Wednesday 24 February 2016

हे असेच धुमसत राहिल…


एका गावात दोन जण राहत असतात. त्यांची घरे, शेती एकमेकांच्या आजूबाजूलाच असते. 
त्यातील एकजण बऱ्यापैकी ताकदीचा आणि गावात दादागिरी करणारा. 
पैसा अडका बाळगून असलेला. तर दुसरा तुलनेत लेचापेचा. आपण बरे की 
आपले काम बरे अशा मनोवृत्तीत जगणारा. पण असे जगत असतानाही आपण 
एक दिवस ताकदवान होऊ. आपणही गावात दादागिरी करू. शेतीपाती वाढवू. 
गावातलं राजकारण खेळू, अशी स्वप्न बाळगणारा. काही वर्षात हळूहळू 
परिस्थिती काहीशी बदलली. 
ताकदवान  गड्याच्या घरात काही कटकटी 
सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कमी ताकदवान असलेल्याला
वाटू लागले की आता आपण त्याच्यापुढे जाऊ शकतो. नेमकी 
परिस्थिती किती बदलली आहे. गड्याची ताकद खरेच
 कमी झाली आहे का, की त्याला ताकद दाखवण्यात 
फारसे स्वारस्य राहिलेले नाही, याचा पूर्ण 
अभ्यास न करताच त्याने एकदिवस त्याला आव्हान
देऊन टाकले. प्रारंभी ताकदवान गड्याने दोन पावले माघार घेतली. 
पण हा आपल्या इज्जतीचा, इभ्रतीचा प्रश्न आहे, असे
लक्षात येताच पूर्ण ताकद लावून अशी जोरदार मुसंडी मारली की
 दुसरा गडी एकदम गडबडला. मला काही 
तुझ्याशी लढायचे नाही रे बाबा, असे जाहीर करून टाकले. 
समोरच्याची शक्तीस्थाने, कुमकुमवतपणा हेरल्याशिवाय
 हल्ला करणे म्हणजे पराभूत होण्याच्या मार्गाकडे 
पहिले पाऊल टाकणेच असते. गेल्या दोन आठवड्यात
 शिवाजीनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक
 संघ अन्‌ संघाच्या आडून भाजपने जे काही केले. 
ते असेच होते. शिवसेनेविरुद्ध एकदम आक्रमक झालेल्या
 संघाला, भाजपाला बॅकफूटवर यावे लागले. ही तशी म्हणाल तर
 शहराच्या एका भागापुरती लढाई होती. पण मागचे संदर्भ
 आणि पुढील काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेतल्या
 तर ती एक प्रकारे सुंदोपसुंदीची नांदीच आहे. 
शिवसेना-भाजपमधील संघर्ष आता याच मार्गाने धुमसत
 धुमसत पुढे जाणार आहे.
शिवसेनेचे वारे 1985 नंतर औरंगाबादेत शिरले. 
त्यावेळीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औरंगाबादेत कायर्रत होता.
 भाजपचे नावनिशाण नव्हते. 
पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत
शिवसेनेने 27 जागा मिळवल्या. तेव्हा भाजपच्या पदरात
 भोपळा पडला होता. त्यामुळे तमाम हिंदुत्ववादी मते
 आपल्याच हक्काची अशा थाटात सेनेच्या नेत्यांनी
 प्रवास सुरू केला. मुस्लिमांची भिती दाखवली की मतदान
 केंद्रावर रांगा लागतात, हे गणित या नेत्यांनी घोटवले. 
मात्र, कोणत्याही समाजाचा, धर्माचा माणूस असला तरी
 त्याला धर्मासोबत विकासही आवश्यक असतो. त्याकडे
 सेनेच्या काही नगरसेवकांनी आणि नेत्यांनी
 साफ दुर्लक्ष केले. त्यामुळेच 1995 च्या निवडणुकीत
 भाजपला एकही जागा मिळणार नाही, असे वाटत असताना
 8 जागांवर कमळ फुलले. अर्थात त्यावेळीही शिवसेनेची
 ताकद प्रचंड असल्याने त्यांना भाजपच्या मदतीची गरज 
पडली नाही. पुढील काळात मात्र परिस्थिती बदलत गेली. 
नगण्य वाटणारे भाजपचे अस्तित्व शिवसेनेच्या जवळपास
 बरोबरीत येऊन उभे ठाकले आहे. एप्रिल 2015 मध्ये
 झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा रथ
 बाजूला येऊन उभा असल्याचे सेना नेत्यांनाही जाणवले. 
त्यामुळे भाजपचे घोडेही फुरफुरु लागले. 
त्यातच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने
 भाजपच्या मुळाशी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
 पदाधिकाऱ्यांच्या अंगातही वारे शिरले. त्यांनी गल्लोगल्ली
 बळ वाढवण्याचे प्रयोग सुरू केले. त्यातील एक प्रयोग शिवाजीनगरात
 झाला. शिवाजीनगर ही वसाहतच मुळात शिवसेनेने वाढवलेली.
1993 मध्ये तेथील नागरी समस्या, सिडकोच्या योजनेतील त्रुटी
 धसाला लावण्यासाठी शिवसेना आक्रमक होती. 
सिडकोने बांधलेल्या घरांची कुलुपे तोडून ती घरे लोकांच्या
 स्वाधीन करण्याचे सेनेचे आंदोलन खूपच गाजले होते. 
त्यामुळे या भागात शिवसेनेचा पाया तसा बऱ्यापैकी पक्का आहे. 
त्याला चिरे पाडण्याचे काम संघाच्या आडून भाजपने
 सुरू केल्याचे म्हटले जाते. एरवी संघाच्या शाखा
 म्हणजे दहा-बारा डोकी असे चित्र होते. तेथे बऱ्यापैकी गर्दी
 होऊ लागली. त्याची नोंद सेनेचे नगरसेवक आणि सभागृहनेता
 राजेंद्र जंजाळ यांनी घेतली नसती तरच ते आश्चर्य झाले असते.
 कारण कोणताही नगरसेवक नागरी समस्या सोडवण्यापेक्षा
 आपल्या वॉर्डात विरोधक वरचढ होणार नाही यासाठीच
 सगळी शक्ती पणाला लावत असतो. त्याप्रमाणे जंजाळांनी व्यूहरचना केली. 
तत्पूर्वी घडलेली एक घटना म्हणजे शिवाजीनगरात संघाची
 शाखा चालवणाऱ्या एका प्रचारकाला मारहाण झाली. 
मारहाण करणारे इतर धर्मीय असल्याचे दिसताच घटनेला
 धार्मिक वळण देण्यात आले. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच
 असल्याचे नंतरचा घटनाक्रम सांगतो. देशात, राज्यात, महापालिकेत
 सत्ता असतानाही आणि शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेल्या
 शिवाजीनगरात संघाच्या प्रचारकाला मारहाण होते, यामागे
 काहीतरी गोम आहे, हे त्याचवेळी अनेकांच्या लक्षात आले.
 पण त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला भाजपचे 
शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी. शिवाजीनगरात भाजपला
 हातपाय पसरण्यासाठीचा मोका त्यांनी तन, मन, धनाने ताडला 
आणि लगोलग तेथे एक हजार कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन करून टाकले.
 एकेकाळी तनवाणींचेच सहकारी असलेले जंजाळ यामुळे दोन
 पावले मागे सरकले. पण सर्वप्रकारचा हिशोब चुकता करत,
 राहिली साहिली कसर वसूल करण्यात मातब्बर
 असलेल्या जंजाळांनी संघाच्या शाखेवरच धडक मारली. 
शाखेतील घोषणाबाजीमुळे त्रास होत असल्याचा त्यांचा रास्त
 आरोप होता. एकीकडे मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत.
 दुसरीकडे मैदानांतर धार्मिक संघटनांचे कार्यक्रम विना परवानगी
 कसे होतात, असे त्यांचे म्हणणे होते. त्याला संघाच्या मंडळींनी
 प्रत्युत्तर देणे टाळले. समान धर्मियांविरुद्ध पोलिसात तक्रार
 देणार नाही, असा पवित्राही घेतला. यामुळे भाजपच्या गोटात
 शांतता पसरली आहे. अर्थात शिवाजीनगरची घटना अद्याप
 पूर्णपणे संपलेली नाही. त्यातील अनेक धागेदोरे पुढील काळात
 पाहण्यास मिळतील. इतर वॉर्डांमध्ये त्याचे दर्शन घडणारच आहे.
 एक घाव दोन तुकडे करून प्रश्न निकाली काढण्याची 
शिवसेनेची पद्धत आहे. तर प्रश्नाचे एक एक पीस काढून ते
 वेगळे करत संथगतीने हल्ला करण्याची संघाची अन्‌ भाजपचीही
 सवय आहे. एक होऊन विकासाचे काम करण्यापेक्षा फुटीतून
 मते खेचण्याची सेना-भाजपची रणनिती `कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे,` असा रोकडा सवाल येत्या काही वर्षात उपस्थित करणार आहेच. 
याविषयी कुणाला काही शंका आहे का?

No comments:

Post a Comment