Saturday 19 December 2020

खुरपं

गेल्या १००-१२५ वर्षांत अनेक मराठी साहित्यिकांनी महिलांचे भावविश्व यथार्थपणे मांडले. त्यांच्या जगण्यातील दु:खवेदनांना आवाज मिळवून दिला. पण त्यातील बहुतांश कथानके, व्यक्तिरेखा शहरी तोंडवळ्याच्या आहेत. कारण मूळ ग्रामीण भागातील असले तरी ही लेखक मंडळी शहराशी नाळ जोडलेली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदींनी ग्रामीण महिलांच्या व्यक्तिरेखा चित्रित केल्या. पण त्या बहुतांश विनोदी अंगाने होत्या. त्यामुळे शेतात अपार कष्ट करणाऱ्या, विहीरीवर पाणी शेंदून हाताला घट्टे पडलेल्या आणि कायम ग्रामीण समाजरचनेच्या तळाला राहणाऱ्या महिलांचे चित्रण तेवढ्या ताकदीने, विविध अंगाने, खोलवरपणे फारसे आलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातील संस्कृतीत जगलेल्या महिलांकडून कसदार, विपुल लिखाण दिसत नाही. त्यामुळे एकूणात मराठी साहित्य विश्व त्या दृष्टीने अपुरे होते.

मात्र, संवेदनशील, आश्वासक कथालेखिका सुचित्रा घोरपडे यांनी ‘खुरपं’ या त्यांच्या कथासंग्रहातून हे अपुरेपण बऱ्याचअंशी भरून काढले आहे. पुण्यातील आर्ष पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
घोरपडे यांच्या या कथासंग्रहात दहा कथा आहेत. प्रत्येक कथा कसदार, आशयघन तर आहेच. शिवाय त्यातील मांडणीचा प्रवाहही चकित करणारा आहे. खेड्यांमधील बोलीभाषा कथेत अचूकपणे वापरणे म्हणजे पुरुषांचा प्रांत हा अनेक वर्षांचा समजही घोरपडे यांनी मोडीत काढला आहे. ग्राम्य बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी अतिशय चपखलपणे आणि भावार्थासह जागोजागी पेरले आहेत. अवदस, माचुळी, येडताक, चईत, डबरणी, किनव्या ही त्यांच्या काही कथांची नावे आहेत. यावरून कथांमधील शब्दांची ताकद आणि परिघ लक्षात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लेखिकेने एकाही कथेची मांडणी, व्याप्ती पसरट केलेली नाही. अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. व्यक्तिरेखा आपण कधीतरी पाहिल्या आहेत, असे वाटत राहते किंवा अशी व्यक्तिरेखेशी आपले जवळकीचे नाते असावे, असे जाणवत राहते. जणूकाही आपण एखाद्या खेडेगावात राहण्यासच गेलो आहोत, असे वातावरण घोरपडे यांची लेखणी तयार करते. म्हणूनच ‘खुरपं’मधील प्रत्येक कथा हृदयात रुतून राहते.
‘खुरपं''मध्ये गावगाड्यातील महिलांच्या जीवनाचे स्पंदन आहे. ग्रामीण संस्कृती, मोडक्या -तोडक्या घरांत आणि वाड्यामध्ये निर्माण झालेले आचपेच, भाऊबंदकीतील तणाव, नातेसंबंधातील घुसमट, डोळ्यातच निष्प्राण झालेले अश्रू अशा अनेक पैलूंना वाचा फोडणाऱ्या कथा यात आहेत. घोरपडे यांनी गेल्या काही वर्षांत शब्दालय, युगांतर, पर्ण, शब्दशिवार, विवेक, अक्षरदान, चौफेर समाचार यासारख्या दिवाळी अंकातून लेखन केले आहे. शिवाय स्टोरीटेलसाठी ऑडिओ कथालेखन, डेलीहंटच्या माध्यमातून ब्लॉग लेखन, वृत्तपत्रांमध्ये कथा, लेख आणि सदर लेखन केलेले आहे. आता ‘खुरपं’मुळे त्यांच्या रुपाने एक सशक्त कथालेखिका साहित्य विश्वाला मिळाली आहे, असे वाटते.

No comments:

Post a Comment