवर व्यक्तिरेखा फुलत जाते. पण काही कलावंत असे असतात की त्यांचा अभिनय संवादासोबत डोळ्यांमधूनही प्रेक्षकांशी बोलू लागतो. असे कलावंत अभिनेते, अभिनेत्री म्हणून ओळखले जाऊ लागतात. शहानवाज आणि शर्मा हे त्यापैकीच एक आहेत. व्यक्तिरेखेवर हुकूमत म्हणजे नेमके काय याचा वस्तुपाठच त्यांनी नव्या पिढीतील रंगकर्मींसमोर उभा केला. इतर कलावंतांमध्ये औरंगाबादचा सिद्धेश्वर थोरात, दीपकुमार, श्रुती मिश्रा, शंपा मंडल, राजू रॉय, अपर्णा मेनन, अपराजिता, मोहनलाल, बर्नाली बोरा, नवीनसिंग ठाकूर आदींनी धमाल केली आहे. ‘ताजमहल का टेंडर’चा पुन्हा प्रयोग औरंगाबादेत झाल्यास तो चुकवू नये, अशीच ती आहे. आपण सारेच अलिकडील काळात शोषणाविरुद्ध मूक, अंध, बहिरे नायक होऊ लागले आहोत. हे नाटक पाहून भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध मनात छोटीशी ठिणगी पडली तरी पुढील काही वर्षात काही काळापुरता का होईना वणवा पेटेल, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment