Wednesday 12 December 2018

दशा, दिशेचे नाट्य

हिंदू धर्म, भारतीय  समाजाला लागलेला सर्वात काळाकुट्ट डाग म्हणजे वर्ण, जाती व्यवस्था. हजारो वर्षांपासून हा डाग कायम आहे. जाती-पातीच्या या अमानवीय, क्रूर पद्धतीतून महामानव, तेजसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना बाहेर काढले. तु देखील माणूस आहे. तुलाही स्वाभिमान आहे. तो मुळीच हरवू नको. या देशावर तुझाही सवर्णांइतकाच अधिकार, हक्क आहे. तो मिळवण्याचा, अबाधित राखण्याचा मार्ग मी तयार करत आहे., असे बाबासाहेबांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सवर्णांनी पुढील काळात दलितांना चिरडून टाकू नये म्हणून कायद्याचे संरक्षण दिले. उत्तम शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देताना इतरांप्रमाणे  चांगल्या दर्जाची सरकारी नोकरी मिळेल, अशी व्यवस्था केली. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणातही दलितांचे स्थान अबाधित राहिल. त्यांनाही सत्तेत वाटा कसा मिळू शकेल, हे सांगितले. एकदा सत्तेत वाटा मिळाला सत्ताधारी जमात होऊन हे दलित नेते खालच्या पायरीवर उभ्या आपल्या बांधवांना मदत करून वरच्या पायरीवर आणतील, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. नेमकी ही अपेक्षाच फोल ठरत चालल्याची भावना आंबेडकरी चळवळीत रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २५–३० वर्षांत कमालीची वाढली आहे. स्वाभिमानाने चळवळ कशी चालवायची. कोणाविरुद्ध लढायचे. कोणाला फटकारायचेॽ सगळ्या सवर्णांना एका तराजूत तोलणे खरंच योग्य आहे काॽ आणि हे सगळं करत असताना व्यावहारिक जगात जगायचं कसंॽ हलाखीच्या चक्रातून बाहेर कसं पडायचंॽ असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले आहेत. कारण सत्ताधारी जमात होण्याच्या नावाखाली राजकीय तडजोडी करत अनेक नेते वरच्या पायरीवर गेले. पण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खालच्या पायरीवर उभ्या तमाम दलित समाजाला वरती आणण्यासाठी सत्ता वापरलीच नाही. स्वतःच्या समर्थकांपुरतेच ते मर्यादित राहिले. आणि इतरांना सत्तेच्या सोपानापासून कसे रोखता येईल, यासाठीच शक्ती पणाला लावू लागले. महाराष्ट्रात, मराठी मुलुखात हे अधिक प्रमाणात झाले, असे सिद्धहस्त साहित्यिक, समीक्षक आणि नियोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांना जाणवले. ही जाणिव त्यांना कमालीची टोचू लागली. अस्वस्थ करू लागली. ही अस्वस्थता त्यांनी ‘भाई तुम्ही कुठे आहात’ या दोन अंकी नाटकात अधोरेखित केली आहे. आंबेडकरी चळवळीच्या दशा, दिशेला अतिशय कमी, मोजक्या पण जहाल शब्दांत वाट दाखवणारे हे नाट्य आहे. जहालता असली  तरी त्यात विखार, द्वेष नाही. उलट सगळा समाज आंबेडकरी जनतेसोबत जोडण्याचा एक आशावादी सूर डॉ. कांबळे या नाट्यातून ठामपणे मांडतात. आंबेडकरांच्या नावावर मोठ्या झालेल्या नेत्यांना प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करताना, त्यांच्यावर कठोर प्रहार करतानाही त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा नाही. त्यामुळे ‘भाई तुम्ही कुठे आहात’ अधिक व्यापक भूमिकेचे असल्याचे जाणवत जाते. परिणाम करत राहते. 
दोन अंकात आणि बारा दृश्यात डॉ. कांबळे यांनी नाट्याची मांडणी केली आहे. मंत्री झालेले भाई, एकेकाळी त्यांच्यासोबत दलितांच्या हक्कासाठी लढलेला मिलिंद, भाईंचे सहकारी दिनकरराव, भाईंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्यातील लढवय्येपणाची धार बोथट करणारे भास्करराव यांच्यातील संघर्ष, संवाद, प्रवास बारा प्रवेशात आहे. त्यात एक प्रवेश दलितांच्या हक्कासाठी स्वजातीयांशी वैर पत्करणाऱ्या एका ब्राह्मण दांपत्याचाही आहे. आंबेडकरी चळवळीची दशा नेमकी काय झालीय, दिशा काय आहे आणि प्रबोधन करणे, कार्यकर्त्याच्या मनातील खदखद नेत्यांपर्यंत पोहोचवणे, हेच डॉ. कांबळे यांच्या लेखनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी संपूर्ण मांडणी उद्दिष्टाला पूरकच केली आहे. नाटक लोकप्रिय, वादग्रस्त, मसालेदार करण्यासाठी ओढूनताणून नाट्यमयता, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स किंवा अन्य विशिष्ट गणिते पेरलेली नाहीत. एका निखळ, प्रामाणिक भावनेतून त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे ते दिग्दर्शकालाही प्रचंड संधी उपलब्ध करून देते. नाट्य लेखकाला रंगमंचावर  व्यक्तिरेखा कशा उभ्या राहतात, हे संवादांमधून सांगावे लागते. आणि दोन संवादांमधील निःशब्द क्षणांतून त्याला अभिनयाच्या जागा दाखवून द्यायच्या असतात. यात डॉ. कांबळे यशस्वी झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सरस्वती भुवन महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दिलीप घारे यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे हे नाटक सत्ताधाऱ्यांमधील किंवा विशिष्ट उच्चभ्रू जातींमधील दोषांवर प्रखऱ भाष्य करते. पण त्याचबरोबर दलित चळवळी संबंधात आपल्याला अंतर्मुख करते. भारतीय विशेषतः मराठी सामाजिक रचनेवर भाष्य करताना आजच्या काळात सशक्त दलित चळवळ का उभी राहू शकत नाही, असा प्रश्न उभे करते. त्याची काही उत्तरेही देण्याचा निश्चित प्रयत्न करते. त्यामुळे ‘भाई तुम्ही कोठे आहात’ दलितविषयक प्रश्नांची मांडणारी करणारे दुर्मिळ, मौल्यवान नाटक आहे. औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनाचे दीपाली कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांनी ते पुस्तक रूपात प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतुक गोळेगावकर यांचे मुखपृष्ठ नेमकेपणा सांगणारे. आता दोन वाक्ये सादरीकरणाविषयी. या नाटकाचे काही प्रयोग झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. आता येत्या काळात आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक संस्था, महाविद्यालय, वसाहतीत प्रयोग व्हावेत. म्हणजे डॉ. कांबळे यांना हृदयापासून तळमळीने जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. नेत्यांचे हृदय परिवर्तन होण्याची, त्यांना कोणाची कणव येण्याची शक्यता नाहीच. पण समाजावर त्याचा परिणाम होऊन एक दोन चांगले सामाजिक बदल झाले तरी ते पुरेसे आहे. 

No comments:

Post a Comment