Thursday 3 December 2015

हौसेच्या कक्षा आणखी रुंद झाल्या तर...



यापुढे तोंडाला रंग लावायचा असेल तर घरात पाऊल ठेऊ नको...नाटकं करायची असतील तर घराबाहेरच रहा...अरे, गाणे म्हणून, स्टेजवर उभा राहून पोट भरतं का बाबा? चल लवकर शहाणा हो. नाटकवाल्यांच्या नादी लागू नकोस. आधी पोटापाण्याचे पहा. ते नाटकात काम करण्याचे फालतू धंदे ताबडतोब बंद झाले पाहिजेत. नाहीतर माझ्याशी गाठ आहे. असे अगदी अलिकडील काळापर्यंत घरातील वरिष्ठांचे धमक्या देणे. इशारा देणे  काहीसे कमी झाले आहे. किमान शहरांमध्ये तरी अशी स्थिती आहे. अगदीच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादळाचा संदर्भ देऊन सांगायचे झाले तर वडिलधारी मंडळी थोडीशी नाट्य कलावंतांविषयी थोडीशी सहिष्णू झाल्याचे दिसते. नाटकवाला म्हणजे कामातून गेलेला. त्याच्या पोटापाण्याचे काहीच खरे नाही. तो उफराटा विचार करतो. त्याला घराची काळजीच नाही, असे  वातावरण तेवढ्या तीव्रतेचे राहिलेले नाही. बऱ्याच घरांमध्ये तर नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेला मुलगा-मुलगी म्हणजे सृजनशील, नवनिर्मिती करणारा, असे मानले जाते. एवढेच नव्हे तर तो नाटकात काम करून  पुढे रंगभूमीवर, टीव्ही सिरीअलमध्ये चमकेल, अशी अपेक्षा आई-बाप व्यक्त करत आहेत. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहात आहेत. कारण काळ बदलत चालला आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याच घरातील केलेली मुस्कटदाबी योग्य नसल्याची खंत त्यांना वाटत आहे.  त्यामागे केवळ  सृजनशीलता किंवा कलेबद्दल आस्था एवढाच दृष्टीकोन नाही तर नाटकात काम केले तर  मुलगा संवेदनशील होईल.  त्याला कलेच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळू शकेल, असे  पालकांना वाटू लागले आहे. किंबहुना टीव्ही वाहिन्यांचे, चित्रपटांचे आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे बदललेले रुप पाहता त्यांना याची खात्री वाटू लागली आहे. आणि ते तसेच असेल तर ती अतिशय आनंदाची बाब आहे. कारण घरच्यांचा पाठिंबा हा नाट्य कलावंतांच्या प्रगतीत असलेला सर्वात मोठा अडथळा होता. तो मिळू लागला तर त्यांच्यातील  नाविन्यतेची शक्ती निश्चित वाढेल. राज्य नाट्य स्पर्धेतील संहिता आणि सादरीकरणासाठी रंगकर्मी करत असलेली धडपड पाहता त्या दिशेनेच पावले पडत आहेत, असे वाटते.

कोणे एकेकाळी म्हणजे अगदी राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळी नाटक हे विशिष्ट वर्गापुरते आणि  विषयांभोवती फिरत होते. इतर वर्गांची जगण्याची लढाई सुरू झाली होती.  त्यांचे प्रश्न त्यांच्याभोवतीच घुटमळत होते. या प्रश्नांची मांडणी  विशिष्ट वर्ग करत होता. पण त्याचे प्रमाण नगण्य इतकेच होते. सर्वात महत्वाचे  म्हणजे नाट्यकर्मीला कोणत्याच समाजाची फारशी मान्यता नव्हती.  आणि नाटकातून स्वत:चा, आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचा धांडोळा घेणे. त्यावर भाष्य करणे एवढेच स्वरूप होते.  १९७० च्या दशकात ते तेेंडूलकर, एलकुंचवार, अरविंद देशपांडे, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, जब्बार पटेल तसेच प्रा. कुमार देशमुख, प्रकाश त्रिभुवन  आदींनी बदलून टाकले. राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे समाजातील अनेक  घटकांचे म्हणणे मांडण्याचे साधन बनली.  त्यापुढील काळात तर ती अधिक व्यापक झाली. अनेक तरुण नाटककार,  अभिनेते, तंत्रज्ञ त्यातून उदयास आले. व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावले. एका विशिष्ट उंचीला जाऊन  स्पर्धा थांबली. तो काळ होता १९९५ चा. कारण नव्या संहिता येणे बंदच झाले होते. जुन्याच नाटकांना नवा मुलामा देऊन सादर करण्यावर समाधान मानले जाऊ लागले. वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नाटकाशी तुलना होऊ लागली. अनेक मातब्बर कलावंतही हौशी, समांतर, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवरून  टीव्ही मालिकांकडे धाऊ लागले. चित्रपटात नाव कमावू लागले. त्यामुळे २००३ च्या अखेरपर्यंत स्पर्धेचे अस्तित्व अगदीच क्षीण झाले होते. मराठवाड्यात तर खूपच बिकट स्थिती होती.  मुंबई, सोलापूर, पुण्याची मंडळी राज्य नाट्यसह इतर स्पर्धांमध्ये काहीतरी नाविन्य शोधत असताना  औरंगाबादसह इतर  शहरात जुन्या वाटांवरच चालण्याची  रित होऊ लागली होती. ती  मोडण्याचे काम पद्््मनाभ पाठक दिग्दर्शित ‘अचानक’ नाटकाने केले. १९८० च्या दशकात रंगभूमीवर विक्रम प्रस्थापित करणाऱ्या स्मारक नंतर  पहिल्यांदाच अचानकच्या निमित्ताने मराठवाड्याच्या हौशी रंगभूमीला यु टर्न मिळाला. मध्यंतरीच्या काळात काहीच यश मिळाले नाही असे नाही. पण अंतिम फेरीत  एवढे प्रचंड म्हणजे प्रथम क्रमांकाचे यश पदरात पडले नव्हते.  या यशाने नव्या पिढीच्या रंगकर्मींना बळ मिळाले. शिवाय  टीव्ही वाहिन्यांकडे जाण्यासाठी राज्य नाट्यच्या सोपानाखालून गेले तर फायदा होतो, हेही उमजू लागले. महत्वाचे म्हणजे याच घडामोडींच्या आसपास सांस्कृतिक संचलनालयाने नव्या संहितांना  प्राधान्याचे धोरण जाहीर केले. त्याच अर्थ हळूहळू मराठवाड्यातील नाट्यकर्मींना कळू लागला आहे. टीव्ही मालिका,  चित्रपटात जायचे असेल आणि तेथे टिकायचे असेल राज्य नाट्यचा अनुभव पदरी हवाच, हे त्यांच्या लक्षात येत आहे. म्हणूनच की काय दरवर्षी नव्या संहितांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, असे केवळ नव्या संहिता असल्यानेच सर्वकाही साध्य होते असे नाही. तर सादरीकरणातील नाविन्यता हवी. विषयाची मांडणी, नेपथ्य, प्रकाश योजना यामध्येही प्रयोग करावे लागतील. हौसेच्या कक्षा अधिक रुंद, उंच कराव्या लागतील. मराठवाड्यातील कलावंतांमध्ये ती क्षमता निश्चितच आहे.



No comments:

Post a Comment