Wednesday 10 November 2021

फाळणी : द्वेषाची पेरणी

धर्म, जात असं काही नसतं. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. धर्म म्हणजे अफुची गोळी. धर्माच्या आधारावर निर्माण होणाऱ्या राष्ट्राचे काही खरं नाही, असा प्रचार, प्रसार गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असला तरी प्रत्यक्षात धर्म, जातीभोवतीच गेली किमान दहा हजार वर्षे पृथ्वी फिरत आहे. माणुसकीचा अनुभव वैयक्तिक पातळीवर येत असला तरी मानवी समूहातून ती केंव्हाच परांगदा झालीय. धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली बहुतांश राष्ट्र बऱ्यापैकी जगत आहेत. खडतरपणे का होईना पाकिस्तान, बांगलादेश या कट्टर इस्लामी देशांची वाटचाल सुरु आहे. ते भारतात सामिल, विलीन होण्याची शक्यता नाही. पश्चिम आणि पूर्व जर्मनीसारखं भारतीय उपखंडात होणे नाही. कारण दुसऱ्या महायुद्धातील विजयानंतर कम्युनिस्ट आणि भांडवलशाही शक्तींनी जर्मनीचे राजकीय विचारसरणीनुसार तुकडे पाडून घेतले होते. दोन्ही बाजूंच्या जर्मनांमध्ये एकमेकांविषयी खरेच प्रेम होते. रक्ताच्या थेंबाथेंबात मुरलेल्या धर्माचा, त्यातील द्वेषाचा मुद्दा नव्हता. बर्लिनची भिंत पाडण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोक धावले होते. तशी स्थिती इथे नाही. उलट कमालीचा द्वेष पसरला आहे. फाळणीने तो कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लढतीत त्याचा अनुभव आला. भयंकर महायुद्ध. ते भारत जिंकणारच. जिंकायलाच हवे, अशी मिडिआवाल्यांनी हवा तयार केली. तशा बातम्या छापून आणल्या गेल्या. दाखवल्या गेल्या. आणि भारताने हजार टक्के सपाटून मार खाल्ला. मग भारतातील कश्मिर प्रांताच्या तरुणांनी पाक जिंकल्याचा जल्लोष साजरा केला. त्यानं भारतात पाकविषयी धार्मिक द्वेष आणखी वाढला. खरं तर दोन कब्जेदारांत प्रॉपर्टीची वाटणी झाली. सुरुवातीची काही वर्षे दोघेही जे हवे ते मिळाले म्हणून खुश होते. हलके हलके का होईना एकमेकांचे गोडवे गात होते. त्यामुळे झालं ते बरंच झालं. धार्मिक द्वेष आटोक्यात राहिल, असं जगाला वाटू लागलं. पण नंतर गोडव्याचे सूर अत्यंत कडवट, हिंसक होत गेले. एकाच्या दोन फाळण्या होऊन भारत, पाकिस्तान, बांगलादेशात कायम अस्वस्थता आहे. तिन्ही देशांतील लोक भूभागाचे तुकडे करण्यातून द्वेषापलिकडे काहीही शिकलेले नाहीत. अडीच महिन्यांपूर्वी अफगणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यावर जी राजकीय, सामाजिक, आर्थिक समीकरणे तयार होत आहेत. देशांच्या सीमेवर ज्या घडामोडी होत आहेत. तिन्ही देशात आणि आसपास राजकारण जे वळण घेत आहे. ते पाहता फाळणीविषयी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार विचारमंथन करणे आवश्यक आहे. या मंथनासाठी प्रतिभा रानडे यांचे फाळणी ते फाळणी हे दस्तावेजी पुस्तक भरीव मदत करते. येणाऱ्या काळात काय घडू शकते, याचे संकेत देते. फाळणीच्या पोटात दडलेला द्वेष समजून घेण्यात, समजावून सांगण्यात महत्वाची भूमिका बजावते. एक तपापूर्वी म्हणजे २००९ मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे ‘फाळणी ते फाळणी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्या वेळेपेक्षा आता त्यातील माहितीमूल्य निश्चित वाढले आहे. काही संदर्भ अधिक खोलवर जाऊन काही सांगत आहेत, असे लक्षात येते. रानडेंनी इतिहासकाराप्रमाणे अतिशय चिकाटी, तटस्थपणे फाळणीचा, पाकिस्तान जन्माचा अभ्यास केला. त्यासाठी आवश्यक पुस्तके अमेरिकेतून मिळवली. मुंबई विद्यापीठातील एशियन सर्व्हे आणि इतर देशी-विदेश नियतकालिकांचे वर्षानुवर्षांचे अंक अभ्यासण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांना या चार प्रकरणांच्या २०९ पानी पुस्तकात सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी सांगता आल्या आहेत. उदा. फारुख अब्दुल्लांचे वडिल शेख अब्दुल्ला पाकिस्तानकडे कसे झुकले होते, याची माहिती त्या देतात. मोहंमद अली जिनांनी २३ जुलै १९४३ रोजी फाळणीविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेण्याचे ठरवले होते. आणि या भेटीची बातमी पेप्रांमध्ये प्रसिद्ध होऊ नये, अशी व्यवस्थाही केली होती, असं त्या सांगतात. १९५३ साली लाहोरमध्ये अहमदिया पंथियांचे शिरकाण झाले. त्याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती मोहंमद मुनीर, कयानी यांचा आयोग नेमण्यात आला. त्याच्यासमोर घटना समितीचे सदस्य भूपेंद्रकुमार दत्त, राजकुमार चक्रवर्ती काय म्हणाले. आणि शेवटी न्यायमूर्ती मुनीर यांनी काय् अहवाल दिला, या सह रानडे यांनी पानापानांवर सांगितलेल्या अनेक गोष्टी चारही दिशांना चौकसपणे पाहण्यास सांगतात. मिडिआतून जे पेरले जाते. त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा संदेश देतात. विशिष्ट अजेंडा ठरवून काहीजण काहीही लिहित, बोलत असले तरी प्रत्यक्षात काय घडते, हेच महत्वाचे असते. म्हणून ऐतिहासिक तथ्य, पुराव्यांतून मांडणी करणारे ‘फाळणी विरुद्ध फाळणी’ पुस्तक आता नव्या घडामोडी डोक्यात ठेवून अभ्यासू मनाने वाचावे असे नक्कीच आहे.

No comments:

Post a Comment