Thursday 20 December 2018

एक कोटी २० लाखांचे पान

एका गावात एक रिकामटेकडा तरुण होता. एक-दोन वर्षे थोडीफार कष्टाची कामे केल्यावर त्याच्या डोक्यात आपण झटपट श्रीमंत झाले पाहिजे, असा विचार घोळू लागला. अशा श्रीमंतीचा मार्ग नेमका कोण दाखवेल, याचा त्याने शोध सुरू केला. गावातील प्रत्येकाला तो गाठून गाठून मला कोणीतरी भेटवून द्या म्हणू लागला. तेव्हा एकाजणाने सांगितले, त्या चार डोंगराच्या पलिकडे एका झोपडीत फकीर राहतो. त्याच्याकडे झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र आहे. झाले. खूप मागे लागलास तर मिळेल तुला मंत्र. तरुण फकीराकडे पोहोचला आणि म्हणाला, ‘मला श्रीमंत होण्याचा मंत्र द्या’. फकीर म्हणाला, अरे बाबा असा काही मंत्र नाही माझ्याकडे. पण तरुण हट्टाला पेटला होता. झोपडीत मुक्काम ठोकत त्याने फकिरामागे एकच भुणभुण लावली. कंटाळून फकिराने त्याला एका झाडाच्या पानावर काहीतरी खरडून दिले. हा मंत्र दहा लाख वेळा म्हटला की, श्रीमंत होशील, असे सांगितले. तरुणाला अत्यानंद झाला. पान घेऊन तो पळत सुटला. फकिराने ओरडून सांगितले, हे पहा मंत्र म्हणत असताना मनात लोण्याच्या गोळ्याचा विचारही आला तर मंत्राचा प्रभाव राहणार नाही. त्यावर ‘अहो मी तो लोण्याचा गोळा काय असतो तेच मला माहिती नाही. तर त्याचा विचार कसा येईल.’ असे म्हणत तरुण गावात पोहोचला. मंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी फकिर लोण्याच्या गोळ्याचे काय सांगत होता बरं, असे त्याने आठवून पाहिले. आणि झाले त्याच्या डोळ्यासमोर लोण्याच्या गोळ्याचे चित्र फिरू लागले. दहा-बारा वेळा मंत्र म्हणताच पुन्हा पुन्हा लोण्याचा गोळा दिसू लागला. कितीही प्रयत्न केले तरी लोणी काही नजरेसमोरून हटेना. वर्षभर हाच प्रकार चालला. लोक तरुणाला वेडा म्हणून लागले. अखेर कंटाळून त्याने मंत्र लिहिलेले पान चोळामोळा करून टाकले.
ओशो रजनीशांनी सांगितलेल्या एका बोधकथेचा हा काहीसा बदललेला सारांश. तो आठवून दिला महापालिकेच्या कारभाराने. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत एक कोटी २० लाख रुपयांच्या उधळपट्टीचा विषय आला. औरंगाबादच्या मानगुटीवर मनपाचे कारभारी, पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याचा प्रश्न टाकला आहे. तो सोडवण्याच्या नावाखाली कमाईचे नवे रस्ते कसे शोधले जात आहे, याचे दर्शन त्यात घडले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत. म्हणून लोकांचे उद्बोधन, प्रबोधन करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्ली येथील फीडबॅक फाऊंडेशन, नॉलेज लिंक आणि नांदेडच्या अॅक्शन फॉर बेटर टुमारो संस्थांना पाचारण केले. पाच महिन्यात प्रत्येकी दहा लाख रुपये असे एका संस्थेला चाळीस लाख म्हणजे एकूण एक कोटी २० लाख रुपये देऊन झाल्यावर या संस्थांनी नेमके काय काम केले. त्याचा फायदा झाला की नाही, हे शोधण्यासाठी स्थायी समितीने त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची उलटतपासणी केली. त्यात एकवेळा महापौर, सभापती राहिलेले गजानन बारवाल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कोंडीत पकडले. कुठे झाले काम. कोणत्या वॉर्डांत केले प्रबोधन, उद्बोधन अशी विचारणा केली. स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनीही बारवालांप्रमाणेच तिन्ही संस्थाचे काम निरुपयोगी असल्याचे मत नोंदवले. एवढ्यावर प्रकरण थांबले नाही तर दस्तुरखुद्द भोंबे यांनी संस्थांच्या प्रबोधनाचा अपेक्षित उपयोग झालाच नाही. लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत, असे सांगितले. मग सभापतींनी फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता या आदेशातून काहीही साध्य होणार नाही. तिन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. लोकांना विनवणी केली. पण लोकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. कारण ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ड्रम नाहीत, असा निष्कर्ष निघेल. संस्थांना दिलेला पैसा पुन्हा वसूल करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची त्यात चौकशी लावली जाईल. प्रबोधन, उद्बोधनासाठी इंदूर, भोपाळ, नागपूर, पुणे, मुंबईच्या नामवंत संस्थांनाच बोलवावे, असा फर्मान निघून सहा महिन्यांत अशा संस्था कामकाजही सुरू करतील. मूळात प्रश्न आहे की, या संस्था प्रबोधन करतात की नाही, हे चार महिने एकाही नगरसेवकाने का पाहिले नाही. संस्थेचे कर्मचारी काहीच करत नाही, हे त्यांनी आयुक्तांना का सांगितले नाही. की संस्थांना कोंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता औरंगाबादकरांनी करापोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेले १ कोटी २० लाख लोकहिताच्या नावाखाली उधळल्याचे प्रकरण दफन केले जाईल. कारण ओशो रजनीशांनी सांगितलेल्या कथेनुसार इथे लोण्याच्या गोळ्याचा ध्यास असलेल्यांची कमतरता नाही. केवळ एका मंत्राचा जप करून श्रीमंत व्हायचे आहे. आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत. लोकांच्या सेवेसाठी नोकरीत आहोत. लोकांनी कष्टाने, पै पै करून जमवून दिलेल्या पैशातून आपला पगार होतो, याचा विसर पडला आहे. हा पैसा आपल्या खिशात घालण्यासाठी दिलेला नाही, हे तर त्यांना मान्यच नाही, अशी स्थिती आहे.

No comments:

Post a Comment