Wednesday 12 January 2022

एमबीएसचं ‘सौदी’

जागतिक स्तरावर झालेल्या एका अभ्यासानुसार २०७०मध्ये इस्लाम या पृथ्वीवरील सर्वात मोठा धर्म असेल. आणखी पाच दशकांनी तो ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांना मागे टाकेल. त्यामुळे इस्लामचा जन्म ज्या भूूमीत, देशात झाला. जेथे त्याचा झपाट्याने प्रचार, प्रसार झाला. त्या सौदी अरेबियाविषयी विविध अंगांनी जाणून घेणे पुढील काळात अत्यंत उत्सुकतेचा विषय असू शकतो. कारण इस्लामविषयीचे बहुतांश सर्व अत्यंत महत्वाचे निर्णय याच देशातून होतात. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रे सौदीवर अवलंबून आहेत. दुसरीकडे धर्माच्या पोलादी पडद्यामागे दडलेल्या या देशाची काही कवाडे प्रिन्स मोहंमद बिन सुलेमान म्हणजे ‘एमबीएस’ हळूहळू किलकिले करत आहेत. धर्ममार्तंडांचा विरोध पत्करून जनतेवरील अनेक बंधने ते शिथिल करत आहेत. खनिज तेलाने सोन्याचा धूरात बुडालेल्या सौदी अरेबियात त्यांनी महिलांना चारचाकी चालवण्याची परवानगी दिली. तेव्हा ती जगभरातील प्रसारमाध्यमात सर्वाधिक चर्चेची बातमी होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराची हत्या एमबीएस यांनीच घडवून आणली असेही म्हटले जाते. महिनाभरापूर्वी आपल्या सुपरस्टार सलमान खानने तेथे फिल्मी गाण्यांवर नृत्य केले. त्याच्यासोबत किमान ऐंशी हजार प्रेक्षक थिरकले. त्यावर मोठे वादळ उठले. पण ‘एमबीएस’नी त्याची फार दखल घेतली नाही. जग ज्या दिशेने, गतीने बदलत आहे, त्या प्रमाणे काही पावले टाकावी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे. ते सुपर शक्तीमान नेते असले तरी त्यांची वाट खडतर राहणार आहे. कारण सौदी अरेबियाची सामाजिक जडणघडण अत्यंत वेगळी आहे. माणूूस म्हणूून तेथील माणसं कशी आहेत? प्रसारमाध्यमांनी काही घटनांच्या आधारे अरबांची रंगवलेली प्रतिमा वेगळी आहे का? प्रत्यक्षात अरब कसे वागतात. कसा विचार करतात. त्यांचे जगणे कसे आहे. परदेशी लोकांसोबत त्यांचा व्यवहार कसा असतो. तेथे प्रत्येक गावातून सोन्याचा धूर निघतो? तेथे गरीब लोक असतात? खेडेगावातील महिलांची स्थिती कशी आहे? धर्माचे तेथे सामान्य माणसे खरंच कडकपणे पालन करतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या, सोप्या शब्दात आणि निरागसपणे जाणून घ्यायची असतील तर डॉ. उज्वला दळवी यांचे ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेले पुस्तक नक्की वाचावे. त्यांनी सांगितलेले किस्से, कहाण्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या आहेत. तरीही त्यातून सौदी समाजाविषयी बऱ्यापैकी अंदाज येतो. जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या सौदी अरेबियाबद्दल मराठीत फारसे लिखाण झालेले नाही. तेथील सामान्य माणसाच्या आयुष्याविषयी तर फार काही उपलब्ध नाही. त्यामुळेही ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ महत्वाचे आहे. अनेक अडचणींची लढत, संकटांचा सामना करत डॉ. दळवी आणि त्यांचे पती जवळपास पंचवीस वर्षे म्हणजे १९८५ ते २०१० पर्यंत सौदी अरेबियामध्ये रुग्ण सेवेत होते. उम्म खद्रा या दुर्गम खेड्यात त्यांचा दवाखाना होता. तो चालवताना त्यांना सौदी अरेबियात गेल्या अनेक शतकांपासून राहणारा मूळ निवासी बदायुँ समाज जवळून पाहण्यास मिळाला. त्या काळात त्यांनी जे पाहिले, अनुभवले, अभ्यासले. ते त्यांनी या पुस्तकातील २६ प्रकरणांमध्ये मांडले आहे. त्यांची शीर्षके भाऊचा धक्का, पहिल्या दिवसाच्या ठेचा, ना मेघ ना दूूत, धर्मकारण, खानाखजाना, मरुभूमीतली मुशाफिरी, लक्ष्मीचा सारीपाट, वाळवंटी सूर मारिला अशी मराठी मनाला पटकन वेधून घेणारी आहेत. यावरून डॉ. दळवींनी सौदीतले त्यांचे दिवस कोणताही राजकीय, धार्मिक अभिनिवेश न ठेवता कसे टिपले असावेत, हे लक्षात येते. त्यांच्या कथनाला कोणताही रंग लागलेला नाही. कुठलाही विखार नाही. त्या अतिशय निखळपणे वर्णने करतात. सौदी कुटुंबाचे चित्र डोळ्यासमोर उभे करतात. सौदी पुरुष आणि सौदी महिलांचे विश्व उलगडून सांगतात. धर्माचा पगडा म्हणजे नेमके काय असते. हा पगडा सांभाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी कशी यंत्रणा उभी केली आहे, याची कुशलतेने माहिती देतात. तंबूच्या आसपास वावरणाऱ्या महिला, मुला-मुलींच्या वेगळ्या शाळा, परदेशी विशेषत: युरोपीय कर्मचाऱ्यांचा रुतबा असे अनेक पैलू त्या खुमासदारपणे सांगतात. त्यामुळे काहीवेळा आपण हा प्रसंग पडद्यावर पाहात आहोत की काय, असा भास होतो. सौदी महिलेचे दु:ख, वेदना त्यांनी जवळपास पुस्तकभर मांडल्या आहेत. हे ‘सोन्याच्या धुराचे...’ खूप मोठे बलस्थान आहे. डॉ. दळवींनीच म्हटल्यानुसार या पुस्तकाने अलिबाबाच्या गुहेचे दार हलकेच सरकवले आहे. त्यातून डोकावताना काहीजणांना सोन्याच्या राशी दिसतील. काहींच्या नजरेस तेलाचे बुधले पडतील. मराठी वाचकांनी हा खजिना नक्कीच लुटावा असा आहे.

No comments:

Post a Comment