Tuesday 24 November 2015

साहित्य सम्राटांच्या लेखणीची खरी ताकद






इथे कळते साहित्य सम्राटांच्या

लेखणीची खरी ताकद

केवळ देश स्वतंत्र झाल्याने माझ्या भोवताली राहणाऱ्या, तळाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या समाजाचे दु:ख संपत नाही. असे मानत मराठी साहित्यातील एकमेव साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणी खऱ्या अर्थाने झिजवली. ती देखील समाजापासून चार हात अंतर राखत नव्हे तर त्यांच्यासोबत हालअपेष्टा सहन करत. अशा या महान साहित्यिकाचे कर्तृत्व अमूल्य आहेच. शिवाय त्यांचे जगणेही एखाद्या पहाडासारखे उत्तुंग होते. त्यांचे चौफेर लेखन  त्यांच्यातील प्रतिभेची साक्ष तर देतेच. शिवाय जाती व्यवस्थेची उतरंड निर्माण करणाऱ्या हिंदू धर्माला पश्चातापदग्धही करते. दऱ्या-खोऱ्यात फिरणाऱ्या, पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावाबाहेर मिळेल त्या जागेवर, प्रचंड गरिबीत जीवन जगणाऱ्या जाती-जमातींच्या जगण्याचा जो संघर्ष त्यांनी मांडला. त्याला तोडच नाही. अण्णाभाऊंची लोकनाट्ये, एक-एक कथा, कादंबरीतील प्रत्येक प्रकरण संवेदनशील मनाला हादरवून टाकते. जाती व्यवस्थेबद्दल आक्रोश निर्माण करते. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या वैजयंता, आवडी, माकडीचा माळ, िचखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, फकिरा, चित्रा या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. ते प्रचंड गाजले. अजूनही त्यांच्या लेखन संपदेतील मौल्यवान कथांमध्ये दडलेली बीजे विविध माध्यमातून समोर येऊ शकतात. ही बाब मराठवाड्यातील तरुण लेखक  रावसाहेब गजमल यांनी अचूक पकडली आणि अण्णाभाऊंच्या ‘बरबाद्या कंजारी’ या कथेचे नाट्य रुपांतर करून राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत (२२ नोव्हेंबर) अतिशय ताकदीने स्वत:च्याच दिग्दर्शनात सादर केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

खरे तर राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजनच हौशी कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्यांना व्यावसायिक रंगभूमीची वाट सुकर करून देणे आहेच. त्याशिवाय कसदार, वेगळ्या वाटेवरच्या संहिता तयार होण्यासाठी प्रयत्न करणे असेही आहे. त्यामुळेच सांस्कृतिक संचलनालयाने काही वर्षापूर्वी नव्या संिहतांना प्राधान्य असा नियम केला. त्यामुळेच तरुण लेखकांसमोर आव्हान तयार झाले. दरवेळी लेखकाला सापडलेले नाट्य बीज नाट्य रुपात ताकदीने उतरतेच असे नाही. कारण दोन अंकी नाटक फुलणे. ते रंगमचीय अवकाशात बांधणे आणि त्याच स्वरूपात ते प्रभावीपणे सादर करणे याला सिद्धहस्ततेसोबत टीमवर्क लागते. ते सर्वच नाट्यसंघांकडे उपलब्ध नाही. म्हणून कथा, कादंबऱ्यांचे नाटकात रुपांतर करण्याचा प्रवाह तयार होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण ‘बरबाद्या’ नाटकात पाहण्यास मिळाले. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेत काहीही कर्तृत्व नसताना केवळ जन्मावर ठरलेल्या  विशिष्ट जाती दुसऱ्या जातींचे  माणूसपण नाकारतातच. शिवाय जातीअंतर्गत भेद, रुढी, परंपराही त्याला खतपाणी घालतात. जात पंचायतीच्या रुपाने तर शोषितांचे आणखी शोषण सर्रास केले जाते. अण्णाभाऊंनी ही बाब ‘बरबाद्या  कंजारी’ कथेत अतिशय साध्या पण विलक्षण जिवंतपणे मांडली. ती नाट्य रुपात सादर करताना गजमल यांनीही त्यात तेवढाच जीव ओतला. व्यक्तिरेखा ठसठशीत केल्या. जातीत प्रचंड दरारा असलेल्या बरबाद्याची परंपरा झुगारून देण्याची लढाई टोकदार केली. एकीकडे मुली, पत्नीवरील नितांत प्रेम आणि दुसरीकडे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रुढीशी लढणारा बंडखोर बरबाद्या उभा करताना अण्णाभाऊंना अपेक्षित असलेला  सामाजिक संदेशही दिला. मात्र, हे करत असताना त्यांनी काही प्रसंग नव्याने लिहिले किंवा विस्तारित केले असते तर बरबाद्या आणि त्याच्या व्याही मंडळीतील हाणामारीच्या प्रसंगाची लांबी कमी होऊ शकली असती. नाट्य आणखी गोळीबंद झाले असते. दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कथा आणि नाट्याकडे थोडे आणखी त्रयस्थ नजरेने पाहणे अपेक्षित आहे.

रामेश्वर देवरे, राजकुमार तरांगे, रोहिदास पवार, अर्जुन टाकरस, दिशा वडमारे, श्रुती फुलारी, अभिजित वाघमारे, रत्नदीप वाव्हळे, मनोज ठाकूर, अमोल जाधव, राजेश आंगुडे, चंदू हिवाळे, प्रवीण गायकवाड या साऱ्यांनीच कथा आणि नाट्याचे मूल्य जाणून घेतले होते, असे दिसते. प्रत्येकानेच भूमिकेत जीव ओतला. अनिल बेडे यांनी  नेपथ्यातून भटक्यांची विपन्नावस्था, त्यांच्या राहण्याची, वावरण्याची ठिकाणे चांगली उभी केली होती. शेख अस्लम यांची वेशभूषा, प्रेरणा खरातांची केशभूषा, मंगेश भिसेंची प्रकाश योजना आणि भरत जाधव यांचे संगीत संहितेला न्याय देणारे होते. अण्णाभाऊंची विपूल कादंबरी, कथासंपदा आहे. त्यातील काहींचे आधी अभिवाचन करून त्यातील कोणती नाट्यबीज फुलवणारी आहे, याचा अभ्यास होऊ शकतो. आणि केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता त्यांचे नाट्य प्रयोगही झाले तर मराठी रंगभूमीच्या कक्षा आणखी रुंदावू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आणि गजमल व त्यांचे हरहुन्नरी, संवेदनशील सहकारी हे निश्चित करू शकतील. एवढी आशा बरबाद्याच्या सादरीकरणाने निर्माण केली आहे.




No comments:

Post a Comment