Sunday 13 January 2019

निरागस : सुंदर माझी शाळा

चेहऱ्यावर कायम हास्य, वागण्या-बोलण्यात कमालीचा आनंद. हालचालीही उत्साहाने भरलेल्या. अशा एकापेक्षा एक सरस देणग्या मिळालेला गणेश प्रल्हाद घुले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पदाधिकारी. निलेश राऊत, सुबोध जाधव यांच्यासोबत कायम कार्यरत असलेला. त्याच्यात हा अमाप उत्साह नेमका कुठून येतो. हा सारखा ताजातवाना, हसतमुख कसा राहू शकतो, असा प्रश्न माझ्यासारखा अनेकांना पडत असावा. त्याचे उत्तर काही दिवसांपूर्वी मिळाले आणि मोठा उलगडा झाला. गणेश घुले केवळ सामाजिक कार्यकर्ता नाही तर एक तरल, संवेदनशील आणि जागरूक कवी असल्याचे कळाले. खरेतर तो कवितेच्या जगात प्रसिद्ध माणूस. पण मलाच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागला म्हणा किंवा त्यानं त्याच्या वागण्याबोलण्यातून ते कधी जाणवू दिलंच नाही. सुंदर माझी शाळा या त्याच्या बालकवितांच्या पुस्तक प्रकाशनाची पत्रिका घेऊन तो सुबोध जाधवसोबत भेटला. तेव्हा गणेश आपल्या परिचयाचा आहे, याची जाणिव होऊन मन आनंदित झालं. आणि प्रतिभासंपन्न कवीला आपण यापूर्वी का ओळखू शकलो नाही, असा प्रश्न पडून खजिलही झालो. गणेश  यांच्या कवितांचे ‘सुंदर माझी शाळा’ पुस्तक वाचताना त्याच्यात एवढी उर्जा नेमकी कुठून येते याचा शोध लागला. लहान मुलांसोबत कोणीही काम करत असो. त्याच्यात एक निरागसपण येते. चैतन्य अंगात भरते. नाविन्याची कायम ओढ लागते. गणेश यांना ते सारेकाही चिमुकल्यांसाठी मनापासून काम करत असताना मिळाले. पण महत्वाचे म्हणजे मिळालेला आनंद, निरागसपणा त्यांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. स्वतःच्या पोतडीत भरून ठेवला नाही. तर तो त्यांनी सुंदर माझी शाळा पुस्तकातून सर्वांना खुला करून दिला. हा केवळ बाल गीतांचा-कवितांचा संग्रह नाही तर तो मोठ्यांनाही छोट्यांच्या जगात घेऊन जातो. मोठ्यांचे मन रमवून टाकतो. एवढी शक्ती, प्रतिभा गणेश यांच्या लेखनात आहे. सामाजिक जाणिवा अतिशय तीव्र आणि जबाबदारीने स्वीकारल्या असल्याने मनोरंजन करता करता त्यांच्या कविता लहान मुलांवर दाट संस्कारही करतात. रसायनशास्त्रात एम.एस्सी., मराठीत एम.ए. आणि नंतर बी.एड. करणारे गणेश यांचा मूळ पिंड चांगला माणूस असण्याचा आणि इतरांमध्ये चांगलेपण पेरण्याचा आहे. ते रसायन त्यांच्यात काठोकाठ भरलेले असल्याचे ‘कचरा, डस्टर, पैसा, तिरंगा, शिपाईमामा’ या कवितांतून लक्षात येते. आजकाल मुलांवर छडी उगारणे म्हणजे गुन्हा असे सांगितले जात असताना, शिस्त लावणाऱ्या मास्तरांवरच हल्ला करणारे वाढत असताना छडीचे महत्व सांगण्याचे धाडसही गणेश करतात. मोबाईलच्या जगात गुंग होऊन मुलांना विसरणारे आई-बाप ही अलिकडच्या काळातील एक नवी सामाजिक समस्या. त्यावर मुलांना खरंच काय वाटतं हे सांगणारी ‘मोबाईल’ नावाची कविता तिरकस बाण सोडत धमाल उडवते त्याचवेळी पण मनाला हलवते, रुतते. ‘मामाच्या गावाला जाऊया’ ही रचनाही अप्रतिम. कवीवर्य ‘ग. दि. माडगुळकरांची क्षमा मागून’ असे नमूद करत घुले यांनी मामाचे गाव पाणीटंचाईच्या संकटाशी कसे लढते आहे, याचे अत्यंत कमी शब्दांत पण मर्मभेदी चित्र उभे केले आहे. नव्या पिढीला कळतील, उमजतील आणि लक्षात राहतील, अशाच एक दोन नव्हे तर बेचाळीस रचना त्यांनी अतिशय सहजतेने केल्या आहेत. कोठेही अतिरेक नाही. किंवा आता मुलांचे मनोरंजन झालेच पाहिजे. त्यांच्यावर संस्कार केलाच पाहिजे, असा हट्ट किंवा अतिरेकही नाही. सारे कसे एखाद्या खळाळत्या ओहळासारखे आपल्यासमोर वाहत येते. पावसाचे हलके हलके थेंब अंगावर यावेत आणि त्यांनी मन प्रफुल्लित करून टाकावे. भिजता भिजता गावाकडील उजाड रानाचीही आठवण यावी अन्‌ विचार थबकून जावेत, अशी भावना हा कविता संग्रह वाचल्यावर निर्माण होते. आणि हेच या संग्रहाचे बलस्थान आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील पाडुळी नावाचे छोटेसे गाव. तेथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर गणेश औरंगाबादेत शिक्षणासाठी आले. पण गावची नदी, शेती, फुले, सवंगडी यांच्याशी त्यांनी नाते तोडले नाही. कवितांच्या रुपात ते जपून ठेवले. पुढे निलेश राऊत, कवी पी. विठ्ठल, गेनू शिंदे यांच्या पाठिंब्याने वर्षभरापूर्वी ‘सुंदर माझी शाळा’ या कार्यक्रमाची निर्मिती झाली. त्यात गणेश यांच्या  बालकवितांना श्रीराम पोतदार यांनी सुरेख चालींमध्ये बांधले. अभ्युदय फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगलीच दाद मिळू लागली. त्यानंतर घुले यांनी कविता पुस्तक रूपात उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय घेतला. दत्ता बाळसराफ, पद्‌मभूषण देशपांडे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुरेश हिंगलासपूरकर यांच्या पुढाकाराने अतिशय सुऱेख रुपात हा संग्रह रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. घुले यांच्या रचनांना दृश्यात्मक रुपात पुंडलिक वझे यांनी अर्थवाही केले आहे. त्यांनी मुखपृष्ठासह आत केलेली रेखाटने काही क्षण थांबून, निरखून पाहावीत, अशी आहेत. 

No comments:

Post a Comment