Wednesday 12 December 2018

मुक्या प्राण्यांचातरी दुआ घ्या

दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठा-वेरुळच्या लेण्या झाल्या. हजार – बाराशे वर्षानंतर दौलताबादचा किल्ला उभा राहिला. चारशे वर्षांनी बिवी का मकबरा, पाणचक्की, निर्माण झाली. मग सगळे दुष्काळ पडल्यासारखे कोरडेठाक झाले. हे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त मनमोहनसिंग यांना ४० वर्षांपूर्वी खटकले. म्हणून औरंगाबाद शहराच्या वैभवात भर टाकणारे सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय उभे राहिले. आता एकदा ते वैभव म्हटले की त्याची निगा राखण्याची जबाबदारी वैभवाच्या तळ्याभोवती बसून दिवसा एक – एक लोटा आणि रात्रीच्या वेळी मनसोक्त पाणी पिणाऱ्यांचीच आहे की नाहीॽ पण औरंगाबादमध्ये असे कोणतेही नियम, अलिखित संकेत नाहीत. ज्या कामात फारसा पैसा नाही ती कामे लोकांसाठी कितीही महत्वाची असली तरी सगळ्यात शेवटी ठेवायची, असे धोरण कायम राहिले. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची नोटीस केंद्रीय झू ऑथॉरिटीने काढली आहे. आता ती रद्द करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले लवाजमा घेऊन दिल्लीची वारी करणार आहेत. त्या दौऱ्यावर किमान ६०-७० हजार रुपये ते खर्च करतीलच. अर्थात हा पैसा जनतेचा असल्याने त्यावर कोणीही, कधीही आक्षेप घेणार नाही. महापौर, आयुक्तांनाही त्याचे काहीच वाईट वाटणार नाही. जनतेचा पैसा अशाच कामांसाठी वापरण्याची सवय पूर्वापार चालत आली आहे. तर महापौर दिल्लीला जाऊन झू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना भेटतील. सोबत अर्थातच खासदार चंद्रकांत खैरे असतील. आणि मग काही दिवसांची मुदतवाढ मिळवून महापौर परततील. वर्ष-सहा महिन्यांनी पुन्हा हाच प्रसंग पाहण्यास, ऐकण्यास मिळेल. कारण खरे पाहिले तर ही कहाणी २००६-०७ पासून सुरू आहे. तेव्हा प्राणीसंग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. एस. व्ही. रिझवी यांनी हरीण, वाघाच्या कातडीचा गैरव्यवहार केला, अशी बातमी फुटली. रिझवी यांच्यावर खार खाणाऱ्या त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांनीच ती प्रसारमाध्यमांना पुरवली असावी. त्यामुळे पुढे सारे काही नियोजनबद्धरितीने झाले. गैरव्यवहार झाला की नाही, याचा खरा तपास लागलाच नाही. डॉ. रिझवी निलंबित झाले. त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. लगोलग एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती महापालिका प्रभाव क्षेत्राच्या किंचित बाहेर असल्याने संवेदनशीलतेने प्राणी संग्रहालयाची तपासणी झाली. तेव्हा एवढ्या कमी क्षेत्रफळावर एवढ्या मोठ्या संख्येने प्राणी ठेवणे चुकीचे आहे, असे समितीने स्पष्ट केले. काही प्राण्यांचे पिंजरे तातडीने बदला, अशी सूचना केली. तर केंद्रीय झू ऑथॉरिटीने तत्काळ प्राणीसंग्रहालय शहराबाहेर हलवा, असे म्हटले होते. त्यास आता किमान दहा वर्षे होऊन गेली आहेत. महापौरांनी दिल्लीवारी जरूर करावी. पण एकदा जुनी कागदपत्रेही चाळून बघावीत. थोडा अभ्यास करून  गेलात तर प्राणीसंग्रहालयाच्या विषयावर ठोस मार्ग काढता येईल. कारण मधल्या काळात काहीच झाले असे नाही. पण जे व्हायला हवे होते, ते झालेलेच नाही. सरकारी कारभाराच्या कासवगतीने कासवालाही लाजवले. मिटमिटा – शरणापूर येथे प्राणीसंग्रहालयासाठी १२५ एकर जागेच्या १२५ वेळा घोषणा झाल्या. खुल्या, मोकळ्या जागेत जगण्याची स्वप्ने पाहत पाहत अनेक प्राण्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. जे जगताहेत त्यांच्याही  आशा मावळल्या आहेत. जे कारभारी लाखो लोकांना पाणी देण्यासाठी पंधरा-पंधरा वर्षे घेतात. ते आपल्यासाठी किमान ५० वर्षे तरी काही करणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली असावी. पण काही प्राणी, औरंगाबादचे नागरिक अजूनही आशावादी  आहेत. वाटे-हिस्से करून का होईना, आमदारपदाची स्वप्ने पडत असल्याने का असेना शहरासाठी थोडेफार काम करण्याची घोडेले यांची इच्छा सध्यातरी दिसते. त्यामुळे ते मुदतवाढीसोबत मिटमिटा-शरणापूर येथे अप्रतिम प्राणीसंग्रहालय तातडीने कसे सुरू करता येईल, याकडे लक्ष देतील. केवळ लक्ष देणार नाहीत तर अंमलातही आणतील, असे वाटते. तसे झाले तर औरंगाबादकरांसाठी एक बहारदार पिकनिक स्पॉट तयार होईल. आता जसे लोक सिद्धार्थ उद्यानासाठी मनमोहनसिंग यांचे नाव घेतात, तसे घोडेले यांचे नाव होऊ शकते. असे म्हणतात की चांगुलपणा नेहमीच जगात अल्पसंख्य असतो. लुटारू, कपटींची संख्या जास्तच असते. तरीही चांगुलपणाचे सामर्थ्य अधिकच असते. जसे काळोख्या अंधाराला एक पणती वितळवून टाकते, तशी स्थिती असते. बहुतांश वेळा चांगुलपणा तळागाळात जाऊन पडलेला असतो. दफन अवस्थेत पडतो. लुटारू, कपटींचेच राज्य येते. चांगुलपणावर विश्वास असलेली माणसे गलितगात्र होतात. आणि एका क्षणी सगळी शक्ती एकवटून उफाळून वर येतात. लुटारू, कपटी वृत्तीला पराभूत करतात. वाईटातून चांगले जन्माला येण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. ती घोडेले यांनाही पक्की ठावूक आहे. महापौरपदाची सूत्रे खाली ठेवण्यापूर्वी लोकांच्या लक्षात राहणारी किमान तीन कामे करण्याची त्यांची इच्छा  आहेत. त्यात त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या स्थलांतराचा समावेश केला. वाघ, सिंह, नीलगायींसह सर्वच प्राण्यांना आणखी मोठ्या, खुल्या हवेत जगू दिले तर हे मुके प्राणी त्यांना नक्कीच आशिर्वाद देतील. तो घेण्याची संधी महापौरांनी घालवू नये, असे वाटते.

No comments:

Post a Comment