Wednesday 9 June 2021

द फर्स्ट गर्ल

काही आत्मकथनाची पुस्तकं अशी असतात की, ती हातात पडल्यावर आपण लगेच वाचायला सुरूवात करतो. विषय स्फोटक असतो. मांडणी धारदार असते. जागतिक प्रश्नांचा वेध घेतलेला असतो. त्यामुळे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला जातो. पानामागून पाने उलटली जातात. पूर्ण वाचून झाल्यावर आपण चिंताक्रांत होऊन जातो. काय होणार आपलंॽ आपल्या देशाचं, जगाचं कसं होईलॽ असा विचार चक्रीवादळासारखा फिरू लागतो. दिवस उलटतात. त्या पुस्तकात मांडलेला विषय मागे पडतो. ते कपाटात जाते किंवा त्यावर जणू धूळ साचते. अन् अचानक अशा घटना घडतात की, ते पुस्तक पुन्हा कपाटातून बाहेर येते. आधीपेक्षा अधिक बारकाईने पानन् पान वाचले जाते. शब्दा-शब्दांत नेमके काय म्हटले आहे. दोन शब्दांमध्ये काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी विचार धावू लागतात. लेखकानं मांडलेला विषय किती जळजळीत, जिवंत आहे. मानवी मूल्यांविषयी त्यात किती तिखट, मूळ प्रश्न उपस्थित केला आहे, याची जाणिव होऊ लागते. आणि हे पुस्तक केवळ एक आत्मकथन नसून त्यात काही सूचना, संकेत दिले आहेत. वैश्विक संदेश, ऐतिहासिक दस्तावेज दडलेला आहे. असंही उलगडू लागतं. आणि हेच त्या आत्मकथनाचं बलस्थान असतं. ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकात हे सारं आपणास अनुभवास येतं. १९८०-९०च्या काळात भारतात काहीही घडले तरी त्या मागे परकीय शक्तीचा हात आहे, असं म्हटलं जायचं. अगदी पाऊस कमी, जास्त झाला तरी परकीय, तिसरी शक्ती अशी नावं घेतली जायची. आता त्याचं रुप जागतिक पातळीवर बदललंय. अमेरिका, इस्त्राइल मिळून सगळं काही घडवून आणतंय, असं सांगणारा एक मोठा वर्ग आहे. नऊ-दहा वर्षांपूर्वी सिरीया, इराकमध्ये भयंकर हत्याकांड करणाऱ्या आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेच्या पाठिशीही अमेरिकाच असल्याचं म्हटलं जातं. त्यात किती तथ्य आहे, याचं खरं उत्तर काळच देईल. पण एकमात्र खरं की आयसिसनं याजिदी धर्माच्या हजारो निरपराधांना संपवलं. संपवण्यापूर्वी भयंकर अत्याचार केले. तरुणी, महिलांवर बलात्कार केले. माणुसकीची मान शरमेनं खाली जाईल, असा हाहा:कार उडवला. काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडं आयसिसवाल्यांनीच पाठवलेल्या फुटेजवरून बातम्या दिल्या. पण, त्या क्रूर संघटनेच्या विचारांची जडणघडण, कार्यपद्धती हे सारं जगासमोर अत्यंत धाडसाने आणलं एका तरुण महिलेनं. त्यांचं नाव नादिया मुराद. २०१४मध्ये आयसिसनं इराकमधील नादियांच्या गावावर हल्ला केला. त्यांना १२ हजार रुपयांत खरेदी केलं. त्यांच्या आई, सहा भावांना त्यांच्या डोळ्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या आईसह ऐंशी वयस्क महिलांना एकाच कबरीत पुरून टाकण्यात आलं. नादियांना एका दहशतवाद्याकडून दुसऱ्याकडं विकण्यात आलं. विकृतांच्या टोळीनं त्यांच्या देहाचे अनेक लचके तोडले. एकवेळ तर नादियांना असं वाटलं की आपलं आयुष्य संपलं. पण त्याचक्षणाला कोठून कोणास ठावूक तिच्यात एका शक्तीचा संचार झाला. आपण जगलं पाहिजे. जगण्यासाठी लढलंच पाहिजे, हा विचार प्रबळ झाला. या विचारानं झपाटलेल्या नादियांसाठी मग कोठडीची दारे हळूहळू किलकिली होत गेली. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करत, धडपडत, काहीवेळा माघार घेऊन पुढे जात, वेशांतर करत, स्वतःची ओळख लपवत त्या आयसिसच्या मुलुखातून बाहेर पडल्या. कुर्दिस्तानमार्गे जर्मनीत आणि तेथून जगभरात पोहोचल्या. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. आयसिसच्या हल्ल्यानंतर वर्ष-दोन वर्षांत त्यांनी जे काही भोगलं ते ‘द लास्ट गर्ल‘ या पुस्तकात सांगितलं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊससाठी सुप्रिया वकिल यांनी ते मराठीत आणलं आहे. ३०७ पानांच्या या पुस्तकात प्रारंभीचा काही भाग सोडला तर प्रत्येक पानावर थरार आहे. याजिदी नावाचा धर्मच पृथ्वीतलावरून समूळ संपवून टाकायचा असं म्हणत आयसिसनं नेमकं काय केलं. शेकडो वर्षांपासून मुस्लिमांसोबत शांततेनं राहणाऱ्या याजिदींना कसं बेचिराख केलं. पळून जाण्यासाठी कसं भाग पाडलं. हे सांगणारी वर्णनं अंगावर शहारा आणतात. आणि अंर्तमनाला सावधानतेचा सुप्त इशाराही देतात. त्यामुळं हे पुस्तक आवर्जून वाचावं, असं आहे. त्याचं नाव नादियांनी ‘द लास्ट गर्ल’ म्हणजे आयसिसच्या तावडीतून सुटलेली शेवटची मुलगी अशा अर्थानं दिलं असावं. खरं तर ते आयसिसविरुद्ध लढणारी ‘फर्स्ट गर्ल’ असं हवं होतं, अशी भावना पुस्तक वाचून झाल्यावर निर्माण होते.

No comments:

Post a Comment