Tuesday 7 December 2021

असं का होतं?

रसिकांच्या हृदयावर अविरत राज्य करणारी, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी दोनच पण अतिशय सुमधूर गीते. संथगतीची तरीही खिळवून ठेवणारी कथा, कसदार दिग्दर्शन अन् सहजसुंदर अभिनय अशा चौरंगी संगमाचा सिनेमा ‘रजनीगंधा’. १९७४चा हा सिनेमा आजही मोहात पाडतो. त्याच्या मूळ कथाकार, हिंदीतील प्रख्यात लेखिका मन्नु भंडारी यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने रजनीगंधा पडद्यावर येण्याच्या प्रवासाची ही कहाणी. १९६९मध्ये हिंदीतील मातब्बर लेखक राजेंद्र यादव यांची ‘सारा आकाश’ कादंबरी प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक बासु चटर्जींच्या हाती लागली. त्यावरून त्यांनी सिनेमा केला. तो तिकीट खिडकीवर, समीक्षकांच्या नजरेत यशस्वी ठरला. त्यानंतर बासुदा नव्या कथेचा शोध घेत असताना राजेंद्र यादव यांच्या पत्नी मन्नू भंडारी यांची ‘यही सच है’ कथा त्यांच्या वाचनात आली. आणि याच कथेवर आपला पुढील सिनेमा असेल, असं त्यांनी जाहीर केलं. मन्नु उर्फ महेंद्रकुमारींना भेटून त्यांनी आपला मानस सांगितला. तेव्हा त्यांना सौम्य धक्काच बसला. कारण आपल्या या कथेत सिनेमा करण्यासारखं काही असेल, असा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. प्रेमभंगाचा धक्का पचवू पाहणाऱ्या एका मनस्वी, मध्यमवर्गीय तरुणीची मानसिक आंदोलनं त्यांनी ‘यही सच है’मध्ये तरुणीच्या रोजनिशीतून आविष्कृत केली होती. ही आंदोलनं पडद्यावर कशी मांडता येईल, असा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता की, हे मांडलेलं रसिकांना कसं आवडेल? आपल्या कथेतील अलगद तरीही अतिशय रुतत जाणारी मांडणी मोठ्या पडद्यावर हलकी तर होणार नाही ना? पण बासुदा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. कथानकात काही बदल करून त्यांनी विद्या सिन्हा, अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर या त्या वेळच्या फारशा परिचित नसलेल्यांना भूमिका दिल्या. १९७२-७३ मध्ये दिल्लीत थोडंसं चित्रीकरण झालं. तेव्हा तर मन्नु भंडारींना सतत असं वाटू लागलं की हा सिनेमा आपटणार. मग बातमी कानावर आली की, वितरकांनी रजनीगंधा प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. यात काहीच मसाला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मन्नुजी खट्टू झाल्या. यात एकतरी बडा कलावंत हवा होता, असं त्यांना वाटू लागलं. पण काही महिन्यात त्यांना त्याचाही विसर पडला. सहा महिने उलटले आणि बासुदांनी कळवलं की, ताराचंद बडजात्या यांनी आपला सिनेमा वितरित करण्यास घेतला आहे. रजनीगंधा प्रदर्शित झाला आणि इतिहास घडला. रसिक आणि समीक्षक असे दोन्ही फिल्म फेअर पुरस्कार या सिनेमानं पटकावले. विद्या सिन्हा, अमोल पालेकर रातोरात स्टार झाले. दिनेश ठाकुरांभोवती वलय निर्माण झालं. बासुदांच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब झालं. त्या तुलनेनं मन्नु यांचे फारसं कौतुक झालं नाही. आणि त्यांनीही ते खेचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्या त्यांच्या लिखाण कामात दंग होऊन गेल्या. 'मैं हार गई', 'तीन निगाहों की एक तस्वीर', 'एक प्लेट सैलाब', 'यही सच है', 'आंखों देखा झूठ' और 'त्रिशंकु' या त्यांच्या कथांमधून त्यांनी महिलांच्या व्यथांची परखड, वास्तववादी मांडणी केली. हिंदीसह सर्व भाषिक साहित्यात त्या सर्व कथा प्रचंड गाजल्या. त्यांच्या महाभोज कादंबरीनं साहित्यिक, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. १९७९मध्ये प्रकाशित झालेल्या या साहित्यकृतीत एका सामान्य माणसाचे भ्रष्ट नोकरशाही कसे हाल करते, याचं मर्मभेदी वर्णन होतं. ‘आपका बंटी’ या त्यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यात त्यांनी प्रेमात आकंठ बुडणं, विवाह होणं आणि एके दिवशी विभक्त होणं यात महिलेची किती, कशी फरफट होते, हे सांगितलं होतं. व्यक्तिगत जीवनातील अनुभव त्यांनी मांडले होते. यशस्वी लेखिका असल्या तरी वैवाहिक जीवनात त्या होरपळल्या होत्या. रजनीगंधानं स्टार बनवलेल्या विद्या सिन्हांचंही काहीसं असंच झालं. त्यांना खऱ्या आयुष्यात सुख मिळालंच नाही. अखेरच्या टप्प्यात तर त्यांना दुसऱ्या पतीकडून मारझोड सहन करावी लागली. एकाकी अवस्थेत त्यांचा शेवट झाला. म्हटलं तर काहीजणांचं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि काहींचं सोपं, सुटसुटीत, सरळ रेषेसारखं असतं. अनेकदा सरळ चालणारे भरकटून जातात आणि भरकटलेले ताळ्यावर येतात. हे असं का असतं? का होतं, याचं ठोस, अचूक उत्तर अजूनतरी सापडलेलं नाही. त्याचा शोध अखंडपणे सुरू आहे. आणि तो सुरू असेपर्यंत मन्नु भंडारी यांच्या कथा, अमोल पालेकर-विद्या सिन्हांचा सहज अभिनय, बासुदांचे दिग्दर्शन अजरामर राहिल. खरंय ना?

No comments:

Post a Comment