Thursday 25 June 2020

खुशवंतसिंह ... सुशांतसिंह आणि आनंदी जगण्याची सहा सूत्रे

काय भयंकर लिहिलंय. पूर्ण अश्लिल आहे. महिला-पुरुष संबंधांची अशी कुठं वर्णनं असतात काॽ याला साहित्य म्हणणं म्हणजे पाप आहे पाप. ही पिवळी पुस्तके आहेत. पहिल्यांदा बंदी घातली पाहिजे यावर, असं म्हणत म्हणत ज्यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली गेली. अनेक पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या. ज्यांना जगभरातील उच्च वर्तुळात महत्वाचे स्थान मिळाले. जे कायम चर्चेत राहिले, असे एकमेवद्वितीय प्रख्यात, वादग्रस्त लेखक म्हणजे खुशवंतसिंह. 
चार वर्षांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. जगण्यातला प्रत्येक दिवस ते अत्यंत आसोशीने, दिलखुलासपणे जगले. श्रीमंत कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक विवंचना नव्हती. उच्च शिक्षणात काहीही अडचण आली नाही. कौटुंबिक पातळीवर सारेकाही स्थिरसावर होते. पण नव्व्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांच्यासमोर कधी संकटे आले नाहीत. त्यांच्या जीवनात वादळे घोंगावली नाहीत, असे नाही. त्यांनीही वेळोवेळी याचा सामना केला. यातली काही प्रकरणे तर त्यांनी स्वतःहून ओढावून घेतली होती. ते ज्या क्षेत्रात अखेरपर्यंत वावरत होते. तेथे महिलांविषयी लेखणी मनसोक्त चालवल्याने वादात ओढले गेले. त्यालाही ते मनापासून सामोरे गेले. कोर्टात चकरा मारत राहिले. प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होताना कधी गटांगळ्या खाल्ल्या. कधी लाटेच्या धारेवर आनंदाने नाचले. कोणाच्या जीवनाशी, स्वभावाशी इतरांची तुलना होऊच शकत नाही. इथला प्रत्येक जीव दुसऱ्यापेक्षा वेगळा आहेच. तरीही प्रत्येकाने जगणं पूर्ण मनापासून जगलं पाहिजे.  अर्धवट अवस्थेत जग सोडून जाता कामा नये, अशी अपेक्षा आहे.
गेल्या आठवड्यात तरुण पिढीतील उमदा अभिनेता सुशांतसिंह राजपूतने अचानक जीवन संपवून टाकले. त्याचे असे जाणे धक्कादायक, त्रासदायक आहेच. पण, कोरोना लॉकडाऊनने आधीच भयभीत झालेल्या कोट्यवधी लोकांवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. आपल्याही आयुष्यात अस्थिरता आली आहे. पुढे हातांना काम मिळणार की नाही, अशा शंकेने त्यांना ग्रासले आहे. ज्या व्यक्तीला आपले मानले. ती दुसऱ्या कोणामध्ये गुंतल्याचं लक्षात येऊ लागलंय. त्यामुळं आपणही स्वतःला संपवले पाहिजे, अशी भावना अनेकजण मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त करत आहेत. ते ऐकून वादळांना अंगावर घेत लढण्याऱ्या खुशवंतसिंहाची आठवण झाली.  ते अभिनेते किंवा रंगमंचावरील कलावंत नसले तरी क्रिएटीव्ह जगातील मातब्बर होते. ज्या गोष्टींना समाजातील एक वर्ग नावे ठेवतो. अश्लिल मानतो. त्या खरेतर जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्यापासून लपता, पळता येणार नाहीच, असं खुशवंतसिंह कायम सांगत राहिले.  
‘खुशवंतसिंह की संपूर्ण कहानियाँ’ नावाचे एक पुस्तक आहे. यात एका ठिकाणी ते म्हणतात, मला भेटणाऱ्या बढाईखोरांना मी बोलण्यासाठी भाग पाडतो. आणि ते जे काही रचून सांगतात. त्यात मी कथाबीज, व्यक्तिरेखा शोधत राहतो. म्हणजे जगण्यासाठी काहीतरी निमित्त शोधावे लागते. आणि त्या निमित्ताभोवती गुंतावे लागते. 
सुशांतसिंहच्या अकाली जाण्यानंतर सिनेमासृष्टीत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. याच्यामुळे तो गेला. त्याच्यामुळे त्याने फाशीचा दोर हाती घेतला, असे म्हटले जात आहे. त्यात तथ्य असेलही. पण मूळ कारण जगण्यासाठी सबळ कारण सुशांतसिंहकडे नसावे. ते त्याने शोधले नाही, असे वाटते. 
प्रख्यात लेखक, प्रकाशक अशोक चोप्रा यांनी ‘रोचक आठवणींची पाने‘ पुस्तकात जे लिहलंय त्यावरून खुशवंतसिंह यांनी लेखनाभोवती स्वतःला किती, कसे गुंतवून ठेवले होते, हे कळते. चोप्रा म्हणतात, मार्च १९८० चे शेवटचे दिवस. मी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील राज व्हिलामध्ये खुशवंतसिंहांचा पाहुणा म्हणून राहतोय. येथे खुशवंतसिंह वर्षातून निदान तीनदा विश्रांतीसाठी येऊन राहतात. विश्रांती-सुट्टी हे शब्द कदाचित गैरलागू  आहेत. कारण नेहमीच्या घरीही त्यांचा दिवस असाच असतो. भल्या पहाटे उठून न्याहारीपर्यंत लेखन काम करणे, वृत्तपत्रवाचन, पुन्हा जेवणापर्यंत लेखन. मग वामकुक्षी, पुन्हा ५ वाजेपर्यंत लेखन. नंतर तासाभराची चालत चक्कर. घरी परत आल्यावर एकांतात बसून तीन प्याले मद्यपान किंवा कसौलीतल्या कुणा महत्वाच्या व्यक्तीबरोबर नर्मविनोदासह पेयपान. रात्री ९ वाजता झोप.
अशा या खुशवंतसिंहांनी आनंदी जगण्यासाठी सांगितलेली सूत्रे काहीजणांना माहिती असावीत. ती अशी.
१. उत्तम आरोग्य  - जर तुम्ही पूर्ण तंदुरुस्त नाहीत. तर तुम्ही कधीही खुश राहू शकत नाही. आजारपण छोटे असो की मोठे. तुमचा आनंद हिरावून घेते. 
२. थोडीशी पुंजी – चांगले जीवन जगण्यासाठी खूप श्रीमंत असणं गरजेचं नाही. पण बाहेर जेवण, सिनेमा पाहणं, समुद्र पर्यटनासाठी तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही खुश राहू शकता.
३. स्वतचं घर – अगदी एक खोली असली तरी चालेल पण स्वतःचं घर हवं. घरासमोर छोटीशी बाग असेल तुमचं जीवन खूप आनंदी होऊ शकतं. 
४. समजंस जीवनसाथी – हे नसेल तर जीवन नरक होईल.
५. द्वेष सोडा – कोणी तुमच्यापेक्षा प्रगती करत असेल. तर त्याचा द्वेष करणे सोडा. कारण तो करता करता तुम्ही स्वतः कधी खाक होऊ लागतात, तेच लक्षात येणार नाही.
६. चुगल्या थांबवा – चुगल्या करणे, अफवा पसरवणे, एखाद्याला माघारी शिव्या देणे ताबडतोब सोडा. कारण हे करणं तुम्हाला खूप थकवते. मेंदूत विष निर्माण करते. 
खुशवंतसिंह हे एक अजब रसायन होतं. जगण्याकडं ते गंभीरपणे पाहत होते. सुशांतसिंहसारख्या हळव्या मनाच्या तरुणाईने, तमाम कलावंत, लेखकांनी त्यांची सूत्रे अंमलात आणली तर जगणं बहारदार होईल, नाही काॽ

No comments:

Post a Comment