Monday 8 June 2020

मिडलक्लास चितचोर

जगभरात मध्यमवर्गीयांचा बोलबाला. म्हणजे असं म्हटलं जातं की, हा वर्ग फक्त ट्रेंड सेट होण्याचीच वाट पाहत असतो. एकदा का तो सेट झाला की, त्या ट्रेंडला लोकप्रिय करण्याची जबाबदारी त्याची असते. कराचा भरणा असो, काही नियमांचे पालन असो. नवी खरेदी किंवा एखाद्या खरेदीवर बहिष्कार. मध्यमवर्गीय म्हणजे चाकरमाना इमानेइतबारे त्यात सहभागी होतो. अर्थव्यवस्थेचे एक चाक तो कुरकुरत, सरकारला शिव्याशाप देत चालवत राहतो. मनाला पटत नसलेल्या अनेक गोष्टी सहन करतो. काहीवेळा चुकीचे पायंडेही पाडतो. अनेकदा एखादा पायंडा चुकीचा पडत आहे, असे लक्षात आल्यावर तो पायंडा मोडण्यासाठीही इकडंतिकडं बघत, सावधपणे पुढं येतो. म्हणजे स्वतःहून अन्यायाविरुद्ध लढून क्रांती करणार नाही. पण कोणी तसं काही करत असेल आणि त्याला ते पटलं तर काही काळासाठी पूर्ण ताकदीनं क्रांतीला शक्ती देईल. एकदा त्याला अपेक्षित असलेला क्रांतीचा भाग संपला की त्यातून अंग काढून घेईल. सरकारकडून असलेल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा मध्यममार्गानेच व्यक्त करत राहिल. कोणाला आवडो अथवा न आवडो मध्यमवर्ग हा कोणत्याही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. अनेकांना याच वर्गात समाविष्ट होणं म्हणजे जीवनाचं सार्थक आहे, असं वाटत आलं आहे.

पण तरीही १९७०च्या दशकानंतर राजकारण, साहित्य, प्रसारमाध्यम, सिनेमामध्ये मध्यमवर्गाला लक्ष्य करण्यात आले. विशेषतः डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या पत्रकार, लेखक, नाटककारांनी मिडलक्लासवर जबर हल्ला चढवला होता. या वर्गात प्रचंड दंभ माजला आहे. हा एक विकृतीने भरलेला, सुखलोलूप, केवळ स्वतःपुरते पाहणारा, अप्पलपोटा समूह आहे. तो कधीच गरिबांचे भले होऊ देत नाही. होऊ देणार नाही. हा वर्ग म्हणजे एक प्रकारे देशाचा शत्रू, असं सर्रासपणे सांगितलं जात होतं. अजूनही ते पूर्णपणे थांबलेले नाहीच. पण त्यातील विखारी धार दुसरीकडं वळाली आहे. पण ज्या काळी हे सगळे हल्ले भरात होते. त्याला अर्थातच मध्यमवर्गीयांच्या एकूण स्वभावानुसार थेट विरोध झाला नाही. उलट ती टीका त्यानं अंगावर घेतली. त्यांना टीकेचा अधिकार आहेच. त्यांना आपण कसा, कशाला विरोध करायचा, असा सूर होता. मात्र, आमच्याबद्दल कोणी काही चांगलं सांगणार आहे की नाही. आमच्यात दुःख, वेदना, संघर्ष आहे. त्याची तीव्रता तुम्हाला अपेक्षित नसली तरी ते सिनेमा, साहित्य, पेप्रात मांडलं जाणार की नाही, असा विचार हा वर्ग त्या काळात करत होता. आणि असं म्हणतात ना की, विचार प्रत्यक्षात येतोच. तसेच झाले.

बासु चटर्जी नावाचा एक कलावंत, दिग्दर्शक माणूस आला. त्यानं रुपेरी पडद्यावर त्या काळच्या मध्यमवर्गाला हिरो केलं. दुचाकीवर ऑफिसला जाणारा, सायंकाळी टेबल टेनिस खेळणारा आणि अगदी सामान्य चेहऱ्याचा लाजरा-बुजरा तरुण मध्यवर्ती भूमिकेत असू शकतो. त्याची लव्हस्टोरी प्रेमाचं मूल्य वेगळ्या रुपात सांगते. एखाद्या कंपनीच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करणारी मुलगीही हिरोईन होऊ शकते. तिचं जगणं भावविश्व समजून घेणं आवश्यक आहे, असं बासुदांनी सांगितलं. कोळसा विकणाऱ्याची मठ्ठ मुलगी आणि गावातल्या मुलाचीही प्रेमकहाणी रंजक, वास्तववादी असते. त्यात व्हिलन मुलीचा मामा असतो, असं त्यांनी चमेली की शादीमध्ये मांडले.

पडद्यावर कथानक, व्यक्तिरेखा उलगडण्याची त्यांची पद्धतही मध्यमार्गीच होती. त्यात त्यांनी कधीच आक्रस्ताळेपणा केला नाही. एका मोठ्या वर्गाच्या भाव-भावनांचे प्रतिबिंब उमटवण्याचा माझा प्रयत्न आहे. मला जे आजूबाजूला दिसतंय, जाणवतंय ते सांगितलं पाहिजे. मध्यमवर्गीयही माणसेच आहेत. त्याच्या जगातही प्रेम, राग, लोभ, विश्वासघात आहे. ते इतर समाजाचे शत्रू नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यापासून ते कधी बाजूला हटले नाहीत. रजनीगंधा, चितचोर, खट्टा मीठा, बातो बातो में, छोटीसी बात’, अशा त्यांच्या सगळ्या सिनेमातील हिरो-हिरोईन, कथानके डोळ्यासमोर आणली की त्यातील हा धागा ठळकपणे जाणवतो. माझ्या सिनेमात दिसतात तसेच लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. ते समाजाला फार पुढे नेत नसले तरी मागे खेचत नाहीत. स्वत:तील भंपकपणावर फारकाळ पांघरुण टाकत नाहीत. त्यामुळे या कळपालाही समजून घ्या, असंच बासुदांच्या सिनेमांनी इतर कळपांना कायम सांगितलं. तेही अतिशय सहजपणे, हलक्याफुलक्या कथानकांतून.

 

आताचा जमाना भडकपणाचा आहे. आक्रमकपणे मांडणाऱ्यांचा आहे. खरी गोष्ट लपवून खोटी गोष्ट आरडाओरड करत विकणाऱ्यांचा आहे. अनेकांनी एकाच पट्टीतील आवाजात खोटे रेटून सांगण्याची कलाही प्राप्त केली आहे. ही सारी मंडळी काही काळासाठी विश्रांती घेतील आणि कोरोना संकट ओसरेल. तेव्हा बासुदांची कमतरता प्रकर्षाने जाणवेल. बहुधा मध्यमवर्गाला.


No comments:

Post a Comment