Tuesday 14 September 2021

प्रिया ती रजनी

सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारात नाकापर्यंत बुडालीय. पोलिसांची लाचबाजी, हप्ताखोरी एव्हरेस्ट शिखरापेक्षा उंचीवर पोहोचलीय. प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या जात्यात भरडली जातेय. महिलेला कोंडीत पकडून चिणलं जातंय. रुग्णालये लुटीची केंद्रे झालीत. भ्रष्टाचार दुथडी भरून वाहतोय. पण भ्रष्टाचार, भंपकबाजी अचानक अवतरलेली नाहीये. ती अनेक वर्षांपासून अखंडपणे वाहतेय. समाज, संस्कृतीचाच भाग होतेय. कलावंतांच्या नजरेनं पाहिलं तर पूर्वी लेखक मंडळी लोकांचं दु:ख, वेदना मांडण्यासाठी कळकळीनं लेखण्या सरसावत. दिग्दर्शक संहितेला धारदार बनवत. कलावंत भूमिकेत प्राण ओतत. शंभर टक्के धंदेवाईकपणा, दुकानदारी नसल्याने कलाकृतीत सत्व दिसे. त्याचा थोडाफार परिणाम यंत्रणेवर होत होता. १९८५मध्ये दूरदर्शनवर झळकलेली ‘रजनी’ ही मालिका त्याचेच उत्तम उदाहरण. कुठेही अन्याय दिसला तर लोक सरकारी खाबूदारांना रजनीचा धाक दाखवत. अगदी घरा-घरात तिचा बोलबाला होता. कारण ती भूमिका १९८० च्या दशकातील मराठी अभिनेत्री प्रिया तेंडूलकर यांनी अतिशय आसोशीने साकारली होती. त्यांच्या डोळ्यातून जणूकाही ठिणग्या पडत. प्रत्येक संवादातून त्या आपलंच दु:ख, वेदना मांडतायत, असं लोकांना वाटे. छोट्या पडद्यावरील अँग्री यंग वुमन अशी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यातील इतर अभिनय पैलूंच्या आविष्काराची शक्यता असताना वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी १९ सप्टेंबर २००२रोजी त्यांनी हे जग सोडले. आता त्यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे ओटीटी, बेव सिरीजमधून उदयास येणाऱ्या कलावंतांच्या नव्या पिढीला मागील वारसा सांगितला तर त्यातून ते काही शिकू शकतील. समाजाच्या दायित्वाची जाणिव ठेवतील. कलेतील धंदेवाईकपणा बाजूला ठेवून स्वत:त सत्व निर्माण करण्यासाठी धडपडतील. संघर्षाशिवाय पदरात पडलेलं टिकत नाही, हेही रजनीचे एपिसोड पाहून त्यांच्या लक्षात येईल. भारतीय रंगभूमीला महत्वाचे वळण देणारे विजय तेंडूलकर यांची मुलगी असल्यातरी प्रियांना रजनीची भूमिका सहज मिळाली नाही. लेखक-दिग्दर्शक बासू चटर्जींनी आधी शर्मिला टागोर, मौसमी चटर्जीचा पाठपुरावा केला. दोघींनी नकार दिल्यावर पद्मिनी कोल्हापूरेंची संमती मिळवली. रजनीच्या भूमिकेतील पद्मिनींचे तीन-चार भागही चित्रित झाले. पण त्यापुढे भट्टी बिघडली. कोणीतरी बासुदांना प्रियांचे नाव सुचवले. पण त्यावेळच्या प्रथितयश फोटोग्राफर्सनी तिचा चेहरा चौकोनी आहे. त्यात आकर्षण बिंदूच नाहीत, अशी टिप्पणी केली होती. मात्र, बासुदांनी हो-ना करत, आढेवेढे घेत प्रियांची निवड केली. आणि प्रियांनी इतिहास घडवला. त्यांना चौकोनी चेहऱ्याची म्हणून हिणवणारे फोटोग्राफर त्यांना एका क्लिकसाठी विनवू लागले. जगभरातील मिडिआ मुलाखतीसाठी रांगा लावू लागला. अभिनयाची क्षमता तर लाखोंमध्ये असते. पण त्यातील मोजक्याच लोकांचा अभिनय रसिकांना आवडत असतो. त्यातील एखाद-दुसऱ्यालाच ते डोक्यावर घेतात. यालाच कलावंतांच्या दुनियेत नशिब म्हणतात. नशिब टिकवून ठेवण्याची वाट खडतर असते. रजनीच्या यशापूर्वी प्रियांनी किमान सात-आठ सिनेमे, दहा नाट्यप्रयोगात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. तरीही त्यांनी एखाद्या शिकाऊ अभिनेत्रीप्रमाणे बासुदांच्या दिग्दर्शनात काम केले. बंडखोर व्यक्तिरेखा साकारत असल्या तरी त्या समंजस व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. बालपणापासून त्यांच्यावर अभिनयाचा संस्कार होत होता. बालवयातच त्यांनी हयवदन नाटकात पहिली भूमिका केली. तेव्हा त्या अभिनेत्री होतील, असा त्यांच्या वडिलांसह अनेकांचा कयास होता. पण कयास चुकवण्याचा आनंद घेणे हा प्रियांचा स्वभाव होता. एखादी गोष्ट शिकायची त्यांना प्रचंड हौस, आवड होती. पण एकदा की ते शिकून झाले. आत्मसात केले की त्यात रमणे, गहिऱ्या पाण्यात उतरणे, त्यातील इतर पैलू शोधणे त्या टाळत. एका ठिकाणी स्थिर राहणे, त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे आंतरिक उर्मी असूनही त्या चित्रकला शिक्षिका झाल्या नाहीत. पंचतारांकित हॉटेलात नोकरी करताना तेथील महिलांना रात्री-अपरात्री घरी जाताना सुरक्षा रक्षक मिळावा, यासाठी यशस्वी आंदोलन केले. वडिलांसोबत नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होऊन ‘नर्मदा सरोवर क्या करेगा, सबका सत्यानाश करेगा’, अशा घोषणा दिल्या. काही दिवस हवाई सुंदरी, अर्धवेळ मॉडेलिंग, वृत्त निवेदिकेचे काम केले. त्या नाविन्याचा शोध घेणाऱ्या, कल्पक लेखिकाही होत्या. त्यांची पाच-सहा पुस्तके वाचकप्रिय झाली. या चतुरस्त्र अभिनेत्रीच्या वाटचालीतून नव्या पिढीने काही शिकले. अन्याय, अत्याचाराविरुद्ध खऱ्या तळमळीने आवाज उठवला तरच कलावंत आणि रसिकांमधील नाते अधिक बळकट होईल. होय ना?

No comments:

Post a Comment