Monday 14 December 2020

पदवीधरच्या निकालाचा धडा

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की, त्याच्या आड दडलेल्या काही गोष्टी सर्वांसमोर येणे आवश्यक असते. कारण या गोष्टी विजेत्याची शक्तीस्थाने सांगतात. पराभूत उमेदवाराच्या मोठ्या किंवा त्याला किरकोळ वाटत असलेल्या चुका समोर आणतात. या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर पराभूत उमेदवार किंवा त्याचा एखादा अनुयायी पुढील काळात विजयी होऊ शकतो. पराभूत पक्षाचे प्रमुख नेतेही यातून काही धडा घेऊ शकतात. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा सुमारे २७ टक्के अधिक मतदान झाल्याने प्रस्थापिताच्या विरोधात कौल असे पारंपारिक गृहीतक मांडले गेले. ते सतीश चव्हाण यांच्या विजयाने चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात हे पदवीधर मतदारसंघात होऊ शकते, हेही तेवढेच खरे आहे. आता विजय-पराभवाच्या काही मूळ कारणांकडे वळूयात. १) आपल्याला मतदान करण्याची हमी असलेल्या अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करून घेणे. भलेही त्यांच्या सर्व समस्या सोडवणे शक्य नसले तरी त्यांच्याशी अतिशय नम्रपणे, कायम संपर्कात राहणे. मतदानाच्या दिवशी स्वतंत्र, अत्यंत भरवशाची यंत्रणा लावून त्यांचे मतदान करून घेणे. ही यशाची पहिली पायरी आहे. च‌‌‌‌‌व्हाण यांना दोन निवडणुकांचा तगडा अनुभव असल्याने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली पायरी ओलांडली होती. २) पक्षाची यंत्रणा, पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रीय किंवा राज्य, देशाच्या बड्या नेत्याचे वलय याचा प्रचारात फायदा होतो. पण अशा गोष्टी निकाल शंभर टक्के बदलू शकत नाही. विरोधकाला कमी लेखणे तर सर्वाधिक धोकादायक असते. बोराळकर बड्या नेत्यांचे वलय, पक्ष यंत्रणेच्या पूर्णपणे भरवशावर राहिले. तर चव्हाण शिवसेनेच्या यंत्रणेची मदत घेताना व्यक्तिगत हितसंबंधाचे धागेदोरे बळकट करत गेले. बोराळकर तुल्यबळ आहेत, असे मानत प्रचार केला. ३) कोणतीही लढाई लढायची असेल तर आधी आपल्याला पक्षाचा खरेच किती पाठिंबा आहे, याची माहिती हवी. नेत्यांचा पाठिंबा हवाच पण कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी केवळ आपल्यासाठी लढण्यास तयार आहे का, हे उमेदवाराने शांतपणे तपासून पाहिले पाहिजे. चव्हाण यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्धी नव्हता. आपल्यासाठी संपूर्ण ताकदीने लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फळी त्यांनी बांधून ठेवली होती. त्या उलट नेत्यांपासून कार्यकर्ते बोराळकरांच्या विरोधात होते. ४) कोणी काहीही म्हणत असले तरी जातीपातीची गणिते हा तर भारतीय राजकारणाचा पाया आहे. मोठा वर्ग त्याच निकषावर मतदान करतो. त्यामुळे त्यानुसार मतदार नोंदणी करून घेणे आणि ती खरेच झाली आहे की नाही, याचा खरा अभ्यास, पडताळणी करावी लागते. चव्हाण यांनी यात शंभर टक्के गुण मिळवले. तर बोराळकर अभ्यास झाला आहे, या भ्रमात राहिले, असे निकाल सांगतो. ५) तसे तर आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तरच लोक आपल्याला मदतीला येतात. हा साधा नियम आहे. राजकारणात तर कमीतकमी त्रास देणारा, अडीअडचणीला किमान संपर्कात असणारा उमेदवार हवा अशी मतदार, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा चव्हाण यांनी अंमलात आणली असे दिसते. ६) कोणत्याही प्रस्थापिताला पराभूत करायचे असेल तर समोर समर्थ पर्याय आहे का? ज्याला निवडून द्यायचे तो आपल्या काही समस्या सोडवू शकतो का. किमान शांतपणे ऐकून घेऊ शकतो का. वेळोवेळी उपलब्ध होईल का? याचाही विचार मतदार काही प्रमाणात करतात. त्यामुळे प्रस्थापिताविरुद्ध प्रचंड असंतोष धुमसता हवा. तरच त्याला हवा देता येते. प्रस्थापिताचे पक्षांतर्गत विरोधक खरेच किती ताकदीचे आहेत, याचीही खरी, खोलात जाऊन तपासणी करावी लागते. चव्हाण महाविकास आघाडीचे सरकारचे उमेदवार असल्याने बोराळकर समर्थ पर्याय आहेत, असे मतदारांनी वाटले नाही. शिवाय चव्हाण यांच्याविरुद्ध धुमसता असंतोष असल्याचे वातावरण शेवटपर्यंत नव्हते. चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक फारसे शक्तीमान नाहीत. काहीजणांनी फसवी आश्वासने दिली होती, हे आतातरी बोराळकरांच्या लक्षात आले असावे, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment