Thursday 26 July 2018

जलधारांसोबत ...

भारत हा खरंच खूप विचित्र देश आहे. इथे तुमचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवा, असे वारंवार सांगावे लागते. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी एक पोलिस उभा करावा लागतो. हा देश तुमचाच आहे. त्यात रस्त्यावर थुंकू नका, कचरा टाकू नका, अशा जाहिराती कराव्या लागतात. थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करावा लागतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेतील ओळींची वारंवार आठवण करून द्यावी लागते. कारण एकमेकांशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध ठेवून जाती, धर्माविषयी सोशल मिडिआवर विष कालवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. झुंडीने हल्ले होत आहेत. हा अमुक जातीचा म्हणजे वाईटच. तो तमूक धर्माचा म्हणजे राक्षसच, असा प्रचार सुरू आहे. चारही बाजूंनी असा मारा होत असताना काहीच चांगले होत नाही. कोणालाही त्याविषयी काही वाटत नाही. कोणी त्याविरोधात उपाययोजना करत नाही, असे नाही. संख्येने कमी असतील पण काही व्यक्ती निश्चित धोरण आखत समाजाला जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन एकत्र आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष किशोर जगन्नाथ शितोळे त्यापैकीच एक आहेत. भेगाळलेल्या जमिनीला जलधारांना भिजवण्यासोबत ते सामाजिक एकोप्याचीही पेरणी करत आहेत. पाणी उपलब्ध होण्याइतकेच समाज एक राहणे महत्वाचे आहे. जातीय, धार्मिक द्वेषापलिकडे एक जग आहे. आणि ते खूपच समाधान मिळवून देणारे आहे, असा संस्कार ते तरुण पिढीवर करत आहेत.  
तीन-चार वर्षांपूर्वी दुष्काळाचे संकट मराठवाड्याला गिळंकृत करण्यास निघाले होते. सरकारकडून नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस सुरू झाला होता. जलयुक्त शिवारची योजना जाहीर झाली होती. काही गावांत त्याची कामे खरेच लोक सहभागातून आणि प्रामाणिकपणे केली जात होती. अनेक गावांत ठेकेदार, राजकारणी घुसून स्वतःचे बंधारे बांधून घेऊ लागले होते. अशावेळी महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरेने प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाऊंडेशन स्थापन केले. त्या माध्यमातून नाला खोलीकरण, नदी रुंदीकरण, तलावातील गाळ काढण्याची कामे सुरू झाली. तेव्हा त्यापासून मराठवाड्यातील काही तरुण, उद्योजकांनी प्रेरणा घेतली तर किती बरे होईल, असे वाटत होते. आणि मितभाषी, कायम नाविन्याच्या शोधात असलेल्या किशोर शितोळे यांनी ती अपेक्षा पूर्ण केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या उन्हाळ्यात त्यांनी शेकडो ग्रामस्थांची तहान भागेल, त्यांच्या शेताला पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था त्यांच्या जलदूत संस्थेमार्फत ग्रामस्थांना सोबत घेऊन केली आहे. आधी स्वतःचा वाटा देऊन आर्थिक पाठबळ लोकवर्गणीतून उभे केले.एवढेच नव्हे तर शहरातील लोकांमध्येही जागरुकता आणली आहे. विशेषतः सातारा देवळाई भागावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. तेथे महापालिकेचे पाणी नाही. नजिकच्या काळात पोहोचण्याची शक्यता नाही. भूगर्भातील पाणी खोल खोल होत चालले आहे. अशा काळात तुम्हालाच तुमचे पाणी मिळवावे लागेल. पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवावा असे घरोघरी जाऊन समजावून सांगितले. केवळ समजावणुकीचे कार्यक्रम तर अनेक संस्था करत असतात. शितोळेंनी त्यापुढे एक पाऊल टाकले. ज्यांनी जल पुनर्भरणाची तयारी दाखवली. त्यांना पूर्ण तांत्रिक सहाय्य प्लंबिंग असोसिएशनच्या मदतीने उपलब्ध करून दिले. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील धूपखेडा गावाजवळील येलगंगेचे पुनरुज्जीवन इतर उद्योजकांच्या मदतीने करण्याचे अत्यंत कठीण आव्हान त्यांनी पेलले. सातारा, मुकुंदवाडी, वानखेडेनगर येथील पुरातन बारवांची साफसफाई केली. तेथील बुजलेले पाण्याचे झरे पुन्हा वाहू लागले आहेत.
हे सारे काही करताना शितोळे यांनी जी पद्धत अवलंबली ती अफलातून आहे. तरुणाई हीच खरी शक्ती आहे. तिला योग्य दिशा दाखवली तर ती अफाट काम करू शकते. लोकांच्या उपयोगी पडू शकते. शिवाय विविध जाती, धर्म, पंथ तसेच राजकीय विचारसरणींना मानणारे तरुण एकत्रित काम करू लागले तर त्यांच्यातील द्वेषाची धार निश्चित कमी होईल. ते एकमेकांना समजून घेतील. परस्परांच्या मतांचा आदर करू शकतील, हे त्यांना पक्के ठावूक होते. त्यामुळे त्यांनी जलदूतच्या प्रत्येक उपक्रमात तरुणांना सोबत घेण्यावर भर दिला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दलित पँथर, रिपब्लिकन अशा सर्व पक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून अमूक एका गावातील श्रमदानासाठी यावे, असे आवाहन ते करतात. त्याला आता भरभरून प्रतिसाद मिळतो. तरुणाई गाण्यांच्या तालावर नाचत-गात अंग झोकून काम करते. मग गावकऱ्यांसोबत चुली पेटवून स्वयंपाक केला जातो. रुचकर, खमंग भाकरी, पिठलं, ठेचा असा बेत असतो. तो संपवून मुले एका नव्या उमेदीने, सळसळत्या उत्साहाने घरी परततात. तेव्हा त्यांच्यात माणुसकीचा एक नवा कोंब पेरला गेलेला असतो. जात, धर्म, पंथ आणि राजकारण म्हणजेच सर्वस्व नाही. त्यात जगाचे, भारताचे सौख्य सामावलेले नाही. आपण सारे मतभेद बाजूला ठेवून गोरगरिबांच्या मदतीला एकत्रपणे धावून जाणे हीच खरी सेवा, असल्याचा विचार त्यांच्या मनात निश्चितपणे पेरला जातो. माझ्यामते शितोळेंच्या उपक्रमांची खरी ताकद आणि वैशिष्ट्य हेच आहे. कारण अनेकजण स्वतःच्या गोतावळ्यालाच सोबत घेऊन काम करत भेदाच्या भिंती आणखी उंच करत आहेतच. शितोळेंची जलदूत प्रारंभापासून भेद मोडण्यासाठीच काम करत आहे. प्रारंभीच्या काळात त्यांच्यासमोरही अनेक अडचणी आल्या. हेतूवर शंका उपस्थित करत टीकास्त्र सोडले गेले. त्यावर त्यांनी एक इंचही पाऊल मागे घेतले नाही. उलट दोन पावले पुढे टाकण्याची हिंमत दाखवली. यापुढील काळात जलदूतचे कार्य आणखी विस्तारत जावो. त्याचा पाया असाच सामाजिक एकोप्याचाच कायम राहो, अशी अपेक्षा आहे.  द्वेषाचा वणवा आणि त्यावर फुंकर घालत बसलेली मंडळी पाहता असंख्य शितोळेंची गरज आहे. चांगली कामे होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा ती होतात तेव्हा दीर्घकाळ पक्की राहतात. शितोळे करत असलेले जलपुनर्भरण, सामाजिक एकोप्याचे कामही असेच चांगले आहे. ते आणखी विस्तारत नेऊन मजबूत करण्यासाठी किमान चार-पाच जणांनी प्रेरणा घेतली तर देशाचे भले होईल ना?

No comments:

Post a Comment