Thursday 25 June 2020

त्याला शारियाचा खून करायचा होताॽ

सूरजभानसिंग आता पंचेचाळिशीत पोहोचले होते. पंचवीस वर्षांपूर्वी ते गावाकडून शहरात आले. तेव्हा त्यांच्याकडे खिशात चारशे रुपये आणि रोजच्या वापराचे कपडे ठेवण्यासाठी पिशवी होती. आज ते एका तीन मजली घराचे मालक होते. सहा भल्या मोठ्या चारचाकी त्यांच्याकडे होत्या. सर्वात गजबजलेल्या भागात पॉश गणल्या जाणाऱ्या इमारतीतील एक अख्खा मजला त्यांच्या केएस ॲडस् कंपनीचा होता. किमान साठजणांची कुटुंबे ते चालवत होते. दरमहा चाळीस लाखांची उलाढाल करत होते. हे सारे त्यांना कसे साध्य झाले. याच्या सुरस कहाण्या अधूनमधून वर्तमानपत्रांमध्ये झळकायच्या. एका खेडेगावात गरिब माता-पित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते जेमतेम दहा वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल पुरात वाहून गेले. मग नातेवाईकांच्या घऱी तालुक्याच्या गावात त्यांनी आश्रित म्हणून राहणे सुरू केले. तेथेच शिक्षण घेतले. उत्तम चित्र काढण्याची कला त्यांच्यात अंगभूत होती. कॉलेजातील शिक्षकांनी त्यांना शहरात जाऊन याच गुणावर नोकरी शोध, असा सल्ला दिला. त्यानुसार ते मॉरिस बुकानन यांच्या केएक्स ॲडस कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले. अंगभूत कला, जिद्द, चिकाटीमुळे ते पाहता पाहता एक एक पायरी चढत गेले. एकवेळ अशी आली की, बुकानन यांनी इंग्लंडला कायमस्वरूपी परतण्यापूर्वी अख्खी कंपनी त्यांच्या ताब्यात देऊन टाकली. हे सगळे सुरू असताना सूरजभानसिंग यांचे तालुक्याला शिक्षण करणारे त्यांचे मामा त्यांच्या मुलीला म्हणजे सुमित्राला घेऊन आले. दिसायला बऱ्यापैकी असलेल्या मुलीचा स्वीकार कर असे मामाचे म्हणणे होते. सूरजभान यांच्या कर्तृत्वाचा सूर्य नुकताच उगवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांनी फारसा विचार न करता सुमित्राचा स्वीकार केला. तिचा पायगुणही कदाचित कारणीभूत असावा. सूरजभानसिंग यांची प्रगती लग्नानंतर वेगात झाली. त्याबद्दल त्यांच्या मनात सुमित्राबद्दल विलक्षण आदर होता. पण कंपनीत काम करणाऱ्या आणि इतर निमित्ताने भेटणाऱ्या लक्षवेधी, खट्याळ, चटपटीत महिलांपासून अंतर राखणे त्यांना गेल्या पाच वर्षांत शक्य झाले नव्हते. आयुष्यात जी सुखे कधी मिळाली नाही. ती दैवयोगाने चालून येत असतील तर आपण का टाळावीत, असा प्रश्न त्यांच्यापुढं होता. त्यामुळे कंपनीतील सिनिअर आर्टिस्ट भारती, अनिता आणि एका मॉलची व्यवस्थापक शारिया अशा तिघांशी त्यांनी प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. भारती विवाहित होती. तर उच्चभ्रू कुटुंबातील शारियाचे राजदीप आणि अब्राहमशी घटस्फोट झाले होते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सूरजभानसिंग तिघींना भेटत. या साऱ्या कामात त्यांचा आधार होता ड्रायव्हर काशिनाथ. मालकाचं हे आयुष्य त्यानं मनाच्या गुपित तिजोरीत बंद करून ठेवलं होतं. अगदी महिनाभरापूर्वी शारियाशी मालकांनी विवाह केला. ही खबरही त्यानं सुमित्रासह कुणाला कळू दिली नाही. ‘मालक हेच माझं विश्व’ असं तो सांगायचा. अर्थात त्याचा जीवलग मित्र, अनिताचा एकेकाळचा सहकारी असलेल्या कल्याणसिंगला हे मान्य नव्हतं. तो तुला महिन्याला फक्त दहा हजार देतो आणि त्या बायकांवर एका रात्रीत दहा हजार उधळतो, असं तो वारंवार म्हणायचा. पण काशिनाथ ठामपणे मालकावर कोणतंही संकट येता कामा नये, अशी प्रार्थना करायचा. मात्र, नियतीला बहुधा हे मान्य नसावं. एक दिवस शारियाची मोलकरीण नेहमीप्रमाणे फ्लॅटवर पोहोचली. दहा मिनिटं बेल वाजवूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं तिनं आरडाओरड केली. दरवाजा तोडला तर आत शारियाचा मृतदेह पडला होता. पोलिस इन्सपेक्टर नरवडे घटनास्थळी दाखल झाले. कपाटातून पन्नास हजार रोख आणि एक लाखाचा हार गायब झाला होता. नरवडेंसमोर अनेक संशयित होते. त्यांनी अचूक आरोपी शोधला. कोण असावा तोॽ

No comments:

Post a Comment