Friday 31 January 2020

पत्ते योग्य पडले नाही

पहाटे पाच वाजेची वेळ. अनेकजण मॉर्निंग वॉकला जाण्याची तयारी करत होते. काहीजण तर त्याआधीच उद्यानात, रस्त्यांवर दाखलही झाले होते. थंडीचे दिवस असल्याने सर्वांच्या डोक्यावर टोप्या, मफलर होत्या. अर्धवट झालेली झोप आवरत अनेकजण बळजबरीचा व्यायाम करत होते. त्याचवेळी पोलिसांची मोबाईल गस्ती व्हॅन पोलिस ठाण्याकडे परत निघाली होती. चला फार काही मोठं घडलं नाही. दोन राऊंडमध्ये एक भुरटा चोर सापडला. त्यापलिकडं काही नाही. आता घरी जाऊन निवांत पडता येईल, असा विचार इन्सपेक्टर काळे करत होते. पण बहुधा नियतीला ते मान्य नसावे. व्हॅन अगदी पोलिस ठाण्याच्या आवारात शिरत असतानाच वायरलेस सेटवर ग्रीनलँड अपार्टमेंटमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा निरोप मिळाला. त्यांनी ड्रायव्हरला व्हॅन तशीच वळवण्यास सांगितले. बघ्यांची गर्दी हटवून काळे आवारात दाखल झाले. तर पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धूर येत होता. धुराचे लोट जिन्यावरूनही वाहत होते. त्यामुळे कोणाला तिथे जाणं शक्य नव्हते. अपार्टमेंट सोसायटीचे सचिव मनिष धारकंडकर अग्निशमन दलाला कॉल करत होते. काळेंनी मग स्वतःच अग्निशमनच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यांचे बोलणे होईपर्यंत आगीचा बंब आला होता. जवानांनी शिड्या लावून पाण्याचा मारा केला. धूर थांबला. मग काळे आणि त्यांचे सहकारी झटपट पायऱ्या चढून फ्लॅटमध्ये शिरले. दरवाजाला धक्का दिला. तेव्हा दरवाजाला अडसर म्हणून अडकवलेल्या, एकाला एक जोडलेल्या दोन गाद्या खाली पडल्या. त्यात तिन्ही गाद्यांतून धूर येतच होता. शिवाय गॅलरीत ठेवलेली एक गादी, दोन उशाही धुराने वेढलेल्या होत्या. त्यापलिकडे काळेंनी नजर टाकली आणि ते चकितच झाले. आणखी एका जळालेल्या गादीवर एक महिला पडलेली होती. त्यांनी तपासलं तर तिचा प्राण निघून गेला होता. ग्रीनलँड अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहणाऱ्या, अंदाजे पन्नास वर्षे वय असलेल्या एलआयसी कर्मचारी निलिमा यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे, असे काळेंनी वरिष्ठांना कळवले. चोरीचा इरादा असावा. किमान दोन चोरटे असावेत. महिलेने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिला गळा आवळून मारले आणि नंतर आगीत जळाल्याचे भासावे म्हणून गादी पेटवली असावी, असा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला. मग अँब्युलन्स बोलावून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रवाना केला. अपार्टमेंटचा चौकीदार, सचिव आणि अध्यक्षांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी निलिमांबद्दल सांगितले. त्या साधारणतः सहा वर्षांपूर्वी येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती केनियामध्ये असतात. ते कधीच इथे आल्याचे दिसले नाही. त्यांच्या सावत्र बहिणीचा तरुण मुलगा कधीतरी येताना दिसत असे. क्वचित ऑफिसचे कर्मचारी, मैत्रिणी येत. पण तेही तासाभराच्या पलिकडे थांबत नव्हत्या. निलिमा कधीच सोसायटीच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसत. संध्याकाळी ऑफिसमधून आल्या की त्या स्वतःला टीव्हीसमोर बांधून घेत. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत. किंवा एकटीनंच पत्ते खेळत. कधीतरी बाहेरून जेवण मागवत, अशी माहिती समोर आली. निलिमा यांचे कोणाशीही सख्य नसले तर भांडणही नव्हते. काळेंनी अपार्टमेंटच्या चौकीदाराला पट्ट्यावर घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सत्तरीत पोहोचलेला म्हातारा. त्याची नात बाळंतपणासाठी आली होती. तिच्या देखभालीत रात्री गुंतला होता. त्यामुळं अपार्टमेंटमध्ये कोण आलं, हे त्यानं पाहिलंच नव्हतं. पण हा फ्लॅट एका बिल्डराला पाहिजे होता. त्यासाठी तो निलिमांकडे तगादा लावत होता. अध्यक्ष, सचिव आणि अपार्टमेंटमधल्या  काही बायका निलिमा मॅडमवर नाराजच होत्या. समोरचा किराणा दुकानदारही फ्लॅटवर डोळा ठेवून आहे, असं चौकीदारानं हलक्या आवाजात सांगितलं. मग काळे पुन्हा फ्लॅटमध्ये शिरले. तोपर्यंत फिंगर प्रिंट एक्सपर्ट आले होते. श्वानपथकही दाखल झालं होतं. सामानाची उचकापाचक झाली होती. त्यात पत्त्यांचा कॅट विखुरला होता. पण सोन्याचे दागिने, रोख रक्कम सगळंच जागच्या जागी होतं. म्हणजे ही चोरी नव्हती. मग नेमकं काय होतंॽ निलिमांचा प्राण कोणी घेतला होताॽ गादी का पेटवली होतीॽ    
००००००००००००००००००००
गेल्यावेळचे उत्तर
आयसीयू वॉर्डातील बेडवर पडलेल्या स्वरूपकुमारांनी त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर तपशीलाने आणला. एका क्षणाला ते चमकले आणि रुममधील कपाटात अडकवून ठेवलेली त्या दिवशीची पँट त्यांनी तपासून पाहिली. पँटच्या खिशात सोन्याची एक अत्यंत बारीक रिंग अडकली होती. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी तातडीने तिसऱ्या सूनबाईला म्हणजे मंजूला बोलावून घेतले. रिंग दाखवताच ती घडघडा बोलू लागली. नवऱ्याला नव्या शोरुमसाठी सासऱ्याकडून एक कोटी रुपये मिळत नाही, असे लक्षात आल्यावर तिने संतापाच्या भरात वाकडा मार्ग निवडला. गुंडाला एक लाख रुपये दिले होते. पण त्याचा फटका स्वरूपकुमारांनी चुकवला. ते त्याच्या अंगावर चालून जात असताना मंजूनेच त्यांना मागे ओढले. झटापटीत तिच्या कानाची रिंग स्वरूपकुमारांच्या पँटला अडकली होती. रुग्णालयात अर्धवट शुद्धीत आल्यावर त्यांनी काय टोचतंय, असं म्हणत खिसा झटकला. तेव्हा ती रिंग खिशात गेली होती. सासऱ्यानेच गुन्हेगार शोधलाय हे लक्षात आल्यावर मंजू माफी मागू लागली. खरेतर स्वरूपकुमारांना जबाब बदलण्याची इच्छा होती. पण त्यांनी झाकली मुठ सव्वालाखाची ठेवायचे ठरवले.    

No comments:

Post a Comment