Thursday 3 June 2021

नव्या पिढीची ख्रिस्तिना

ख्रिस्तिना मारिया हेडिच अमनपोर असे त्यांचे लांबलच्चक नाव. १९९० च्या दशकात जगातील सर्वाधिक दहा लोकप्रियांच्या यादीत त्या होत्या. लांबलच्चक नावासारखे भारदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढाच दराराही. त्या काळच्या त्या योद्ध्याच. फ्रंट वॉरियर. पण प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही शौर्य, धाडसाचे दर्शन घडवणाऱ्या ख्रिस्तिनांनी नेमकं काय केलं होतं. हे जाणून घेण्यासाठी तीस वर्षे मागे जावे लागेल. २ ऑगस्ट १९९०. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेनने कुवैत देशात सैन्य घुसवले. मग अर्थातच जगाचा दादा असं म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वात काही युरोपीय राष्ट्रे एकत्र आली. आणि १७ जानेवारी १९९१ रोजी आखाती युद्धाला प्रारंभ झाला. महाबलाढ्य अमेरिकेसमोर सद्दामचा टिकाव टिकणे कठीण होते. तसेच झाले. २८ फेब्रुवारी १९९१ रोजी इराकच्या पराभवाने युद्ध संपले. पण तो महिनाभर सारे जग ते युद्ध एखादी क्रिकेट, फुटबॉलची मॅच पाहावे तसे डोळे भरून टीव्हीवर लाईव्ह पाहत होते. भारतीय लोक तर ते पाहून अवाक झाले होते. ते युद्ध एका कारणासाठी भारतीयांना आपल्या जवळचे वाटत होते. ते म्हणजे एकीकडून सद्दामची सेना स्कड मिसाईल डागायची. दुसरीकडून अमेरिकेचे पेट्रियाट मिसाईल त्याला हवेतच उडवून लावायचे. आपल्या रामायण, महाभारतातील अस्त्राचे म्हणजे आपलेच तंत्र अमेरिका – सद्दामने चोरले असेही लोक म्हणायचे. पण हे युद्ध टीव्हीच्या छोट्या पडद्यावर सीएनएन या त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावरील न्यूज चॅनेलमुळे पाहता आले. तेथे जगाने पहिल्यांदा ख्रिस्तिनांना पाहिले. त्या अतिशय बिनधास्तपणे रिपोर्टिंग करत होत्या. युद्धाचे अनेक बारकावे उलगडून दाखवत होत्या. लोकांचे दु:ख, वेदना मांडत होत्या. एकीकडे अमेरिकन सैन्य विजयाचा मार्ग प्रशस्त करत होते. दुसरीकडे ख्रिस्तिना जगभरातील महिला पत्रकारांना युद्धभूमीवरही कौशल्य, जिद्द, आत्मविश्वास दाखवण्याची वाट दाखवत होत्या. त्यावर पुढे अनेकींनी वाटचाल केली. त्यातील काहीजणी ख्रिस्तिनांना अभिमान वाटेल, धाडसात त्यांच्या दोन पावले पुढे टाकलेली कामगिरी करत आहेत. व्हाईज न्यूज, एचबीओ या अमेरिकन चॅनेलच्या इसोबेल येऊंग त्यापैकी एक आहेत. जेमतेम ३४ वर्ष ६ महिने वय असलेल्या इसोबेल यांची कामगिरी थक्क करून टाकते. काही वर्षांपूर्वी आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेने सिरीया, इराकमध्ये धुमाकूळ घातला होता. यझदी जमातीचे शिरकाण सुरू केले. तेव्हा त्या तेथे पोहोचल्या. बाँबहल्ल्यांच्या वर्षावात जीवावर उदार होऊन वार्तांकन केले. गृहयुद्धात बेचिराख होणाऱ्या येमेन, सिरिया, लिबियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून तेथील लोकांचे म्हणणे जगापुढे मांडले. दहशतवादी हल्ले, युद्ध, धर्माच्या नावाखाली कट्टरता हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यातही फोकस युद्धामुळे होणारे महिला, मुलांचे हाल. त्यांची परवड यावर असतो. अफगणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना त्यांनी वाचा फोडली. उग्येर प्रांतातील मुस्लिमांवर चीनी राजवट कसा वरवंटा चालवत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन तिला जागतिक सन्मानाचा ऍमी पुरस्कार दोनदा आणि ग्रेसी पुरस्कार एकदा मिळाला आहे. त्यांचे वडिल चिनी. चांगल्या आयुष्याच्या शोधात ते १९८० साली हाँगकाँगमधून इंग्लडला आले. रेस्टॉरंट व्यवसायात स्थिर होताना एका इंग्लिश तरुणीशी विवाह केला. तर इंग्लिश माता आणि चिनी पित्याचे अपत्य असलेल्या इसोबेल यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून २००९ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि पाच वर्ष शांघाय आणि चीन सेंट्रल टेलिव्हिजनसाठी काम केले. २०१४ मध्ये अमेरिकेतील व्हाईज न्यूजने त्यांना निमंत्रित केले. युद्धखोर अमेरिकेच्या कुठे ना कुठे लष्करी कारवाया सुरूच असतात. त्यामुळे इसोबेल यांना आवडीचे काम मिळत गेले. युद्धभूमीवरून सवड काढून त्या टायकून टॉक नावाचा शो चालवतात. द इंडिपेंडंट, द टेलिग्राफ, चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकातही लिखाण करतात. बेंजामिन झांड नावाच्या एका ब्रिटीश-इराणी वंशाच्या पत्रकारासोबत त्या लिव्ह इनमध्ये आहेत. इसोबेल सांगतात की, बेंजामिनसोबतचे नाते मला जगण्याची, लढण्याची ऊर्जा देते. पण आणखीही एक रहस्य आहे. काहीही असले तरी मला रात्री अतिशय गाढ झोप लागते. ही गाढ झोपच मला सकाळी ताजेतवाने करते. लोकांच्या उपयोगाचे, त्यांच्या जीवनात काहीतरी देऊ शकेल, असे शोधण्याची शक्ती, प्रेरणा देते. तरुण पिढीची ख्रिस्तिना असलेल्या इसोबेल यांनी असं अतिशय प्रामाणिकपणे स्वत:च्या उर्जा, प्रेरणास्त्रोताविषयी सांगणंही प्रेरणादायीच आहे ना?

No comments:

Post a Comment