Thursday 19 July 2018

मूक वेदनांचे आक्रंदन

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर होणाऱ्या सरकारी मदतीच्या योजना दिसायला गोंडस, गुटगुटीत असतात. त्या ग्रामीण भागात लवकर पोहोचतच नाहीत. जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्यातील प्राण अधिकाऱ्यांनी कधीच काढून घेतलेला असतो. दुसरीकडे निसर्गाचा, दलालांच्या लुटीचा, राजकारण्यांच्या लुटमारीचा मार आहेच. तिसरा भाग आहे तो आपल्या संस्कृती, परंपरांचा. त्याच्या जोखडाखाली मुली, महिलांची आयुष्य होलपाटून निघत आहे. पुरुष काही बोलूतरी शकतात. पण महिलांचे जीणे निष्पर्ण, वठलेल्या झाडांसारखे आहे. त्यांचे स्वतःचे असे विश्व नाहीच. बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार त्यांना दिलेलाच नाही. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांनी हेच वास्तव ‘नली’ या कलाकृतीत मांडले आहे. जळगावच्या परिवर्तन संस्थेने त्याचा एकपात्री प्रयोग रविवारी गोविंदभाई श्रॉफ अकादमीच्या सभागृहात केला. एकतर देशमुख यांच्या कसदार लेखणीला धार चढलेली. योगेश पाटील यांचे शब्दनशब्द घासून पुसून घेतलेले, चौकटी मोडून टाकणारे दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनेते हर्षल पाटील यांनी विलक्षण आत्मियतेने जिवंत केलेली नली. सारेच चटका लावून जाणारे. संवेदनशील मन एखाद्या भट्टीत भाजून काढणारे होते. एकपात्री असूनही असा अनुभव ‘नली’ पाहताना येतो. यावरून शेतकरी महिलेचे दुःख किती प्रभावीपणे रंगमंचावर आविष्कृत झाले असावे, याचा अंदाज व्यक्त करता येईल.
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे दिग्गजांचा. प्रा. डॉ. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांनी तर कलावंतांच्या किमान तीन पिढ्या घडवल्या. आता त्यांची परंपरा प्रा. डॉ. किशोर शिरसाट अत्यंत प्रामाणिकपणे चालवत आहेत. नवनव्याचा ध्यास आणि सर्व प्रवाहातील रंगकर्मींना संधी हे त्यांचे तत्व आहे. त्याची सुरुवात त्यांनी चार वर्षांपूर्वी रंगयात्रा उपक्रमातून केली. रंगमंचावर नेहमी काहीतरी घडत राहावे. विशेषतः तरुण पिढीचे अविष्कार कोणत्या का होईना रुपात सादर झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. विशेष म्हणजे त्यांनी विभागाचे दरवाजे सर्वच रंगकर्मींसाठी खुले ठेवले आहेत. केवळ औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील कोणीही येऊन त्याची कलाकृती सादर करू शकतो, असे धोरण राबवले आहे. त्यातून जळगावच्या परिवर्तन संस्थेने ‘नली’ हा एकल प्रयोग अविष्कृत केला. नव्याने काही सांगू पाहणारी ही कलाकृती अनुभवण्याची संधी प्रा. शिरसाट यांच्यामुळे औरंगाबादकरांना मिळाली

आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख यांनी ग्रामीण भागात आयुष्यभर काबाडकष्ट करून जगणाऱ्या, सुखाचा एखादा क्षण वाट्याला यावा म्हणून क्षितिजाकडे पाहत राहणाऱ्या आणि मातीत कष्ट करत करत मातीतच मिसळून जाणाऱ्या महिलांचे दुःख नलीमध्ये मांडले आहे. काहीवेळा महान लेखक व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ कादंबरीतील अंजीचे पात्र देशमुखांनी टिपून मांडले की काय, असे वाटत राहते. ‘शेतात राबणाऱ्या सगळ्या बायकांचे चेहरे एकसारखेच दिसतात’ असं एक काळजाला भेगा पाडणारं वक्तव्य ते करतात. ‘नली’मध्ये अशी हृदय तळतळून टाकणारी अनेक विधाने आहेत. त्यातील तीक्ष्णता केवळ विधानांपुरती थांबत नाहीत तर हे भारतीय समाजातील भयाण सत्य आहे. आणि त्याला तुम्ही सारेच जबाबदार आहात, असेही सांगते. ही सारी प्रखरता, वास्तव रंगमंचावर आविष्कृत करणे म्हणजे एक मोठे आव्हानच. ते दिग्दर्शक योगेश पाटील, अभिनेते हर्षल पाटील यांनी एकदम मनापासून पेलले आहे. देशमुख यांना जे काही सांगायचे आहे. तिथपर्यंत ते निश्चितच रसिकांना घेऊन जातात. महान दिग्दर्शक पीटर ब्रुक त्यांच्या ‘एम्प्टी स्पेस’ पुस्तकात म्हणतात की जमिनीच्या कोणत्याही भागावर एक अदृश्य रेषा आखून एक अभिनेता त्यात उभा राहतो आणि प्रेक्षक त्याला तन्मयतेने पाहू लागतो. तेथेच रंगभूमीचा जन्म होतो. नलीचा प्रयोग पाहताना तसाच काहीसा अनुभव येतो. हर्षल पाटील तासाभरात कहाणी नाट्यान्वित करताना रंगमंचावर अख्खा गाव आणि त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा उभ्या करतात. ती कहाणी थोडक्यात अशी की, खानदेशातील एका अतिशय छोट्या खेड्यागावातील बाळ्या लहानपणापासून हुशार. वर्गात शिकणारी सुंदर, चुणचुणीत नली त्याला आवडू लागते. तिलाही बाळ्या आवडत असतो. पण नली अभ्यासात कमालीची कच्ची. तिच्या घरी शिक्षणाचा गंधही नाही. हळूहळू ती मागे पडत जाते. दोघांचे प्रेम अव्यक्तच राहते. बाळ्या मोठा अधिकारी होतो. नलीचे गावातल्याच एका सुमार माणसाशी लग्न होते. ती शेतात राबू लागते. संसाराचा गाडा ओढता ओढता तिच्यातील माणूसपण मरून जाते. एक दिवस ती कर्जाला कंटाळून आत्महत्या करते. कायम संकटांशी दोन हात करणाऱ्या नलीनं खरंच आत्महत्या केली असावी काॽ शेतात काम करणाऱ्या बाया मातीत का मिसळतातॽ असा सुन्न करणारा प्रश्न विचारून प्रयोग थांबतो. पण तेथून तो प्रत्येक संवेदनशील मनात असंख्य विचारांचा प्रवास सुरू करून देतो.

प्रयोग एकपात्री असल्यामुळे आवाजातील वैविध्य, भाषा शैली अभ्यासपूर्णच लागेल, याचा अभ्यास दिग्दर्शक योगेश पाटील यांनी केला होता. तो त्यांनी हर्षल यांच्याकडूनही करून घेतला. त्यामुळे रुढ अर्थाने आवाजाला मर्यादा असल्या तरी त्याच्या वापरात हर्षल यांनी कोणतीही मर्यादा जाणवू दिली नाही. ग्रामीण भागातील दुःख, वेदना सारेकाही आत्मसात केले असल्याने सुरुवातीची एक-दोन मिनिटे सोडली तर त्यांच्या अभिनयात, रंगमंचावरील वावरात कमालीची सहजता जाणवत होती. शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यावर नाट्य किती उंचीवर जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर यांनी वेगळी वाट निवडत या प्रयोगाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. होरिलसिंग राजपूत यांची प्रकाश योजना, राहूल निंबाळकर यांचे पार्श्वसंगीत व्यक्तीरेखा म्हणून प्रेक्षकांशी बोलते एवढी त्यात कल्पकता आहे. मंजुषा भिडे यांची वेशभूषा ठीकठाक.

No comments:

Post a Comment