Saturday 19 December 2020

परिवर्तनाचा हुंकार

वर्षानुवर्षे एका साचेबद्ध पद्धतीने जगणाऱ्या, घुसमट हेच आपले प्राक्तन असे मानणाऱ्या समाजात परिवर्तन झाले पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, यासाठी खडतर वाटचाल करणारे काहीजण साहित्य विश्वात आहेत. महेश खरात हे त्यापैकीच एक. ते सातत्याने परिवर्तनाची लढाई लढत आहेत. शिवाय एक साक्षेपी, परखड समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे परिवर्तनवादी विचारवंत, समीक्षक अशी दुहेरी ओळख असलेले खरात स्वतःचे अनुभवविश्व, विचारांमागील भूमिका ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ या पहिल्या कविता संग्रहात विविध रचनांच्या रुपात मांडतात. तेव्हा त्याला एक विशिष्ट उंची आणि एक खोलीही प्राप्त होते. एकेक ओळ, त्यातील भावार्थ कसदार असल्याची जाणिव होते. लोकवाङ्मयगृहाने ४० रचनांचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्रख्यात पुरोगामी विचारवंत, कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचे भाष्य आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची बारा पानांची दीर्घ प्रस्तावना या ‘ओळ तुझ्या-माझ्या...’ संग्रहाला लाभली आहे. यावरून तिचे साहित्य व्यवहारातील महत्व अधोरेखित होऊ शकते. साहित्य वर्तुळात प्रदीर्घ काळापासून वावर असलेल्या खरात यांच्या विचारात, लेखणीत धारदारपणा आहे. तो त्यांच्या साहित्य कृती समीक्षणात दिसून येतो. समीक्षक म्हणून त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते मांडण्यात मुळीच हयगय केली नाही. अनेक वर्षे इतरांच्या लेखनाविषयी भाष्य करत असताना खरात यांच्या मनामध्येही अनेक प्रकारचे विचार उसळी घेत होते. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना, समाजाचे साचलेपण, काही घटकांचे एकारलेपण अनुभवत होते. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत गेली. असे म्हणतात की, कवितांच्या ओळी अस्वस्थतेच्या गर्भातूनच जन्माला येत असतात. तसेच काहीसे ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ कविता संग्रहात झाले असावे. खरात यांचा मूळ पिंड समीक्षकाचा. त्यात कवीमनही जोडले गेले. सभोवताली जे काही घडते आहे. ते पाहून निर्माण होणारी संतप्तता ते मांडतात. त्यात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. थोडासा धागा मांडायचा आणि त्याचा विस्तार करणे सोडूनच द्यायचे. किंवा त्यातून अंग काढून घ्यायचे, असा काही कवींचा पवित्रा असतो. त्याला खरात यांनी पहिल्याच कविता संग्रहात छेद दिला आहे. म्हणूनच त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आणि परिवर्तनाचा विचार अधिक टोकदार, आक्रमक, व्यापकपणे मांडणारी झाली आहे.'ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची''मधील सर्वच कवितांचा केंद्रबिंदू माणूस आहे.‘चक्र परिवर्तनाचे'', ''सुरकुतलेल्या चेहऱ्याआड'' आणि ‘पासवर्ड आनंदाचा'' अशा तीन विभागात प्रा. खरात यांनी कवितेची विभागणी केली आहे. सामान्य माणसाला कोणकोणत्या पातळ्यांवर लढावे लागते, याची अतिशय प्रभावी मांडणी खरातांच्या कवितेत आहे. विशेष म्हणजे ते एक प्रकारचा आशावादही निर्माण करतात. एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी बोलल्या जातात. दुसरीकडे भेदभाव, द्वेष्, अहंकार वाढत चालला आहे. एक वर्ग झपाट्याने प्रगती करतोय तर दुसरा झपाट्याने तळाला जातोय. यात बदल झाला पाहिजे. अशा अन्यायकारक वागण्याला जबाबदार असणाऱ्यांना कडक शब्दांत प्रश्न विचारले पाहिजेत, असे खरात सूचित करतात. त्यामुळे एकूणात हा कवितासंग्रह परिवर्तनाचा हुंकार देणारा ठरला आहे.

No comments:

Post a Comment