Tuesday 18 January 2022

आस्था सरकारी

सरकार म्हणजे काय असतं? सरकारनं काय केलं पाहिजे? या प्रश्नाची अनेक उत्तरे. पण त्यातील एक महत्वाचे असेल की, जनतेच्या आणि त्यातही गरिबांच्या अडचणी ज्याला कळतात ते खरं सरकार. आणि या अडचणी दूर करण्यासाठी झुंजणाऱ्या यंत्रणेला लोकांचं सरकार म्हटलं पाहिजे. आता एवढं आदर्श, सर्वोत्तम काम करणारं सरकार हवं असेल तर त्यासाठी गरिबांविषयी हृदयापासून कणव, आस्था असलेली मंडळीच सत्तेत हवीत. नुसती कणव, आस्था असून चालत नाही. तर अडचणींना नेस्तनाबूत करण्याची शक्तीही त्यांच्या अंगात हवी. तेवढे सामर्थ्य हवे. निर्णयाची अंमलबजावणी करता आली पाहिजे. तसं नसेल तर लोक योग्य वेळी अशा सरकारला थोडं बाजूला सरका असं म्हणतात. सरकवूनही टाकतात. कारण अगदी अलिकडच्या भाषेत बोलायचे झाले तर स्मार्ट सोल्यूशन देणारे, गतिमान सरकार काळाची गरज झाली आहे. अशी संवेदनशील, गतिमान सरकारे दुर्मिळ होत चालली आहेत. पण एखादे उदाहरण समोर आले तर ते नक्की सांगायला हवे. कोरोनाच्या संकटकाळात केरळ सरकारनं एक छोटेखानी निर्णय घेतला. तो अंमलातही आणला. त्यातून मुख्यमंत्री विजयन यांची संवेदनशीलता दिसली. आपली काळजी करणारे कोणीतरी राज्यकर्ता आहे, अशी जाणिव तमाम कलावंत जगताला झाली.  त्या विषयी दक्षिणेतील प्रसारमाध्यमात वार्ताही प्रसिद्ध झाल्या. गेल्या वर्षी कोरोनाचे केरळात तांडव सुरू झाले. सरकारने पहिल्याच फटक्यात सगळे बंद करून टाकले. त्या मुळे सादरीकरणावरच जगणारी रंगकर्मी मंडळी सैरभैर झाली. नाटकाचा प्रयोगच नाही म्हणजे रसिकांकडून कोडकौतुक नाही. खिशात चार पैसेही नाही. मग करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला. काहींनी इतर नोकऱ्या शोधल्या. पण नाटकात काम हेच ज्यांचे एकमेव कौशल्य होते. त्यांचे काय? आंदोलन, मंत्र्यांना निवेदन  असा विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच मल्याळम मिशन या केरळ सरकारच्या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना त्यांची वेदना कळाली. मल्याळी भाषा, मल्याळी संस्कृतीच्या जतनासाठी हे मिशन काम करते. या मिशनने एक योजना आखली. नाट्यगृहे बंद असली तरी नाटकांवर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्याच्यापर्यंत आवाजाचा वापर करून पोहोचण्याचे त्यांनी ठरवले. त्यात मिशनचाच एक भाग असलेल्या रेडिओ मल्याळमचे जाणते, कलाप्रेमी तंत्रज्ञ सहभागी झाले.  तिरुवअनंतपुरम येथील निरीक्षा या महिलांच्या थिएटर ग्रुपने नऊ प्रख्यात महिला लेखिकांच्या कथा लघुनाटिकेत रुपांतरित केल्या. ‘ती’ नावाच्या रेडिओ चॅनेलवरून यातील तीन नाटिकांचे प्रक्षेपण पहिल्या टप्प्यात झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना थोडीफार कमाई झाली. रेडिओमुळे ते आणखी मोठ्या, वेगळ्या रसिकवर्गापर्यंत पोहोचले. यात सर्वात महत्वाचे म्हणजे ‘ती’ नावाचे हे रेडिओ चॅनेलही केरळच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे  चालवले जाते. स्त्री पुरुष समानता या विषयावर समाजमन तयार करणे, हे या चॅनेलचे ध्येय, उद्दिष्ट आहे. मल्याळम मिशनच्या संचालक सुजा सुसान जॉर्ज यांनी ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. उत्तम दर्जाचे साहित्य वेगळ्या रुपात रसिकांकडे पोहोचावे. कलावंत, त्यातही महिला कलावंतांना सन्मान मिळावा. त्यांची समाजातील ओळख कायम रहावी. त्यांचा उदरनिर्वाह चालावा, अशी सारी उद्दिष्टे त्यांनी सरकारी यंत्रणेतून साध्य केली. त्यांना निरीक्षा ग्रुपच्या संस्थापक इ. राजेश्वरीदेवी, सुधी देवयानी यांची मोलाची, दर्जेदार मदत मिळाली. मान्यवर महिला लेखिकांनी पोटतिडकीेने महिलांचे प्रश्न मांडलेल्या नऊ कथा निवडणे महत्वाचे होते. या दोघींनी स्फोटक, वादळी विषयांवरील कथांची निवड केली. त्यामुळे त्यांची केरळातील शहरांपासून खेडेगावांपर्यंत जोरदार चर्चा झाली. अभिजन आणि सामान्य असा दोन्ही रसिकवर्ग कानासमोर ठेवून कथांचे नाट्य रुपांतर करणे आणि ते सादर करण्यासाठी कलावंत निवडणे, अशी सगळी आव्हाने राजेश्वरीदेवी, सुधी यांनी अत्यंत कमी वेळात पेलली. अर्थात नाट्य रुपांतरणात त्यांनी लेखिकांच्या परवानगीने काही बदलही केले. नव्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या. एखाद्या वेबसिरीजला साजेल अशी सजावट केली. तो त्या मूळ लेखिकांसाठीही नवा, सुखद धक्का देणारा अनुभव होता. आता कोरोनाचे संकट ओसरल्यावर या लघुनाटिका रंगमंचावर सादर करण्याचाही प्रयत्न त्या करणार आहेत. एकीकडे एक सरकार कलावंतांना एक एक रुपयाच्या मदतीसाठी झुंजवते. खेट्या मारून त्यांची हाडे मोडतील, अशी व्यवस्था तयार करते. दुसरे सरकार स्वत:हून मदतीला धावून जाते. नाविन्यपूर्ण योजना राबवून कलावंतांना पैशासोबत सन्मानही मिळवून देते. हा ज्या त्या सरकारच्या विचारसरणी, कार्यपद्धतीचा भाग म्हणावा लागेल. बाकी काय?


No comments:

Post a Comment