Wednesday 4 November 2015

कलावंत म्हणून तयार होण्याची संधी



--

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा महोत्सव नुकताच सुरू झाला आहे. शहराच्या एका कोपऱ्यात म्हणजे विद्यापीठातील नाट्यगृहात सुरू असलेला हा महोत्सव म्हणजे केवळ  मनोरंजनाचा किंवा सादरीकरणाचा भाग नाही. जसे शाळा, महाविद्यालयात अभ्यासाचे धडे गिरवून मुले, मुली पुढच्या वर्गात सरकतात. मग कुणी वकिल होते. कुणी प्राध्यापक. कुणी शिक्षक. कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर. तसे कुठल्याही प्रांतातील कलावंतांचे असते का? चित्रकला, शिल्पकलांसाठी त्या मुला, मुलीमध्ये उपजत प्रतिभा असावी लागते. एखादा कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर त्याने रेखाटन केले. रंग भरले तर त्याच्यातील चित्रकार हळूहळू तयार होऊ लागतो. पुढे त्याने संधीचा फायदा घेतला. चित्रकलेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले तर त्याच्यातील प्रतिभेला धुमारे फुटू लागतात. एखाद्याने आखीव-रेखीव शिक्षण घेतले नाही तरी तो उत्तम चित्रकार वैयक्तीक साधनेवर होतो. शिल्पकाराचेही काही प्रमाणात तसेच आहे. गायकाला एखादा उत्तम गुरु मिळाला किंवा मैफलीत गाण्याचा मान मिळाला तरी त्याला स्वत:तील कौशल्याची परीक्षा घेता येते. नाट्य कलावंताची गोष्ट थोडी वेगळी आहे. तो कितीही प्रतिभावान असला. त्याच्यात कितीही नैसर्गिक गुणवत्ता असली  त्याला इतरांच्या मदतीशिवाय स्वत:तील कलावंत सिद्ध करता येत नाही. कारण नाटक ही मुळातच समूहाची कला आहे. साद-प्रतिसाद हाच नाटकाचा पाया आहे. प्रख्यात नाट्य लेखक  प्रा. महेश एलकुंचवार यांनी काही वर्षापूर्वी औरंगाबादेत अनंत भालेराव पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात या मुद्याची मांडणी केली होती. ते असे म्हणाले होते की, उत्तम नाट्यकृती तेव्हाच उभी राहते. जेव्हा त्यातील अनावश्यक गोष्टी  गाळल्या, वगळल्या जातात. संहितेला आवश्यक तेवढेच नेपथ्य वापरा. उगाच रंगमंचावर गर्दी नको. अनावश्यक संवादांवरही काट मारा. मात्र, नाटकामध्ये सादर करणारा आणि तो पाहणाराच वगळला तर काय होईल? थोडक्यात नाटक जर उत्तम व्हायचे असेल तर कलावंत आणि प्रेक्षक आवश्यक असतात. अन्यथा ते नाटकच नसते. प्रेक्षक तर निमंत्रणावरून, आयोजनाचा सांगावा धाडल्यावर मिळू शकतात. पण कलावंत तयार व्हायचा असेल तर त्यासाठी किमान दोन जण लागतात. अगदी  एकपात्री नाटकाचा प्रयोग म्हटला तरी त्यात कलावंताला काही व्यक्तिरेखा साकाराव्याच लागतात. अन्यथा त्याचे सादरीकरण म्हणजे भाषणच होते. आता समूह कसा निर्माण करायचा. रंगमंचावर लेखकाच्या संहितेला अनुसरून पात्रे कशी निर्माण करायची. या पात्रांना नैसर्गिक वाटाव्यात अशा हालचाली देताना त्या चौकटीत कशा बांधायच्या. प्रकाश  योजनेचा वापर कसा करायचा. रंगभूषेच्या वापरातून व्यक्तिरेखा कशी जिवंत करायची, असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी एकतर कलावंताला  एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे लागते किंवा अलिकडील काळात नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये दाखल व्हावे लागते. अभिनय किंवा दिग्दर्शन किंवा नेपथ्य आदी तांत्रिक बाबींसाठी नेमके काय करावे, याबद्दल अशा संस्थांतील नामवंत प्राध्यापक मंडळी शिक्षण देतात. पण सर्वात महत्वाचे असते ते एकांकिका आणि

 दोन अंकी नाटकांचे सादरीकरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे मराठवाड्यातील सर्वात जुना. तेथेच अनेक मातब्बर, गुणी  दिग्दर्शक, लेखक, अभिनेते तयार झाले. त्यांचा पाया  विभागातील शिक्षकांनी मजबूत केला किंवा नाही याबद्दल मतभेद असू  शकतील. पण सर्वजण एकमताने निश्चित सांगतील की, दरवर्षी होणाऱ्या एकांकिका आणि दोन अंकी नाटकाच्या महोत्सवाने त्यांना एक दिशा दिली. संहिता म्हणजे काय इथपासून ते प्रेक्षक म्हणून नाटक कसे पाहावे. त्याचा आस्वाद कसा घ्यावा हे देखील आम्ही महोत्सवातूनच शिकलो. नाटक ही समूहाची  कला असल्याने समूहाचा वापर कसा करायचा किंवा समूहाचा एक भाग म्हणून आपली जबाबदारी अचूकपणे कशी पाडायची, हे देखील महोत्सव शिकवत असतो. एकूणात नाट्य कलावंत घडण्याची पूर्ण प्रक्रियाच महोत्सवातून होत असते. त्यामुळे िवद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा, परीक्षेचा एक भाग असला तरी महोत्सव म्हणजे परिपूर्ण, संवेदनशील कलावंत घडण्याची महत्वाची संधीच आहे. त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला तर पुढील काळात दर्जेदार कलावंत रंगभूमी, चित्रपट जगताला मिळतील.



No comments:

Post a Comment