Tuesday 25 January 2022

हिंदीतल्या अर्नाळकर

 ‘तुम्हाला ते कळण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील’, असं एखाद्या पक्षाचे प्रवक्ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविषयी ओथंबलेल्या स्वरात म्हणतात. तेव्हा त्याची खूप चर्चा होते. पण खरेतर हे म्हणणं जवळपास सगळ्या मनुष्यांना लागू होतं. कोणताही माणूस खरंच कसा असतो, हे कळणं जवळपास अशक्यप्राय आहे. कारण, त्याच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारची आवरणं असतात. समाजात वावरताना त्याला वेगवेगळ्या भूमिका बजवाव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी एकसारखेच वागणे, बोलणे किंवा निर्णय घेणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळं  त्याच्या स्वभावाचं रहस्य काही कळत नाही बुवा. फारच गूढ आहे तो, असं म्हटलं जातं. आणि अशी व्यक्तिमत्वं रहस्यकथांना जन्म देतात. चपखलपणे बांधलेल्या या कथा विलक्षण लोकप्रिय असतात. त्यांचा मोठा, बांधलेला वाचक वर्ग असतो. त्यातील थरार, संघर्ष, दर पानांवरील नवी वळणे आणि अखेरच्या क्षणी खलनायकाचा खरा चेहरा उघड होणे, याचा आनंद वाचकांना घ्यायचा असतो. 


आनंद, दु:ख, क्रौर्य, द्वेष, मोह, लोभ या सोबत रहस्यही साहित्यातील महत्वाचा पैलू आहे. इंग्रजीमध्ये तो अतिशय व्यापकपणे हाताळला गेला आहे. शेरलॉक होम्स हे त्याचे सर्वात उत्तम उदाहरण. अगाथा ख्रिस्तीसारख्या अनेक इंग्रजी रहस्यकथाकारांना जागतिक मान्यता, सन्मान मिळाला. मुख्य प्रवाहातील लेखिका झाल्या. १९४० ते १९९० पर्यंत एक हजारापेक्षा अधिक रहस्यमय मराठी कथा-कादंबऱ्या लिहिणारे चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकरही (जन्म ९ जून १९०६, मृत्यूू ५ जुलै १९९६) अशा मान्यतेचे, सन्मानाचे हक्कदार होते. पण मराठी साहित्य विश्वाने त्यांना तो दिला नसला. तरीही ते लाखो वाचकांच्या हृदयात अढळस्थानी आहेत. अर्नाळकरांपासून प्रेरणा घेऊन अनेक मराठी तरुण रहस्यकथालेखनाकडे वळाले. त्यांच्या वाचकांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने होत्या. मात्र, दुर्दैवाने मराठी महिला रहस्यकथाकारांची परंपरा तयार होऊ शकली नाही.


मराठीसारखीच स्थिती महासागरासारख्या पसरलेल्या हिंदी साहित्यविश्वातही होती. महिलांभोवती रहस्यकथा विणल्या जात असल्यातरी रहस्यकथा लिखाणात महिलेचे काय काम, अशी बंदिस्त चौकट तेथेही होतीच. उत्तर प्रदेशातील मेरठच्या रहिवासी गजाला अब्दुल करीम यांनी २००४ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ही चौकट मोडून टाकली. त्यांनी चारच वर्षांत तुरुप का इक्का, ख्वाबों की शहजादी, कट्टो, अंगुरी बदन, चुलबुली, हवा हवाई, लेडी हंटर आदी ३६ कादंबऱ्या लिहिल्या. त्या विलक्षण लोकप्रिय ठरल्या. 


काही कौटुुंबिक कारणांमुळे त्यांनी २००९मध्ये अचानक लेखन थांबवले. वाचकांच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी धडाकेबाज पुनरागमन केले. तीन वर्षांपूर्वी त्यांची आय एम बॅक कादंबरी आली आहे. त्यात देशावरील प्रेमासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या गुप्तहेराची कहाणी सांगितली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत बसलेल्या तरुणांच्या गूढ गप्पांमधून महिला गुप्तहेराला देशविरोधी कटाचे धागेदोरे मिळतात. आणि तो त्या तरुणांचा पाठलाग सुरू करतो. त्या देशद्रोह्यांच्या म्होरक्याला शोधतो. तेव्हा वाचक थक्क होतात.  


प्रागतिक विचारसरणीच्या कुटुंबात जन्मलेल्या गजाला यांना त्यांचे वडिल अब्दुल करीम आणि आई जाहिदा यांना कायम लिखाणासाठी प्रोत्साहन दिले. सतत नवीन काहीतरी शोधत राहा. व्यक्त होत रहा. जे सुचेल, ते लिहित राहा, असा संस्कार कायम माता-पित्याने केल्यामुळेच त्या हिंदीतील पहिल्या नामवंत रहस्य कथालेखक म्हणून प्रस्थापित होऊ शकल्या. हिंदीतील अर्नाळकर असे त्यांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 


गजाला हिंदीतील प्रख्यात लेखक, कादंबरीकार वेदप्रकाश शर्मा यांच्या शिष्या. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला साजेसे कथानक. त्यात रहस्यमयी व्यक्तिमत्वे. त्यांची काळी कृत्ये यांची रंजक मांडणी ही गजाला यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, बलस्थाने सांगितली जातात. त्या कथानक अशा पद्धतीने फुलवत, रचत नेतात की, हे लेखन एखाद्या महिलेने केले असावे, अशी शंका येत नाही. सर्वच कथानकांमध्ये त्यांनी सामाजिक एकोपा, भारताचे ऐक्य, भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले आहे. त्यामुळे त्या सर्व समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या. त्यांचे  आगामी लिखाण प्रकाशित करण्यासाठी हिंदीतील नामवंत प्रकाशकांमध्ये स्पर्धा सुरू आहे.


अलिकडील काही वर्षांत सबा खान, रुनझुन सक्सेना, मंजिरी प्रभू, कोलकोत्याच्या शर्मिष्ठा शेणॉय, सुपर्णा चटर्जी, केरळच्या अनिता नायर, तसेच  तमिळनाडूच्या सी. एस. लक्ष्मी उर्फ अंबई आदी इंग्रजी रहस्यकथाकार म्हणून नाव कमावत असल्याचे या क्षेत्रातील जाणकार विकास नैनवाल यांनी दोन वर्षांपूर्वीच्या लेखात म्हटले आहे. आणखी पाच-सात वर्षांनी त्यांनी पुन्हा आढावा घेतला आणि त्यात मराठी रहस्यकथा लेखिकांची नावे आली तर मराठी साहित्य जगताचे माहिती नाही पण मराठी माणसाची शान वाढेल. होय ना?

No comments:

Post a Comment