Tuesday 28 December 2021

लालनांचे रंग

कर्म सर्वात महत्वाचं. कर्मानुसारच फळ निश्चित होतं. पण असंही म्हटलं जातं की, चार-पाच लोकांनी एकसारखंच कर्म केलं तरी त्यांचं फळ त्या प्रत्येकाला एकसारखेच मिळेलच, याची हमी नाही. या हमी नसण्याला नियती, नशिब, योग अशी नावं दिली जातात. अनेक राजकारणी, कलावंतांच्या दुनियेत तर नशिबाला फार महत्व आहे. आता हेच पहा ना. सर रिचर्ड अॅटनबरोंनी १९८१-८२मध्ये जगद्विख्यात गांधी सिनेमात महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी हॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते बेन किंग्जले यांची निवड केली. तेव्हा कस्तुरबा कोण होणार, असा प्रश्न होता. अनेकींची नावे चर्चेत होती. संधी मिळाली रोहिणी हट्टंगडींना. आणि त्या जागतिकस्तरावरील अभिनेत्री झाल्या. तसं पाहिलं तर तुलना चुकीची आहे. तरीही तो दोष स्वीकारून असे म्हणावे लागेल की, रोहिणींपेक्षा काकणभर प्रखर, धाडसी, अष्टपैलू असलेल्या लालन कमलाकर सारंग मराठी रंगभूमीवरच मर्यादित राहिल्या. अर्थात त्यामुळे त्यांचे अभिनेत्री म्हणून महत्व मुळीच कमी होत नाही. जेव्हा कधी मराठी रंगभूमीवरील अभिनेत्रींचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाईल. तेव्हा त्यात लालन यांचे नाव पहिल्या पाच जणींमध्ये घ्यावे लागेल. २००६मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. तरीही त्यांच्यावर मराठी रसिकांकडून किंचित का होईना अन्याय झाला, अशी रुखरुख डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेले त्यांचे ‘जगले जशी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचताना वाटत राहते. अर्थात हा दोष त्या ज्या काळात बहरात होता. त्या काळालाही द्यावा लागेल. कारण त्या वेळी खासगी मनोरंजन वाहिन्या, सोशल मिडिआ नव्हता. त्यामुळे रंगभूमी आणि अत्यल्प विस्तार असलेले दूरदर्शन एवढीच माध्यमे होती. २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यातील पैंगणकर कुटुंबात त्या जन्मल्या. सहसा मुलींना मिळत नसलेले लालन हे नाव त्यांच्या वडिलांनी एका कादंबरीतील बैरागिणीच्या नावावरून दिले. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई-वडिल अशा मध्यमवर्गीय पैंगणकरांच्या कुटुंबात दोन्ही बाजूंनी अभिनयाचा वारसा नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी करायची. आई-वडिल म्हणतील त्याच्याशी संसार थाटायचा. मुला-बाळांमध्ये रममाण व्हायचं, एवढंच लालन यांचं स्वप्न होतं. पण नशिब नशिब म्हणतात ते काय याचा अनुभव त्यांना आला. बीएचे शिक्षण घेत असताना मुंबईतील आयएनटी एकांकिका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. चेहऱ्यावर पहिल्यांदा रंग लावला आणि त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. कमलाकर सारंग या अवलिया दिग्दर्शक, अभिनेत्यासोबत संसार करत तो दीर्घकाळ चालला आणि ९ नोव्हेंबर २०१८ रोजी थांबली. मधल्या प्रवास काळात त्यांनी रंगभूमी अक्षरश: दणाणून टाकली. मुंबईचा मराठी साहित्य संघ आणि अत्रे थिएटर्सच्या नाटकांतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया, मोरुची मावशीमध्ये त्यांनी हलक्याफुलक्या भूमिका केल्या. पण एक सशक्त, बंडखोर, बोल्ड अभिनेत्री अशी त्यांची ओळख झाली विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरमुळे. त्या काळात म्हणजे १९७२मध्ये त्यांनी ‘बाईंडर’मधील चंपा साकारली. तेंडुलकरांना अपेक्षित असलेल्या चंपाचे अंतरंग त्यांनी दाखवून दिले. रंगभूमीवरील त्या काळच्या महिलेच्या प्रतिमेला प्रचंड धक्के देणाऱ्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक जागा त्यांनी इतक्या सहजपणे आविष्कृत केल्या होत्या की खलनायिकासम भूमिका असूनही त्या प्रेक्षकांना थक्क करत. गिधाडे कमला या तेंडुलकरांच्या महाकाय नाट्यकृतीतील भूमिकाही लालन यांनी गाजवल्या. ‘जगले जशी’ या आत्मकथनात लालन यांनी छोट्या-मोठ्या घटनांतून जीवन प्रवास नोंदवला आहे. पण तो केवळ त्यांच्यापुरता प्रवास नाही. तर त्या काळात मराठी रंगभूमीवर काय घडत होतं, हे सांगणारा पटही आहे. यात अर्थातच सखाराम बाईंडर अग्रस्थानी आहे. हे नाटक लालन यांचे पती कमलाकर यांनी दिग्दर्शित केलं. स्त्री - पुरुष संबंधांचा एक वेगळाच चेहरा दाखवणाऱ्या सखारामनं मराठी मध्यमवर्गात वादळ निर्माण केलं. मराठी माणूस, मराठी संस्कृतीविषयी आक्रमक असलेल्या शिवसेनेने या नाटकाला कडाडून विरोध केला. तो हिंसक विरोध अंगावर घेत कमलाकर यांनी प्रयोग केले. कारण लालन यांचा भक्कम पाठिंबा होता. पण ते सारं कसं घडत गेलं, याची रोचक माहिती जगले जशीमध्ये आहेच. शिवाय अभिनेत्री, माणूस म्हणून त्या कशा खंबीर, प्रगल्भ, संवेदनशील, परिपक्व होत गेल्या. अभियनापलिकडील जीवन कसे शोधत गेल्या, हेही उलगडत जाते. त्यामुळे हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही. तर खरंच अभिनेत्री होऊ इच्छिणाऱ्या आणि वादळाशी लढण्याची तयारी असणाऱ्यांसाठीही दिशादर्शक आहे.

No comments:

Post a Comment