Wednesday 22 January 2020

येस आय एम गिल्टी


तिच्या ‘नव्या’ लढाईचे सुन्न करणारे नाट्य
वैज्ञानिक अंगाने कायद्यावर बोट ठेवत अनेक प्रश्नांची मांडणी

--
तसं म्हटलं तर महिलांच्या जगात महिलांचे असंख्य प्रश्न. ते सारेच पुरुषी व्यवस्थेने निर्माण केले आहेतच. ते सोडवून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदे तयार झाले आहेत. होत आहेत. पण न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यातील त्रुटींनी नवे प्रश्न उभे ठाकत आहेत काॽ या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. आणि हे प्रश्न किती किचकट आहेत. त्यात किती धागेदोरे वेटोळे घालून बसले आहेत. आणि याबद्दल भारतीय समाज किती अनभिज्ञ आहेत, हे जाणून घ्यायचे असेल तर सत्यजित खारकर यांनी लिहिलेल्या, अस्लम शेख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘येस, आय एम गिल्टी’ या नाटकाकडे पाहावे लागेल. हे नाट्य केवळ महिलेचा प्रश्न, कायद्यातील त्रुटी, समाज व्यवस्था एवढ्यापुरते मर्यादित भाष्य करत नाही. तर त्यापुढे जाऊन ते मुळात आपण माणूस म्हणून जगणे कधी शिकणार आहोत. सहृदयी केव्हा होणार आहोत. दुसऱ्याच्या हक्काचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी भावना आपल्यात कधी निर्माण होणार, असेही धारदारपणे विचारते. सुन्न करून टाकते. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी रंगभूमीवर वैज्ञानिकदृष्टीने विषय मांडणारे हे अत्यंत महत्वाचे नाटक आहे. खारकर यांना वर्तमानपत्रातील अपघाताच्या बातम्या असताना ‘येस, आय एम गिल्टी’चा विषय सुचला. त्यावर त्यांनी जवळपास दोन वर्षे संशोधन केले. विषयाच्या अनुषंगाने कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत काॽ डॉक्टर मंडळींना याबद्दल कितपत माहिती आहे, याची माहिती घेतली. विधिज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर नाटकाची बांधणी केली आहे. 
दोन अंकात मांडलेल्या या नाटकाचे थोडक्यात कथानक असे. घरच्यांचा विरोध पत्करून अंजू (डॉ. श्रद्धा चांडक) अक्षयशी (डॉ. अतिश लड्डा) विवाह करते. मूल होत नसल्याने ते डॉक्टरांचा सल्ला घेतात. स्वतःचे मूल हवे, हे त्यांचे स्वप्न सत्यात येईल, असे वाटत असतानाच एका भीषण अपघातात अक्षय मृत्यूमुखात जाऊन पोहोचतो. तो कोणत्याही क्षणी हे जग सोडून जाणार असे लक्षात आल्यावर अंजू तिची मैत्रिण, प्रख्यात वकिल ॲड. स्नेहाच्या (नीता पानसरे) मदतीने कोर्टात धाव घेते. मरण्यापूर्वी अक्षयचे स्पर्म्स (बीज) काढून घेण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज करते. पण याविषयीचा कोणताही कायदाच अस्तित्वात नाही. शिवाय अशी परवानगी दिली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे म्हणत कोर्ट परवानगी नाकारते. अक्षय मरण पावतो. तेव्हा अंजू विचारते की, माझे आणि माझ्या पतीचे स्वतःचे मूल असण्याचे स्वप्न साकारण्याचा अधिकार मला एकटीला का मिळू शकत नाही. पती जिवंत असला तरच त्याचे स्पर्म्स मिळतील, असे काॽ विज्ञानाने कृत्रिम गर्भधारणेबद्दल जी प्रगती केली त्याचा उपयोग कायॽ तिच्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच मिळत नाही. मग ती आई होण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधतो. पण त्यातून एका वेगळ्याच संकटात सापडते. आई होण्यासाठी केलेले धाडस अंगलट तर आले नाही ना, असे तिला वाटू लागते. मग एका टोकाच्या क्षणी ती अतिशय खंबीर, आक्रमक होत संकटाचा मुकाबला करते आणि यशस्वी होते. अंजूने शोधलेला मार्ग कोणताॽ ते धाडस तिच्या कसे अंगलट येते. त्यातून ती कशी बाहेर पडते, याची उत्तरे नाटक पाहताना मिळतात. अत्यंत गुंतागुंतीचा हा विषय खारकर यांनी अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने अविष्कृत केला आहे. शिवाय प्रत्येक प्रसंगातील नाट्य, थरार कायम ठेवल्याने शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहते. दिग्दर्शक शेख यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अतिशय ठसठशीत होत जातील. प्रसंगांमधील धार उत्तरोत्तर वाढत जाईल, याची पूर्ण काळजी घेतली आहे. अंजूची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या डॉ. श्रद्धा चांडक यांनी हे नाटक पूर्णपणे पेलले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी या भूमिकेतील सारे पैलू अतिशय मनस्वीपणे साकारले आहेत. त्यांचा आवाज आणि रंगमंचावरील सहज वावर त्यांच्यातील अभिनेत्रीची ताकद सांगणारा. नीता पानसरे, गुंड रोकडे (डॉ. अमोल देशमुख), सिस्टर (डॉ. हर्षलता लड्डा), डॉ. भागवत (डॉ. संदीप मुळे), सरकारी वकिल (डॉ. प्रफुल्ल जटाळे) यांनी भूमिकांमध्ये सर्व रंग भरल्याने नाटक रंगत जाते. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य, कविता दिवेकरांची रंगभूषा, डॉ. विशाल चौधरी,  विनोद आघाव यांचे संगीत, प्रसाद वाघमारे यांची प्रकाशयोजना संहितेला पूर्ण न्याय देणारी.

No comments:

Post a Comment