Tuesday 23 November 2021

एक बदल : २७ वर्षे

भांडवलशाही नष्ट झालीच पाहिजे. भांडवलदारधार्जिणे सरकार हाकला, असं कितीही म्हटलं तरी ती काही नष्ट होत नाही. कारण भांडवलशाहीच्या जागी लोकांच्या पोटापाण्याची काळजी वाहणारी दुसरी मजबूत, कायमस्वरूपी यंत्रणा भांडवलशाहीच्या विरोधकांनी उभी केलेली नाही. म्हणून अवघे जगच भांडवल्यांची बाजारपेठ होत आहे. त्याने एकीकडे शोषण वाढत आहे. दुसरीकडे नवे शोधण्याची, नवनिर्मितीची संधी मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पैसा कमावणे शक्य होतंय. तसं म्हटलं तर या भांडवली व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये, बलस्थाने आहेत. त्यात जाहिरात ही एक महत्वाची शक्ती आहे. या माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर, मारा सुरू आहे. पण त्यातून कधीकधी सामाजिक बदलांची नोंदही होते. चांगल्या अर्थाने समाज बदलावा, असेही सुचवले जाते. नुकत्याच दुबईत आयपीएल क्रिकेट लढती झाल्या. त्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरू असताना झळकलेली एक जाहिरात अशा बदलांचे उत्तम उदाहरण. पण हा बदल होण्यास आणि तो जाहिरातीमधून अतिशय खुमासदार पद्धतीने येण्यास २७ वर्षे लागली. या जाहिरातीची बीज पेरणी १९६०मध्ये झाली. त्यावेळचे देखणे भारतीय फलंदाज अब्बास अली बेग यांचे एका तरुणीने अचानक मैदानात शिरून चुंबन घेतले होते. तो प्रसंग अनेकांच्या स्मृतीवर कायमस्वरूपी कोरला गेला. दुसरी घटना १८ एप्रिल १९८६ रोजीची. जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला आशिया कप मिळवून दिला. मैदानात चाहता शिरणे आणि अखेरच्या चेंडूवर षटकार या दोन्हीचे अचूक मिश्रण करणारी ओगेल्व्हे कंपनीनिर्मित, महेश मथाई दिग्दर्शित एक शानदार जाहिरात १९९४मध्ये झळकली. शेवटच्या चेंडूवर फलंदाज षटकार खेचतो आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची प्रेयसी सुरक्षा रक्षकांना नृत्याच्या तालावर हुलकावणी देत मैदानात शिरते. प्रियकर, फलंदाजाला आलिंगन देते. तिच्या धाडसी प्रेमवर्षावाने तो सुखावतो, लाजतो. अशी मांडणी त्यात होती. त्यातील प्रेयसीची भूमिका करणाऱ्या शिमोना राशी रातोरात स्टार झाल्या. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आणि एका नव्या रुपात पुन्हा ती जाहिरात २०२१ च्या आयपीएलमध्ये अवतरली. ती पाहून भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक सुखावले. महिलामध्ये तर विशेष कौतुक झाले. खरेतर नवी जाहिरात जुन्याची रिमेक होती. पण त्यात एक अतिशय महत्वाचा बदल होता. तो म्हणजे अखेरच्या चेंडूवर पुरुष नव्हे महिला क्रिकेटपटू षटकार खेचते. आणि तिचा प्रियकर सुरक्षारक्षकाला हुलकावणी देत मैदानात शिरतो. तिला अभिवादन करतो. आलिंगन देतो, असा आनंदाच्या लाटा उसळवणारा बदल दाखवला आहे. मूळ संकल्पना अत्यंत प्रभावी, कसदार. उच्च दर्जाचे चित्रीकरण. पियूष पांडेंच्या शब्दरचनेला शंकर महादेवन यांचा सुरेख स्वर. शिवाय अभिनेत्री, अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील रेष न रेष काहीतरी सांगणारी. त्यामुळे जाहिरातीची परिणामकारकता हजारपटीने वाढली आहे. नव्या पद्धतीने मांडणी करताना जुन्याची मोडतोड होणार नाही. उलट नवे अधिक चैतन्यदायी होईल, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली. महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणाऱ्या अन् काहीसा अलिया भटसारखा चेहरा असलेल्या काव्या रामचंद्रन चेन्नईच्या रहिवासी. तेथील रंगभूमीवर त्या काम करतात. शिवाय सुखा एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये कार्यरत आहेत. हे फाऊंडेशन विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि रोजगार मिळावा, यासाठी काम करते. काव्या राष्ट्रीय जलतरणपटूही आहेत. १९९४मध्ये पहिली जाहिरात आली त्याच वर्षी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे जुनी जाहिरात त्यांच्या कधी पाहण्यात आली नव्हती. नव्या जाहिरातीसाठी दिग्दर्शक शशांक चतुर्वेदींनी निवड केल्यावर मात्र त्यांनी ती असंख्यवेळा पाहिली, अभ्यासली. मुंबईच्या ब्रेवॉर्न स्टेडिअमवर चित्रीकरण झाले. तत्पूर्वी तीन दिवस षटकारासाठी हुकचा फटका मारण्याचा कसून सराव करून घेतला. आता त्यांच्या अभिनयक्षमतेचे जगभरात कौतुक होत आहे. त्यामुळे त्या सुखावल्या आहेत. अलिकडील काळात कित्येक महिला खेळाडू, क्रिकेटपटू स्टार झाल्या आहेत. त्यांच्याविषयीचा अभिमान या जाहिरातीत आहेच. शिवाय ही जाहिरात सामाजिक बदल नोंदवणारी, महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण करणारी आणि आता पुरुषांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाच पाहिजे, असं सांगणारी आहे, असं काव्या सांगतात. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय की, या जगात काहीच कायम नाही. सगळेकाही बदलत असते. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त चांगल्या सामाजिक बदलांसाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. या जाहिरातीच्या रुपाने किमान त्याची सुरुवात झालीय. आता काव्या रामचंद्रन यांना पुरुषांकडून अपेक्षित असलेला बदल समाजात प्रत्यक्षात कधी येईल, याची वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment