Tuesday 1 March 2016

भारतीय माणसाचा पिंड भूतानी, कूबानी होईल?


प्रत्येक माणसात काम, क्रोध, मद, मोह, मत्सराची पेरणी निसर्गानेच केली आहे. त्याचा नियंत्रणात वापर केला तर त्यातून आनंद, समाधान मिळतेच. पण नियंत्रणाची शक्ती असलेल्या मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, याचे कौशल्य निसर्गाने दिलेले नाही. त्यासाठी अध्यात्म, उपासना, योग असे मार्ग सांगितले आहे. परंतु, प्रत्येक सामान्य माणसाला त्या मार्गावर चालणे शक्य होत नाही. म्हणूनच त्याच्या जीवनातील आनंद, समाधान टप्प्या-टप्पाने कमी होत जाते. भौतिक प्रगतीतून सुख, समाधान मिळेल, असेच त्याला वाटत राहते. म्हणून तो धावण्याची गती वाढवतो. (देशाच्या पातळीवर सांगायचे झाले तर भौतिक सुखासाठी निसर्गावर हल्ले केले जातात.)  ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याने ज्या प्रमाणात स्वतःला प्रामाणिकपणे झोकून दिले. त्या प्रमाणात त्याला यश मिळते. अनेक वर्षे पैसा, प्रसिद्धी मिळवण्यात जातात. तो मिळवण्याचे प्रमाण ठरवलेले नसल्याने कुठे थांबायचे हे कळत नाही. आपल्यापेक्षा दुसऱ्याचे सुख जास्तच मोठे असल्याचे वाटू लागते. काही वेळा उगाच या स्पर्धेत पडलो. त्यापेक्षा स्वतःपुरते पाहावे, असेही वाटू लागते. पण एकदा धावणे सुरू केल्यावर त्यातून बाजूला होण्याची लाज वाटू लागते. समाज आपल्यावर पराभूत, हरलेला असा शिक्का मारण्याची भिती वाटू लागते. आणि मग बहुतांशजण धावणेच कसे योग्य आहे, हे आपल्या वर्तुळात पटवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मागे वळून पाहताना ज्या आनंदासाठी स्पर्धेत उतरलो होतो. त्या स्पर्धेमुळे प्रसिद्धी, पैशातून आनंद, समाधान मिळालेच नाही. उलट जे काही नातेसंबंध जपले. मित्र, नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण घालवले. कुणाच्या अडचणीला पूर्ण शक्तीनिशी धावून गेलो. गरिबाला आपल्या क्षमतेनुसार मदत केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर खुललेले हास्य पाहून खुश झालो. हिरवेगार डोंगर, नदीचे खळाळते पाणी पाहून मन उल्हसित झाले. त्यातच खरा आनंद होता असे लक्षात येते. समाधान जर एवढ्या साध्या, सोप्या गोष्टींमध्ये दडलेले आहे तर कशासाठी एवढी धावाधाव केली. त्याऐवजी लहानपणापासूनच जर आनंदी, समाधानी जीवन जगण्याचे. इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचे ध्येय ठेवले असते तर...असा प्रश्न पडतो. आणि बहुतांशजण छे..छे..असे कुठे शक्य आहे का. असं आनंदी, समाधानी जगता येतं का? कुठे आहेत असे आनंदी, समाधानी लोक. कसे जगतात ते. त्यांची जडणघडण कशी होते. हे लोक  मागासलेले, अत्यल्प समाधानी असतील, असेही म्हटले जाईल. त्या साऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलीप कुलकर्णी यांनी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलेल्या `भूतान आणि कूबा ः सम्यक विकासाच्या दिशेने` या राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकात मिळतात. भारताच्या अंगाला अंग लागून असलेला भूतान आणि अमेरिकेच्या पंखाजवळ असलेला कूबा  आज जगातील सर्वात आनंदी, समाधानी देश ठरले आहेत. या देशांनी हा आनंद, समाधान नेमके कसे मिळवले. त्यासाठी कोणती मानके ठरवली. तेथील सामान्य माणूस एवढी आनंदी का? तो काय करतो. कसे जगतो. तेथील शहरे कशी आहेत. तेथे भौतिक जगात सुखाची एकके मानली गेलेले कार, फ्रीज, टीव्ही,  बंगला असे आहे का? नसेल तर तरी ते सुखी कसे आहेत? तेथील शेती कशी. शहरी जीवन कसे, याची आकडेवारी कुलकर्णी यांनी सादर केली आहे. त्यामुळे हे पुस्तक चिकित्सक मनोवृत्तीच्या किंवा चिकित्सेचा पिंड असणाऱ्या वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. 128 पृष्ठांमध्ये दोन भागांत मांडणी करताना कुलकर्णी यांनी त्यात कुठेही मनोरंजकता आणलेली नाही. कूबा, भूतानमधील जीवनशैलीच्या वर्णनात ते गुंतलेले नाहीत. या दोन्ही देशांतील वास्तव विकास दर, खनिज संपत्तीची उपलब्धता, दरडोई उत्पन्न अशा मुद्यांच्या आधारे पटवून दिले तर ते सत्याच्या जवळ जाऊ शकेल, असे त्यांनी ठरवलेले असावे. यामुळे हे पुस्तक चिकित्सक, अभ्यासक, समाजशास्त्रींच्या वर्तुळात महत्वपूर्ण ठरणार आहे. औरंगाबादेत या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सध्या भूतानमध्ये राहण्यास असलेले उमेश जाधव यांनी सुऱेख अनुभव सांगितले. त्यावरून कुलकर्णी यांनी भूतानविषयी केलेली मांडणी खरेच सत्य असल्याचा प्रत्यय येतो. कूबाबद्दलही पर्यटकांची वर्णने वाचून, ऐकून आपण ऐकवार कूबाला जाऊन आले पाहिजे, असे मनापासून वाटू लागते.

भारताचा कधी कूबा, भूतान होईल का, असाही प्रश्न पडतो. खरेच आपण ज्याला प्रगती म्हणतो ती प्रगतीच आहे ना, अशी शंका मन पोखरू लागते. एकेकाळी भारत हा प्रचंड संपन्न, सुबत्ता असलेला आणि त्यापेक्षाही समाधानी, आनंदी देश असल्याचे म्हटले जाते. ग्रामीण, राजकीय रचनाच तशी होती. बारा बलुतेदार गाव चालवत. त्यांचा आणि राजसत्तेचा फारसा थेट संबंध नसे. त्यामुळे लोक आपापल्या कोशात आनंदाने जगत असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नसावी. कारण धर्माधिष्ठित कर्म व्यवस्था हा भारतीय समाजरचनेचा सर्वात जुना, मोठा आणि गलिच्छ भाग आहे. तो जर त्या काळातही असेल तर त्यावेळीही शोषण असणारच. मग शोषित वर्ग दुःखात असताना समाज आनंदी होता, असे म्हणण्यात काय हशील आहे? आजही परिस्थितीत फारसा बदल नाहीच. गरिब, शोषितांचे कल्याण घोषणांपुरतेच आहे.जात, धर्म, पंथाच्या नावाखाली परस्परांवर हल्ले करण्याचा, एकमेकांना कोंडीत पकडण्याचा उद्योग भारतीय माणूस खूपच मनापासून, इमाने इतबारे करत आहेच. एकवेळ स्वतःकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल पण जातीच्या नावावर लढणे आणि इतरांना ओरबाडणे थांबता कामा नये, असा जोरदार ट्रेंड आहे.

भूतान बौद्ध धर्माधिष्ठित राज्य. तेथे अन्य धर्मियांची संख्या अत्यल्प. कूबामध्ये धर्माला अजिबातच स्थान नाही. दोन टोकांच्या दोन समाजरचना असलेल्या आणि तरीही सुखाने, आनंदात राहणाऱ्या या देशांमध्ये समस्या नाहीतच असे नाही. पण तेथे समस्यांसाठी कोणत्याही जाती, धर्माला जबाबदार धरून उठसूठ झोडपले जात नाही. तर सर्वजण मिळून अडचणींशी लढतात. कायद्याचे, नियमांचे आटोकाट पालन करतात. निसर्गासोबतच जगण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. नातेसंबंधांना,  आपल्यासोबतचा व्यक्ती आनंदी राहिलाच पाहिजे, याला कमालीचे महत्व दिले जाते. तसा प्रत्येक भूतानी, कूबन माणसाचा पिंड तयार झाला आहे. भौतिक सुखामागे धावणाऱ्या, धावताना इतरांच्या प्रगतीने पोटदुखी होणाऱ्या, कार फ्रीज, बंगल्यातच आनंद मानणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत जात, धर्म, प्रांतवाद आणणाऱ्या भारतीय माणसाचा पिंड भूतानी, कूबानी माणसासारखा होईल का?


No comments:

Post a Comment